आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारक मेहता मालिकेतील परेश यांचे दररोज २३५ वृद्धांना मोफत जेवण पुरवण्याचे अखंड सेवाव्रत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी मुळात गुजरात (अमरेली) चा रहिवासी आहे. महाविद्यालयीन शिक्षण येथेच झाले. आयुर्वेदाचे शिक्षण जामनगरमध्ये झाले. १९८७ मध्ये माझे वडील पाेस्ट आॅफिसमध्ये नाेकरी करीत हाेते. फारसा पगार नव्हता, परंतु ते बांधकाम कामगारांना माेफत चप्पल वाटत असत. मी बराच लहान असताना वडील दगावले. आईला खूप कष्ट करावे लागले. मला लहानपणापासूनच अभिनयाचा छंद आहे. वयाच्या ८ व्या वर्षी एका गुजराती चित्रपटात काम केले हाेते. अभिनयाच्या छंदानेच मला १९९३-९४ मध्ये मायानगरी मुंबईत आणले. इथल्या भाइंदर परिसरात आयुर्वेदिक क्लिनिक सुरू केले. त्याचसाेबत अभिनयाच्या क्षेत्रात व्यग्र राहू लागलाे. आतापर्यंत ७८ हिंदी-गुजराती मालिकांमध्ये काम केले आहे. त्यापैकी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’सारख्या लाेकप्रिय मालिकेचा अंतर्भाव आहे. यामध्ये जेठालालचा मित्र परेशभाईचे पात्र मी साकारले आहे. दर दाेन-तीन महिन्यांत मी दिसत असताे. याशिवाय २३५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना माेफत भाेजन पुरवत असताे. वयाची पन्नाशी गाठली आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत हे काम करीत राहीन. याची सुरुवात कशी झाली त्याचा किस्सा सांगताे.

सुमारे १२ वर्षांपूर्वी ७० वर्षांचे वयस्कर गृहस्थ माझ्या क्लिनिकमध्ये आले. त्यांना पाहून असे वाटत हाेते की, बऱ्याच दिवसांपासून त्यांनी काही खाल्लेले नसावे. मी त्यांच्याकडून फी घेतली नाही, त्यांना रस पाजवला. तेव्हा  ते भावूक झाले व म्हणाले, पत्नीला लकवा आहे. मुलगा-सून जेवण देत नाहीत. आम्ही त्यांच्यासाठी आेझे बनलो आहाेत. त्यांचे बाेलणे एेकून मी सद्गदीत झालाे. मी त्यांना पत्ता विचारला आणि दरराेज दाेघांचे जेवण पाेहाेचवण्याची हमी दिली. माझ्या या भूमिकेमुळे पत्नीला आनंद वाटला. ती त्यांच्यासाठी जेवण बनवू लागली. अशा पद्धतीने वयस्कर लाेकांना जेवण पुरवण्याची सेवा ८-१० लाेकांपर्यंत पाेहाेचली. जेव्हा ही संख्या वाढत गेली तेव्हा घरी जेवण बनवणे कठीण हाेऊ लागले. किचनसाठी मी क्लिनिकशेजारीच घर भाड्याने घेतले. त्याचे नाव ठेवले श्रावण टिफीन सर्व्हिस. एक डिलिव्हरी व्हॅन घेतली, ११ जणांना कामासाठी घेतले. आज प्रत्येक जाती-धर्मातील २३५ वयस्कर लाेकांना दुपारचे टिफीन माेफत देत असताे. यामध्ये ६ पोळ्या, भाजी, वरण-भात आणि लाेणचे असते. रविवारी चटणी, लाेणच्याच्या एेवजी मिठाई, फरसाण देत असताे. काही जणांना तर दाेन वेळचे जेवण जात असते. प्रत्येक वस्तू आम्ही स्वत: बनवताे. सध्या मीरा-भाइंदर आणि दहिसर चेक नाक्यापर्यंत सुमारे २० किमीपर्यंत जेवण पुरवताे. विशेष म्हणजे शुगर पीडितांसाठी, ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी वेगळे जेवण दिले जाते. काही लाेक ८०-९० वर्षांचे आहेत, ते स्वत:च्या हाताने जेवू शकत नाहीत. त्यांना टिफीन पाेहाेचवणारी मंडळी जेवण भरवतात. क्लिनिकमध्ये जाण्यापूर्वी या साऱ्या लाेकांना जेवण वेळेत पाेहाेचले की नाही हे तपासून घेत असताे. त्यांच्यासाेबत मी वेळ घालवत असताे. या साऱ्या वृद्धांना त्यांच्या सुना-मुलांनी साेडून दिलेले आहे. बहुतेक जण मानसिक, शारीरिक दुर्बल आहेत. वृद्धांच्या नातेवाइकांना समजावून सांगण्यास गेलो, पण अतिशय वाईट प्रतिसाद मिळाला. काही वृद्धांकडे राहायला जागाही नव्हती तेव्हा मी विचार केला की त्यांना का बरे घर मिळवून देऊ नये? त्यासाठी जागा हवी हाेती. सहा वर्षे सरकारी अधिकाऱ्यांकडे खूप चकरा मारल्या, पण काम झाले नाही. एक दिवस एका महिला पेशंटशी चर्चा करताना ‘मिलाप’ संस्थेचा संदर्भ मिळाला. मी त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर संस्थेचे लाेक अनेकदा क्लिनिकला आले आणि पाेलिसांसारखी चाैकशी करू लागले. ज्यांना मी टिफिन देताे त्यांनाही ते भेटले. माझा व्हिडिआे व्हायरल केला आणि निधीसाठी लाेकांकडे पैशाची मागणी केली. परिणाम असा झाला की तत्काळ १ काेटी ६० लाख रुपये जमा झाले. त्यातून मी २५ हजार चाैरस फूट जमीन ‘मां-बाप का मंदिर’ इमारत बनवण्यासाठी विकत घेतली. ही प्राॅपर्टी माझी नाही. ज्या पद्धतीने जमीन घेतली तसेच इमारतीसाठी पैसे उभे राहतील असा विश्वास वाटू लागला. या लाेकांकडे उत्पन्नाचा स्रोत नाही. त्यामुळे आम्हीच त्यांना दरमहिन्याला एका पार्सलमधून गाठिया, खाकरा, साखर, चहा पावडर, स्नानाचा साबण, टूथपेस्ट आदी साहित्य पुरवताे. महिन्यात अनेकदा त्यांची आराेग्य तपासणी करताे. जर काेणाला दूध किंवा आैषधाची गरज असेल तर त्यांच्या जवळच्या दुधाच्या किंवा मेडिकलच्या दुकानातून कुपन खरेदी करून त्यांना देताे.

२३५ वृद्धांच्या टिफीन सेवेसाठी दरमहिन्याला मला साडेसहा लाख रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे क्लिनिकच्या उत्पन्नातील १०% आणि अभिनयातून मिळालेले सारे पैसे या कामासाठी खर्च करताे. काही दानशूर लाेक मदत करतात. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने अजून तरी काेणती अडचण आलेली नाही. एखाद्या त्रस्त, भुकेल्यास जेवण देऊन पाहा किती आशीर्वाद आणि आनंद मिळताे. आता आणखी ७९ वृद्धांनी टिफीन देण्याची विनंती केली आहे. माझी मुलगी आणि मुलगा दाेघेही या कामात मला मदत करतात.


(शब्दांकन : विनोद यादव)