आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अरिहंत’ची पहिली गस्त यशस्वी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अरिहंत’ने नुकत्याच पूर्ण केलेल्या गस्त मोहिमेला ‘प्रतिरोधी गस्त’ म्हटले जाते. यामध्ये विशिष्ट प्रदेशाकडे तैनातीसाठी जात असताना ही पाणबुडी स्वतःबरोबर अण्वस्त्र बसवलेली क्षेपणास्त्रे वाहून नेत असते. त्यामुळे आवश्यक त्या वेळी शत्रूवर त्या पाणबुडीतून आण्विक प्रतिहल्ला करणे शक्य होते.  

 

भारतीय नौदलातील पहिली स्वदेशी अणुपाणबुडी असलेल्या ‘आयएनएस अरिहंत’ने आपली पहिलीच ‘प्रतिरोधी गस्त’ मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. भारताच्या अण्वस्त्रसज्जतेच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची घटना ठरली आहे. भारत कोणावरही प्रथम आण्विक हल्ला करणार नाही; पण भारतावर आण्विक हल्ला झालाच, तर शत्रूवर जोरदार प्रतिहल्ला चढवेल, या भारताच्या आण्विक धोरणातील महत्त्वाच्या सूत्राची पूर्तता करण्याच्या दिशेने पडलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्याचबरोबर जमीन, हवा, पाण्यावरून आणि पाण्याखालून असे कोठूनही अण्वस्त्र डागण्याची क्षमता आता भारताने प्राप्त केली आहे. त्यामुळे भारताच्या ‘आण्विक त्रयी’च्या (न्यूक्लियर ट्रायड) स्थापनेच्या दृष्टीनेही या ‘प्रतिरोधी गस्ती’ला महत्त्व प्राप्त झाले आहे.  


भारताच्या सुरक्षेला चहुबाजूंनी कायम धोके निर्माण होत राहिले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताच्या आसपास शीतयुद्ध येऊन पोहोचले होते. त्याचा भारताच्या सुरक्षेवर तसेच विकासावरही गंभीर परिणाम होऊ लागला होता. भारत जरी आण्विक निःशस्त्रीकरणाचा खंबीर पुरस्कर्ता असला तरी भोवताली घडणाऱ्या घडामोडींमुळे त्याला अण्वस्त्रसज्ज होण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. त्यामुळे १९७४ मध्ये भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेतली. त्यादरम्यान आपली सामरिक शक्ती आणि ‘आण्विक प्रतिहल्ल्याची क्षमता’ वाढवण्याच्या हेतूने क्षेपणास्त्रे विकसित करण्यावर तसेच नौदलात अणुपाणबुड्यांचा समावेश करण्यावरही विचार सुरू झाला होता. त्या अणुपाणबुड्या स्वदेशातच विकसित करण्यासाठीचा ‘ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल’ (एटीव्ही) हा गोपनीय प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र, १९७४च्या अणुचाचणीनंतर भारतावर पाश्चात्त्यांनी लादलेले निर्बंध या प्रकल्पात मुख्य अडथळे ठरत गेले. कारण पाणबुडी बांधण्याचा भारताला काहीच अनुभव नसल्याने अणुपाणबुडीसारख्या गुंतागुंत बांधणीच्या बाबतीतही भारताला स्वबळावर सर्व करणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत परदेशांची मदत घेण्याशिवाय भारतासमोर पर्याय नव्हता.

 

मात्र, अणुचाचणीनंतर लादल्या गेलेल्या निर्बंधांमुळे ती मदत मिळण्यात अडचणी येत होत्या. परिणामी या अणुपाणबुडीचा प्रकल्प थंड राहिला होता. अखेर १९८०च्या दशकाच्या अखेरीस या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि अनेक आव्हानांवर मात करत २००९मध्ये स्वदेशी बनावटीच्या पहिल्या अणुपाणबुडीचे जलावतरण तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते विशाखापट्टणम येथे पार पडले. त्याच अणुपाणबुडीने (आयएनएस अरिहंत) आपली पहिली ‘प्रतिरोधी गस्त’ यशस्वीपणे पूर्ण करत भारताच्या तांत्रिक आणि संरक्षण इतिहासात मैलाचा दगड पार केला आहे.  


‘अरिहंत’ २०१६ मध्ये कोणताही गाजावाजा न करता भारतीय नौदलात सामील झाली होती. त्यापाठोपाठ ‘ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल’ प्रकल्पातील दुसऱ्या अणुपाणबुडीचेही (‘अरिघात’) गेल्या वर्षी जलावतरण करण्यात आले आहे. आता या प्रकल्पातील तिसऱ्या अणुपाणबुडीचे काम सुरू झाले असण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात अशा एकूण पाच अणुपाणबुड्या बांधल्या जात आहेत. मात्र, त्यातील फक्त ‘अरिहंत’ ही इतर अणुपाणबुड्यांपेक्षा छोटी असणार असून तिच्यावरून शस्त्रास्त्रे वाहून नेण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांची संख्याही इतर अणुपाणबुड्यांच्या तुलनेत कमी आहे.

 
१९८८ मध्ये भारताने तत्कालीन सोव्हिएट संघाकडून अणुइंधनावर चालणारी पाणबुडी (भारतीय नाव - आयएनएस चक्र) भाड्याने घेऊन अणुपाणबुडी हाताळण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान आत्मसात केले होते. मात्र, ती अणुपाणबुडी ‘अरिहंत’पेक्षा वेगळ्या वर्गातील होती. सध्या भारतीय नौदलात रशियाकडून भाडेतत्त्वावर घेतलेली ‘अकुला-२’ श्रेणीतील हल्लेखोर अणुपाणबुडी (आयएनएस चक्र) २०१२पासून कार्यरत आहे. या पाणबुडीवर ‘अरिहंत’ वर्गातील अणुपाणबुड्यांच्या मनुष्यबळाला प्रशिक्षण दिले जात आहे.

 
भारतीय नौदलाजवळ सध्या असलेल्या बहुतांश पाणबुड्या डिझेल-इलेक्ट्रिक शक्तीवर चालतात. या पाणबुड्यांना बॅटरी चार्जिंगसाठी ठराविक काळानंतर पाण्याच्या वर यावे लागते. परिणामी शत्रूच्या नजरेपासून दूर राहण्याच्या या पाणबुड्यांच्या क्षमतेवर मर्यादा येतात. त्याउलट अणुपाणबुडीचा आवाज अतिशय कमी असल्याने आणि त्यातून कंपने अत्यल्प निर्माण होत असल्यामुळे तिला पाण्याखाली असताना शोधणे शत्रूसाठी कठीण होऊन बसते. प्रतिहल्ला चढवण्यासाठी आवश्यक असलेले विमानतळ तसेच जमिनीवरील चल प्रक्षेपक शत्रूच्या हल्ल्याचे लक्ष्य बनण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यापेक्षा शत्रूच्या नजरेत न येता अण्वस्त्रे तैनात ठेवण्यासाठी अणुपाणबुड्या सुरक्षित पर्याय मानला जातो.

 
‘अरिहंत’ श्रेणीतील अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा तसेच विविध प्रकारची शस्त्रास्त्रे बसवलेली आहेत. पाण्याखालून अण्वस्त्र डागू शकणारे ‘सागरिका’ (पल्ला ७५० किलोमीटर) आणि ‘के-04’ (पल्ला ३,५०० किलोमीटर) ही क्षेपणास्त्रे ‘अरिहंत’वर बसवण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर पाणतीर आणि अन्य स्वसंरक्षणासाठीची शस्त्रास्त्रे आणि इतर यंत्रणाही अरिहंतवर बसवण्यात आलेल्या आहेत. मात्र, ‘एटीव्ही’ प्रकल्पातील अन्य अणुपाणबुड्यांवर ‘के-05’ (पल्ला ५००० किलोमीटर) आणि ‘के-06’ (पल्ला ६००० किलोमीटर) ही अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे तैनात केली जाण्याची शक्यता आहे. ‘अरिहंत’ १०० कर्मचाऱ्यांसह आपल्या भूमीपासून दूरवरच्या ठिकाणी १०० दिवस पाण्याखाली राहू शकते. सुमारे ११० मीटर लांबीच्या या पाणबुडीचे वजन ६५०० टनांच्या आसपास आहे. ‘अरिहंत’ पाण्यातून ताशी २४ सागरी मैल (नॉट्स) वेगाने जाऊ शकते.  
अणुपाणबुड्यांची बांधणी ही अतिशय किचकट प्रक्रिया असते.

 

भारत अणुपाणबुडीच्या याबाबतीत नवखा असल्यामुळे तिच्या आरेखनामध्ये आणि विशेषतः या पाणबुडीवरील अणुभट्टीच्या निर्मितीमध्ये त्याला रशियाकडून अतिशय मोलाची मदत मिळाली आहे. ही अणुभट्टी ‘दाबीकृत हलक्या पाण्याची अणुभट्टी’ (प्रेशराइज्ड लाइट-वॉटर रिॲक्टर) असून तिच्यामध्ये इंधन म्हणून संवर्धित युरेनियमचा वापर केला जात आहे. ‘अरिहंत’साठी लहान आकाराची अणुभट्टी विकसित करण्यात मिळालेल्या यशामुळे भविष्यात भारतीय नौदलातील युद्धनौकांसाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. ‘अरिहंत’सारख्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागू शकणाऱ्या अणुपाणबुड्यांबरोबर आता स्वदेशातच ६ अणुपाणबुड्या बांधण्याचा कार्यक्रम आखला गेला आहे.  


‘अरिहंत’ने आता पूर्ण केलेल्या गस्त मोहिमेला ‘प्रतिरोधी गस्त’ म्हटले जाते. यामध्ये विशिष्ट प्रदेशाकडे तैनातीसाठी जात असताना ही पाणबुडी स्वतःबरोबर अण्वस्त्र बसवलेली क्षेपणास्त्रे वाहून नेत असते. त्यामुळे आवश्यक त्या वेळी शत्रूवर त्या पाणबुडीतून आण्विक प्रतिहल्ला करणे शक्य होते. अशा तैनातीच्या वेळी संबंधित अणुपाणबुडी आणि थेट पंतप्रधान यांच्या दरम्यान अत्यंत गुप्त सांकेतिक संदेशवहन होणे गरजेचे असते. या संदेशवहनासाठी अत्यंत लघु वारंवारितेच्या संदेशवहन यंत्रणेचा वापर केला जात असतो. भारतीय आण्विक अधिकारिणीमध्ये अण्वस्त्र हल्ल्याचा अंतिम निर्णय राजकीय नेतृत्वाकडे म्हणजे पंतप्रधानांकडे देण्यात आलेला आहे. ‘अरिहंत’च्या पहिल्या ‘प्रतिरोधी गस्त’ मोहिमेच्या वेळी या सर्व बाबींच्या पूर्ण क्षमतेने चाचणी घेण्यात आल्या आहेत.  


अलीकडे चीनने हिंदी महासागरात आपला नाविक तळ कार्यरत केला आहे. या भू-सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या हिंदी महासागरात आपला प्रभाव वाढवण्यासाठी चीनने दक्षिण चीन सागरातील हैनान बेटावर पाणबुड्यांसाठीचा विशेष भूमिगत तळ सुरू केला आहे. त्या तळावर चीनने अणुपाणबुड्याही तैनात केलेल्या आहेत. तिथूनच चिनी पाणबुड्या हिंदी महासागरात संचार करू लागल्या आहेत. एडनच्या आखातात सागरी चाचेगिरीविरोधी मोहिमेच्या नावाखाली चीन आपल्या पाणबुड्या सतत हिंदी महासागरात पाठवत आहे. त्यातच गेल्या वर्षी एडनच्या आखातातील जिबुतीमध्ये चीनने आपला नाविक तळ सुरू केला आहे. दुसरीकडे पाकिस्तान भारताच्या सुरक्षेसमोर सतत आव्हाने निर्माण करतच आहे. त्या पार्श्वभूमीवरही ‘अरिहंत’च्या पहिल्यावहिल्या यशस्वी ‘प्रतिरोधी गस्त’ मोहिमेमुळे भारताच्या प्रतिस्पर्ध्यांना इशारा मिळाला आहेच, शिवाय भारतीय नौदल आणि एकूणच भारतीयांचा आत्मविश्वास वाढला आहे. 

 

पराग पुरोहित 
संरक्षण अभ्यासक विश्लेषक parag12951@gmail.com

बातम्या आणखी आहेत...