political / जांबुवंतरावांमुळे विधिमंडळात आमदारांच्या टेबलावरील पेपरवेट गायब

फ्लॅशबॅक विधानसभेत बाेलू दिले जात नसल्याच्या संतापातून धाेटेंनी चक्क अध्यक्षांवर फेकला पेपरवेट, अध्यक्षांनी थेट आमदारकीच केली रद्द

रमाकांत दाणी

Sep 10,2019 09:21:00 AM IST

नागपूर : विदर्भवीर जांबुवंतराव धोटे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अफलातून व्यक्तिमत्त्व. धोटेंचे सार्वजनिक जीवनातील वागणे, त्यांची देहबोली, वक्तृत्व, अशा साऱ्याच गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण असल्याने लोकांना त्याचे मोठेच अप्रूप वाटायचे. १९६४ मध्ये आमदार असताना जांबुवंतराव धोटे यांना कुठल्याशा विषयावर विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली नाही. संतापलेल्या धोटे यांनी चक्क विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्या दिशेने पेपरवेट फेकून मारला होता. त्यांचे काही समर्थक मात्र 'धोटे यांनी भारदे यांना नव्हे, तर माइक बरोबर काम करीत नसल्याने पेपरवेट विधानसभा गॅलरीतील ध्वनिक्षेपक यंत्रणेतील कर्मचाऱ्याच्या दिशेने फेकून मारला होता,' असे सांगतात. नेमके कारण काहीही असो, मात्र चर्चा झाली ती त्यांनी अध्यक्षांना पेपरवेट फेकून मारल्याचीच. या अतिशय गंभीर प्रकारामुळे धाेटे यांची आमदारकीच रद्द करण्याचा निर्णय त्या वेळी विधानसभा अध्यक्षांनी घेतला हाेता. एखाद्या लोकप्रतिनिधीचे विधानसभा सदस्यत्वच रद्द करण्याची ती देशातील पहिलीच घटना होती. त्या वेळी धोटे हे यवतमाळमधून प्रतिनिधित्व करत होते. आमदारकी रद्द झाल्याने पोटनिवडणूक झाली. यादरम्यान धोटे हे काही काळ कारागृहात होते, असे सांगितले जाते. त्याचा फायदा उठवत धोटे समर्थकांनी यवतमाळ परिसरात हाती बेड्या व गजाआड असलेल्या धोटेंची पोस्टर्स तयार करून ती जागोजागी लावली होती. सर्वत्र त्या पोस्टर्सचीच चर्चा होती. अपेक्षेप्रमाणे धोटे यांनी तत्कालीन काँग्रेस उमेदवाराचा साडेआठ हजारांवर मतांनी पराभव करत विजय मिळवला. धोटे मोठ्या रुबाबात पुन्हा विधानसभेत दाखल झाले. आमदारकीची शपथ घेण्याची वेळ आली त्या वेळी धोटे यांनी हाती माइक घेत 'ज्या जांबुवंत धोटेचे सदस्यत्व तुम्ही पाशवी बहुमताच्या जोरावर रद्द केलेत, तो जांबुवंत धोटे मीच. लोकांंनी मला पुन्हा निवडून दिले,' असे ठासून सभागृहात सांगितले. या घटनेपासून विधिमंडळ सचिवालयाने धडा घेतला. सभागृहात आमदारांच्या टेबलावर ठेवले जाणारे पेपरवेट मात्र तेव्हापासून काढून टाकण्यात आले.

X
COMMENT