आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजांची संघर्षाकडे वाटचाल, जाती-धर्माची वज्रमूठ आवळून भाजपला सूचक इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे परळी विधानसभेच्या पराभवानंतर कमबॅक झाले आहे. गोपीनाथ गडावरील कार्यक्रमातून त्यांची व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपवरील नाराजीची खदखद बाहेर आली आहे. पंकजा मुंडे ओबीसी नेत्यांना जवळ करत संघर्षाचे संकेत देत राज्यभर दौरा काढून जाती-धर्माची वज्रमूठ आवळणार आहेत.

१ डिसेंबरला पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भाजपसह महाराष्ट्राला संभ्रमात टाकले होते. त्यामुळे आता त्या भाजप सोडणार अशा वावड्या उठवल्या गेल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातच पंकजा या 'माधवबंरा' म्हणजे माळी, धनगर, वंजारी, बंजारा आणी राजपूत या जातींचे संघटन करून वेगळ्या सामाजिक संघटनेची स्थापना करून भाजपवर दबाव वाढवतील अशी चर्चा राज्यभर सुरू होती. परंतु त्यांनी आताच भाजप सोडणार नाही, हे स्पष्ट करत भाजप माझ्या वडिलांनी वाढवलेला बहुजनांचा पक्ष असून ताे मूठभर लोकांच्या हाती असल्याचा आरोपही केला. मी स्वत:हून पक्ष सोडणार नाही. पक्षाला जर मला काढायचे असेल तर निर्णय घ्यावा, असे सांगून सूचक इशारा दिला आहे. गाेपीनाथगडावर मागील पाच वर्षांच्या काळात एकदाही पाऊल न ठेवणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हजेरी लावून आपल्यावर भाजपकडून कसा अन्याय केला जात आहे. त्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे जिम्मेदार आहेत याचे दाखले दिले. त्यांचे भाषण मुंडे समर्थकांना अपिल होणारे ठरले. समर्थकांनीच त्यांना आता वेगळा पक्ष काढा हीच वेळ आहे. पंकजा मुंडे यांनाही तुमच्या पक्षात घ्या असा सल्ला दिला. त्यामुळे जयंती कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांना पक्षाकडून कशी वागणूक दिली जाते याची खदखद बाहेर निघाली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या समोरच पक्षात काय चालले आहे याचा पाढाच दोन्ही नेत्यांनी वाचला. पंकजा यांनी जयंती कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या संपर्कातील आमदारांना निमंत्रण देत आपली शक्ती काय आहे हे दाखवून देत सुप्तपणे एक प्रकारे शक्तिप्रदर्शन करत भाजपला इशारा दिला आहे .
पंकजा यांनी आता परळीवर लक्ष देण्याएेवजी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्याचा निर्णय जाहीर करत मुंबईत येत्या २६ जानेवारीला सुखदा येथून कार्यालय सुरू करून राज्यभर मशाल पेटवून दौरा करण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे त्या मराठवाड्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर आता औरंगाबादेत उपोषण करणार आहेत. या एल्गारानंतर भाजपची काय भूमिका असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडेंना घरचा आहेर 

पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर केलेले शक्तिप्रदर्शन व भाजपवर साधलेला निशाणा हे पाहून भाजपचे सह्योगी खासदार संजय काकडे यांनी त्यांच्यावर टीका केली. पंकजा यांच्यामुळे पक्षाला काहीच फरक पडणार नसल्याचे ते म्हणाले. एकंदर काकडे यांचा बोलवता धनी कोण, हे समोर आलेले नाही. एकंदर भाजपमध्ये ओबीसी नेते विरुद्ध फडणवीस यांचा गट समोरासमोर आल्याचे दिसत आहे. परंतु पंकजांना पराभवानंतर जनतेत जाऊन काम करावे लागणार आहे.

चंद्रकांत पाटलांनी काढली समजूत

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी खडसे व पंकजा यांची आपल्या भाषणात समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूरच्या कार्यक्रमात त्यांनी पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. चुका माणसाकडून होतात, त्याचा राग पक्षावर काढू नका, असा सल्ला त्यांनी पंकजा मुंडे व खडसेे यांना दिला आहे. परळीच्या कार्यक्रमात मुंडे समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्याने आता परळी विरुद्ध नागपूर अशा नव्या संघर्षाची चाहूल दिली आहे.