आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंड गावात "करसाळ' दारूमुक्त झाले त्याची गोष्ट...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पराग मगर  

करसाळ हा आदिवासींच्या जीवनातील असाच अविभाज्य भाग. पण दारू आणि त्यापाठोपाठ येणारा खर्च या क्षुल्लक कारणामुळे हा विधीच न करता येण्याची वेळ अनेक आदिवासींवर येते. पण दुर्गम कोरची तालुक्यातील पडियालजोब या लहानशा गावाने यावर मार्ग  शोधला.  करसाळ सामूहिक व दारूमुक्त केले. तशी ही घटना राज्यातीलच नाही तर देशातही बहुधा पहिलीच असावी. 


‘माझ्या आज्याचा आजा मरून अनेक वर्षं लोटली होती. पण या वर्षीपर्यंत तो बुडहालपेन (देव) झाला नव्हता. कारण तीन पिढ्यात घरी करसाळ झालं नव्हतं. काय करणार सोयच नव्हती. त्यामुळे आजा देव बनून अजून घरी आला नव्हता. पाहुण्यांना दारू, मटण खाऊपिऊ घालायचं म्हणजे पैसा तर लागणारच. शेतातून वर्षभराची गुजराण होईल एवढं कसं बसं पिकतं. पण या वर्षी करसाळ झालं आणि आजा देव बनून घरी आला. त्याचा नावाचा घोडा उभा आहे. लोकांना दारू नाही मिळाली पण आज्याचा आत्मा मुक्त झाला.’ हे सांगताना चमारू पोरेटी यांच्या चेहऱ्यावर जबाबदारी पूर्ण झाल्याचे आनंदी भाव तरळतात. 

गैरआदिवासी हिंदू समाजात जशी तेरा दिवसांनी तेरवी केली जाते त्याचप्रकारे गोंड आदिवासी समाजात करसाळ करण्याची प्रथा आहे. पण घरी कुणी मरण पावल्यावर लगेच करसाळ केलं जातच असं नाही. सोय होईल तेव्हा करण्याची प्रथा. जोपर्यंत करसाळ होत नाही तोपर्यंत मृतास देवपण लाभत नाही. त्यामुळे हा विधी खूप आवश्यक असं लोक म्हणतात.

महिलांच्या गर्दीत बसलेल्या उषाबाई लगेच बाहेर येऊन म्हणाल्या, माझा नवरा लहान असतानाच आमच्या सासूबाई पेन झाल्या(वारल्या). मी या घरी येऊन आता ३५ वर्षं झाली. तेव्हापासून त्यांचं करसाळ झालं नव्हतं. त्यामुळे माता बनून घरी आल्या नव्हत्या. आधी सासऱ्याची सोय नव्हती आणि नंतर नवऱ्याकडूनही पैशाची तजवीज झाली नाही. सासूबाई तर दारू पीत नव्हत्या. पण करसाळ म्हटलं की नातेवाइकांना दारू हवी असते. मटण पाहिजे असतं. त्यासाठी पैसा तर लागणारच. पण या वर्षी गावात दारूमुक्त करसाळ झालं आणि सासूबाई माता बनल्या. दारूसाठी स्त्रियांचेही करसाळ असे राहून जात असल्याची खंत त्याच्या बोलण्यातून जाणवली. गडचिरोली म्हणजे राज्याचे टोक. आणि जिल्ह्याच्या उत्तरेला सर्वात वरती असलेला कोरची हा आदिवासीबहुल तालुका. एकीकडे छत्तीसगड राज्याची सीमा तर दुसरीकडे गोंदिया जिल्हा लागून. त्यामुळे मराठी, छत्तीसगडी, गोंडी आणि हिंदी या चारही भाषांचे लोक येथे भेटतात. विकास तसा दूरच. पण लोकांनी समाधानाने जगण्याची कला शिकून घेतली आहे. भातशेती आणि मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय. पडियालजोब हेदेखील जंगलाच्या दाटीत वसलेलं असंच एक गाव. वर निळ्या रंगाने रंगवलेली आणि जमिनीपासून एक ते दीड फुटापर्यंत पिवळ्या मातीने सारवलेली नेटकी घरे. घरांमध्ये कमीत कमी आणि जुजबी वस्तू. त्यामुळे ही घरे आणखी मोठी वाटतात. या घरांच्या आत डोकावताना बहुतेक घरांमध्ये एक मोठं देवघर दिसतं. या देवघरात अनेक मडकी ठेवलेली. ही मडकी कसली याबाबत विचारल्यावर चमारू म्हणाले, हे आमचे पूर्वज. करसाळ झालं म्हणून ते देव बनून घरात आले. 

मृतांच्या नावे मातीची मडकी ठेवून त्याची पूजा गोंड समाज करतो. मृतांना देव बनवून घरी आणावं लागतं. आणि त्यासाठी करसाळ करणे आवश्यक असते. पण हा विधी करताना बराच पैसा लागतो असं वारंवार ऐकायला मिळत होतं. निसर्गाशी एकरूप असलेल्या आणि एकोप्याने राहणाऱ्या गोंड आदिवासी समाजाला एखाद्या धार्मिक कार्यासाठी एवढा पैसा का आणि कशासाठी लागतो हा प्रश्न डोक्यातून जात नव्हता. आणि त्याचं चकित करणारं उत्तर दारू आहे हे लक्षात आल्यावर मनात आणखीच प्रश्न निर्माण झाले. 

केवळ दारूसाठी करसाळ अनेक पिढ्या लांबतं? म्हणजे आदिवासी समाज एवढी दारू पितो का, असा प्रश्न आणि गैरसमज अनेकांना होऊ शकतो. पण प्रश्न केवळ दारूचा नाहीच तर त्या बरोबरीने गावाला, नातेवाइकांना दोन दिवस चिकन, मटण खाऊ घालण्याचा. दारू आणि मांसाहार या दोहोंचा फार जवळचा संबंध. आदिवासी लोक परस्पर सहकार्याने राहतात. दुःखासोबत सुखही तेवढच वाटून घेतलं जात. त्यातच करसाळ म्हटलं की मेलेला माणूस घरी देव बनून येणार या आनंदात संपूर्ण गावाला मोहाची दारू पाजण्याची प्रथा. पण एकटी दारू चालणार नाही. ओघाने मटण खाऊ घालणेही आलेच. आणि या दोन गोष्टीसाठी नातेवाईक आणि गाव झाडून हजर असतं. पूर्ण गावाला आणि नातेवाइकांना दोन दिवस दारू आणि मटण खाऊ घालायला बराच पैसा लागतो. त्यातच प्रश्न प्रतिष्ठेचा बनत जातो. पण पैसा आज नसतो, उद्याही नसतो. पिढ्यानपिढ्या असच चालतं. सोय होत नाही तोपर्यंत करसाळ लांबतं. पडियालजोब गावही याला अपवाद नव्हतं. तीन पिढ्यांपासून कित्येक घरांनी करसाळ पाहिलं नव्हतं. माजी सरपंच असलेले राजाराम नैताम हे येथील ग्रामसभेचे अध्यक्ष. गोंड समाज मसेली सर्कलचे ते सदस्य. कुणी मेल्यावर १५ महिन्यांत त्याचे करसाळ व्हावे अशी अपेक्षा असते. पण आपल्या गावात तीन पिढ्यांपासून करसाळच झाले नाही हा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता. 

गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी... पण ती शासकीय. त्यामुळे या दारूबंदीचा दृश्य फायदा अनेक वर्षे दिसला नाही.  जिल्ह्यातील दारू पूर्णतः बंद व्हावी यासाठी डॉ. अभय बंग यांनी २०१६ पासून ‘मुक्तिपथ’ अभियान सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून गाव दारूमुक्त करण्यासाठी राजाराम यांनीही हिरिरीने पुढाकार घेतला होता. गावातील दारूविक्री पूर्णतः थांबली होती. पण हीच दारू आणि त्या ओघाने लागणारे मटण व त्यासाठी येणारा खर्च हे करसाळ न होण्यामागचे एकच कारण त्यांना पटणारे नव्हते. त्यांनी मुक्तिपथच्या तालुका संघटक निळा किन्नाके यांच्याशी यावर चर्चा केली. यावर मार्ग काढण्यासाठी एक दिवस गावात त्यांनी करसाळबाबत सभा बोलावली. सभेत ते म्हणाले, गावात तीन पिढ्यांपासून अनेक घरी करसाळ झालेले नाही. आपले आजे, मायबाप अजून देव बनून घरी आलेले नाहीत. त्यामुळे करसाळ करणे आवश्यक आहे. पण पैसा नसल्याचे कारण पुढे येते. आपण गरीब आदिवासी. हातावर आणून पानावर खातो. म्हणून आज्या बापाचे आत्मे तसेच भटकत ठेवायचे का? सर्वांनाच हा मुद्दा पटत होता. पण करणार काय? पैसा कुठून आणणार हा प्रश्न अनेकांनी पुढे रेटला. यावर राजाराम उपाय सुचवत म्हणाले, आपण सामूहिक करसाळ करूया. तेदेखील ‘दारूमुक्त’. सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक विरोधाच्या भावना तरळल्या. देवपूजेसाठी दारू लागते... बोकड कापावे लागणारच... आणि सामूहिक करायला हे लग्न आहे का, अशी उत्तरे पुढे आली. राजाराम मात्र मागे हटायला तयार नव्हते. आणखी काहींनाही हा मुद्दा पटला. हे एक पवित्र कार्य आहे. ते सामूहिक झाले तर हरकत काय ? राजाराम यांचं म्हणणं सर्वांच्या लक्षात यायला लागलं. 

आता विषय होता दारूचा. राजाराम म्हणाले, देवपूजेसाठी मोहाची फुले पाण्यात घालून ते पाणी देवाला वाहिले तरी चालते. आणि देवाला दारूच हवी असेही एकदाचे मान्य केले तरी देवपूजेसाठी थोडीशी दारू पुरे. बाकी सबंध गावाला आणि नातेवाइकांना दारू पाजण्यात अर्थच काय? दारूच नाही तर चिकन-मटण खाऊ घालण्याचा प्रश्नही उद्भवणार नाही. लोकांना खाऊ घालणे महत्त्वाचे की करसाळ करून मेलेल्यांना देव बनून मानाने घरी आणणे महत्त्वाचे, याचा विचार तुम्हीच करा. आता सर्वांच्या चेहऱ्यावरील विरोध मावळायला लागला होता.  आता महिलांनीही आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली. महिला तर दारू पीतही नाहीत. तरी कुणाची आई, कुणाची आजी अजून माता बनून घरी आलेली नाही. करसाळ झालंच पाहिजे अशी मागणी महिलांनी रेटून धरली. आता हळूहळू विरोध मावळून सामूहिक आणि दारूमुक्त करसाळ कसे करायचे यावर चर्चा सुरू झाली. 

१७ व १८ मार्च ही सामूहिक करसाळ करण्याची तारीख ठरली. १४ कुटुंबे करसाळ करण्यास तयार झाली. संपूर्ण गावाला व सर्वांच्या नातलगांना दोन्ही दिवस साधं सामूहिक जेवण १४ कुटुंबांनी मिळून देण्याचा निर्णय पक्का झाला. खर्च विभागल्याने तो बराच कमी होणार होता. गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावठाण जागेवर मृतांना माती दिली जाते. आपल्या घरची जागा ओळखू यावी यासाठी वर काही दगड गाडले जातात. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वी मृतास कुठे गाडले होते हे घरचे बरोबर ओळखतात. सर्व युवकांनी मिळून ती पूर्ण जागा स्वच्छ केली. प्रत्येक घरच्यांनी त्या जागेवर मातीचे ओटे तयार केले. त्याची रंगरंगोटी केली. आता गावात सणासारखे वातावरण होते. नातेवाईक यायला सुरुवात झाली. सोबतीला मातीपासून बनविलेले पक्के घोडे आणि विशिष्ट पद्धतीची मडकी यायला सुरुवात झाली. मरण पावलेल्या मृतासाठी घोडा स्थापित केला जातो. यालाच बुडहालपेन म्हणतात. मेलेल्या स्त्रीसाठी दोन्ही बाजूंनी पोकळ असलेल्या विशिष्ट पद्धतीच्या मडक्याची स्थापना केली जाते. यालाच माता म्हणतात. आता गाव गजबजायला लागलं. करसाळचा दिवस उजाडला.  विविध धार्मिक विधी पार पडले. करसाळमध्ये जडंगे नावाचे विशिष्ट वाद्य वाजविले जातात. आदिवासी स्त्री-पुरुष या वाद्यावर फेर धरतात. यालाच जडंगे नाच म्हणतात. सायंकाळी जडंगे नाच झाला. दुसऱ्या दिवशी सर्व ग्रामस्थ व नातेवाईक मृतांना गाडलेल्या जागी पोहोचले. महिलांनी डोक्यावर पाण्याने भरलेली मातीची मडकी घेतली होती. आदिवासी परंपरेप्रमाणे मातीचे घोडे आणि मडक्यांची स्थापना झाली आणि सोबत असलेली मडकी महिला घरी घेऊन आल्यावर देवघरात त्यांना ठेवण्यात आले. मृतात्मे देव बनून घरात आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. 

कुणाला इजा न करणाऱ्या आपल्या प्रथा-परंपरा जपण्याचा प्रत्येक समाजाला अधिकार आहे. समाजाची अस्मिता त्यासोबत जुळलेली असते. एखाद्या कारणामुळे या प्रथा-परंपरा पूर्ण न करता येणे ही खरंच दुःखाची बाब. अशा वेळी त्या कारणाचा शोध घेणं अपरिहार्य  ठरतं.  करसाळ हा आदिवासींच्या जीवनातील असाच अविभाज्य भाग. पण दारू आणि त्यापाठोपाठ येणारा खर्च या क्षुल्लक कारणामुळे हा विधीच न करता येण्याची वेळ अनेक आदिवासींवर येते. पण दुर्गम कोरची तालुक्यातील पडियालजोब या लहानशा गावाने यावर मार्ग शोधला. करसाळ सामूहिक व दारूमुक्त केले. तशी ही घटना राज्यातीलच नाही तर देशातही बहुधा पहिलीच असावी. या गावाने आपल्या समाजाला नवी वाट दाखवली. पुढारलेल्या समाजांतील सामूहिक विवाहाचा ‘इव्हेंट’ बातम्यांतून सर्वांच्याच समोर येतो. पण आदिवासी समाजच काहीसा दुर्लक्षित. त्यामुळे चुकीच्या परंपरांना फाटा देत एका छोट्याशा गावाने केलेले 'दारूमुक्त करसाळ' दुर्लक्षित राहणार नाही तरच नवल. 

(लेखक सर्च संस्थेत गडचिरोली येथे कार्यरत आहेत.)

लेखकाचा संपर्क - 8275553566