आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापराग पुजारी आजकालचे मीडिया रिपोर्टर हे असलेच, मुख्य ऐवज झाकून ठेवणारे. आता हेच बघा ना.. डोनाल्ड ट्रम्प भारतात आले आणि मोदींसह त्यांनी होळी पेटवली. मीडियाने लपवलेला त्या घटनेचा हा खास रिपोर्ट. मेलानिया यांची खणानारळाने ओटी भरण्याचे आदेश देऊन ट्रम्प यांना सोबत घेऊन मोदी होळीपाशी आले. मोदी : माय डिअर फ्रेंड, होळीभोवती फिरताना राइट साइडने जा. लेफ्ट साइड बॅन आहे. ट्रम्प : बेस्ट, आमच्याकडेही. बट व्हॉट इज होली? मोदी : खूप महत्त्वाचा हिंदू सण आहे हा. राक्षस हिरण्यकश्यपूच्या बहिणीचे होलिकाचे दहन केले, त्या प्रसंगावरून हा सण आला. आपल्यातील वाईट शक्तींचे, विचारांचे दहन होवो असा विचार असतो यामागे. होळीला ऐतिहासिक महत्त्वही आहे, कारण स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती. ट्रम्प : ग्रेट. पण करता कशी तुम्ही होली? मोदी : हे पाहा अशी लाकडे आणून आग लावतो.. म्हणजे सणच तसा असल्यानं आगलावणं भाग पडतं. प्लीज पूर्ण वाक्य आणि क्रोनॉलॉजी लक्षात घ्या हां. आमच्या मीडियासारखं ‘आम्ही लाग लावतो’ एवढंच एडिट करून लक्षात ठेवू नका म्हणजे झालं. त्याआधी काय बोललोय त्या संदर्भाने लक्षात घ्या. मग आम्ही होळीभोवती फिरून ओबोबोबोयुक्त आरोळ्या ठोकतो. निगेटिव्हिटीचा त्यात नाश होऊदे आणि पॉझिटिव्हिटी वाढूदे अशी प्रार्थना करत नैवेद्य अर्पण करतो. तुमच्यासाठी तर आपोआपच हा पवित्र, होली फेस्टिव्हल ठरतो, कारण तुम्ही उच्चारच ‘होली’ करता. ट्रम्प : एक्सायटिंग. तुम्ही यात हे मघापासून काय काय टाकताय मग? मोदी: डिपेंड्स.. जुन्या गोष्टी टाकतो.. आज कुचकामी असलेले बरेच जुने कायदे, नियम मोडीत काढतो हा मोदी. मध्यंतरी जुन्या हजार, पाचशेच्या नोटाही टाकल्या. ढोंगी पुरोगाम्यांची मते, देशविरोधी कारवाया, ट्रिपल तलाक, कलम ३७० वगैरे बऱ्याच गोष्टी टाकतो. ट्रम्प : झकास. कडक व्हावंच लागतं हो. मोदी : हम्म.. बाकी झकास आणि कडक तर तुमचं भाषण होतं आजचं. असं भाषण गेल्या सत्तर वर्षांत कुणी केलं नसेल. ट्रम्प : थँक्स. तुम्ही स्वत: खणखणीत भाषण केलेलं असताना मला इतकं क्रेडिट देताय म्हणजे मानलं.. आणि मान्य आहे की काही शब्द चुकले माझे उच्चारायला.. स्वामी विवेकामुंडून, सूचिन टेंडूलख, विरॉट खोली असं काहीबाही बोललो मी. पण त्याला तुम्ही माझ्या विचारांची खोली समजा. बाकी मी डोनाल्ड नसून डोलँड आहे हे मला तुमच्यामुळे कळलं. मी किमान तुमच्या नावाचं असं हिरोशिमा नागासाकी तरी केलं नाही. मोदी : केलं नाही? त्या स्वामींचं आणि माझं नाव सेमच आहे हे माहितेय का तुम्हाला. एनीवे.. एक रिक्वेस्ट आहे. आमचे हे हिंदू सण संस्कृती परंपरा होली आहेत हे तुमच्याकडून कळलं तर आमचे लोकही ते मानतील आणि खिल्ली उडवणार नाहीत. ट्रम्प : क्काय? मोदी : येस, बिलीव्ह इट ऑर नॉट.. पण सत्तर वर्षे इकडे मेंटल कंडिशनिंग असंच झालंय. तुम्ही पाश्चात्त्य देशांनी सांगितलं की ते आमच्या जनतेला लगेच पटतं. भले मूळ गोष्ट आमच्याकडची का असेना. म्हणजे योगा, मेडिटेशन, आयुर्वेद, संस्कृत असो किंवा ‘क्या आपके टूथपेस्ट में नमक है’ असो... समजलं ना? आम्ही सांगितलं की मात्र आम्ही बुरसटलेले ठरतो. ट्रम्प : समजू शकतो मी. नक्की ट्विट टाकतो. आपण असेच एकमेकांना सांभाळून घेऊ, मदत करत राहू. हॅप्पी होली.
संपर्क- ७७१८०२२९७५
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.