दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह / पंकजा, राेहिणींचा पराभव भाजपच्याच लाेकांकडून; एकनाथ खडसेंचा ‘बाॅम्बगाेळा’

...त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी त्या १२ डिसेंबरच्या मेळाव्यात भूमिका मांडतील - खडसे 

Dec 03,2019 07:36:00 AM IST

प्रदीप राजपूत

जळगाव - ‘पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी भाजपतील ‘काही लाेकांनी’ सुनियाेजितपणे धनंजय मुंडेंना ताकद पुरवली, अशा कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. या प्रकारामुळे त्या निश्चितच व्यथित आहेत. परंतु याबाबत त्यांनी माझ्याशी संवाद साधलेला नाही,’ असा गाैप्यस्फाेट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केला. पंकजा मुंडे १२ डिसेंबरला काय भूमिका मांडतात हे महत्त्वाचे आहे. गाेपीनाथगडावरील या कार्यक्रमाचे निमंत्रण मला आलेले नाही, आल्यास मी नक्की जाईन, असे सांगत खडसेंनी आपण पंकजांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले आहेत. पंकजांप्रमाणे माझी मुलगी राेहिणी यांचा पराभवदेखील भाजपच्याच काही लाेकांनी केला, हे मी नावानिशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगितले. मात्र, त्यांची चाैकशीदेखील झाली नाही. मी स्वत: तक्रार केली असताना ही स्थिती आहे, तर पंकजांच्या भावना साहजिक असतील. पंकजांप्रमाणे माझ्याही पक्षांतराच्या वावटळी उठवल्या जात आहेत, परंतु आपण भाजपत राहू, असेही खडसेंनी सांगितले.

पंकजा मुंडे कधी बाेलल्या नाहीत...

‘पराभव झाल्यानंतर पंकजा अनेक वेळा भेटल्या. परंतु त्यांनी कधी या विषयावर चर्चा केली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र मतदारसंघात झालेला प्रकार सांगितला. पंकजांचा पराभव पक्षानेच केला असल्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी त्या १२ डिसेंबरच्या मेळाव्यात भूमिका मांडतील, असे खडसे म्हणाले.

X