Home | Editorial | Columns | parag purohit's article on air force

व्यूहात्मक भारतीय हवाई दल

पराग पुरोहित | Update - Nov 10, 2018, 09:37 AM IST

इतक्या अवाढव्य क्षेत्रातील भारताच्या सीमांचे संरक्षण करत आहे.

 • parag purohit's article on air force

  आज ८६ वर्षांनंतर भारतीय हवाई दलात आमूलाग्र परिवर्तन झालेले आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेले भारतीय हवाई दल आता पश्चिमेला होर्मुझची सामुद्रधुनी आणि एडनच्या आखातापासून दक्षिण चीन सागरापर्यंत तसेच मध्य आशियापासून दक्षिण हिंदी महासागरापर्यंत, इतक्या अवाढव्य क्षेत्रातील भारताच्या सीमांचे संरक्षण करत आहे.

  ऑस्ट्रेलियामध्ये अलीकडेच आयोजित केल्या गेलेल्या ‘पिच ब्लॅक २०१८’ या हवाई दलांच्या आंतरराष्ट्रीय युद्धसरावांमध्ये भारतीय हवाई दलाने आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली. यानिमित्ताने भारतीय लढाऊ विमानांनी विषुववृत्त ओलांडून दक्षिण गोलार्धात प्रथमच प्रवेश केला होता. तसेच या युद्धसरावांच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने ‘सी-१७’ ‘ग्लोबमास्टर-३’ या विशाल मालवाहू विमानाच्या मदतीने बजावलेल्या आणखी एका कामगिरीतून त्याची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. भारतीय हवाई दलाच्या ‘सी-१७’ विमानाने १६ ऑगस्ट २०१८ रोजी चेन्नईहून सूर्योदयापूर्वी उड्डाण केले. त्यानंतर सुमारे ८,१२० किलोमीटरचे अंतर ११ तासांमध्ये विनाथांबा कापत हे विमान ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील टाऊन्सव्हिल येथील रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्सच्या तळावर उतरले.

  भारतीय हवाई दलाने आपल्या इतिहासात केलेले हे सर्वात दीर्घ उड्डाण ठरले. ‘सी-१७’सारख्या विमानाच्या मदतीने इतके दीर्घ उड्डाण हवाई दलाकडून केले जाण्याला महत्त्व आहे. भारताच्या राष्ट्रहिताच्या संरक्षणाबरोबरच भारताचे विविध देशांबरोबरील संबंध अधिक बळकट करण्यालाही अशा मोहिमांमधून मदत होत असते.


  ‘पिच ब्लॅक’ हे ऑस्ट्रेलियातील डार्विन आणि टिंडल येथे होणारे जगभरातील हवाई दलांचे संयुक्त युद्धसराव आहेत. भारतीय हवाई दल पहिल्यांदाच या सरावांमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते. भारतासाठी या सरावांमधील सहभाग सामरिकदृष्ट्याही महत्त्वाचा होता. भारतीय हवाई दल या सरावांमध्ये चार ‘सुखोई-३० एमकेआय’, एक ‘सी-१३०’ जे सुपर हर्क्युलिस’ आणि ‘सी-१७’ ‘ग्लोबमास्टर-३’ या विमानांसह सहभागी झाले होते. या सरावांसाठी जाताना आणि परत येताना ‘सुखोई’ आणि ‘हर्क्युलिस’ विमानांमध्ये ‘आयएल-७८ एमकेआय’ या इंधनवाहू विमानातून हवेत उडत असतानाच इंधन भरले गेले होते.


  काही वर्षांपूर्वी माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी भारतीय हवाई दल ‘व्यूहात्मक हवाई दल’ (सामरिक हवाई दल) झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर अमेरिकेत पार पडलेल्या ‘रेड फ्लॅग’ सरावांमध्ये सहभागी होऊन भारतीय हवाई दलाने पुन्हा एकदा आपण ‘व्यूहात्मक हवाई दल’ असल्याची प्रचिती दिली होती. तसेच अशा ‘खंडपार तैनाती’मध्येही उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली होती. अशा युद्धसरावांमुळे जगातील कोणत्याही प्रदेशात कार्यरत राहण्याचा अनुभव हवाई दलाला मिळत असतो.


  आवश्यकतेनुसार हवाई शक्ती एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी जलदरीत्या तैनात केली जाऊ शकते. आपल्या मायभूमीपासून दूरवर वसलेल्या एखाद्या ठिकाणी हवाई दल आवश्यक तेव्हा त्वरित पोहोचून आपल्या राष्ट्रहिताचे संरक्षण करू शकते किंवा एखाद्या देशातून संकटकाळात आपल्या नागरिकांची सुखरूप सुटकाही करू शकते. अलीकडील काळात भारतीय हवाई दलाने युद्धग्रस्त लिबिया, येमेन, इराक, दक्षिण सुदान इत्यादी देशांमधून आपल्या नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना मायदेशात परत आणले होते. त्याचबरोबर परदेशात आलेल्या नैसर्गिक संकटांच्या वेळीही संबंधित देशांमध्ये तातडीने मदत पोहोचवण्याची कामगिरी भारतीय हवाई दल वेळोवेळी पार पाडत आहे. भारतीय हवाई दलाच्या या क्षमतेची पहिल्यांदा प्रचिती ठळकपणे आली २००४मध्ये. त्या वेळी अमेरिकेत ‘कॅटरिना’ चक्रीवादळानंतर मोठे नुकसान झालेले होते. त्या वेळी तेथे मदत साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान तातडीने पोहोचले होते, जे परदेशातून मदत साहित्य घेऊन पोहोचलेले पहिले विमान होते. त्यानंतर डिसेंबर २००४ मध्येही हिंदी महासागरात आलेल्या सुनामीच्या वेळी भारतीय हवाई दलाने श्रीलंका, इंडोनेशिया या शेजारी देशांनाही त्वरित मदत पोहोचवली होती.


  हवाई दलाला ‘व्यूहात्मक पोच’ प्राप्त करून देण्याच्या हेतूने गेल्या काही वर्षांमध्ये ‘सी-१७’ ‘ग्लोबमास्टर-३’, हवेत उडत असतानाच दुसऱ्या विमानात इंधन भरू शकणारी इंधनवाहू ‘आयएल-७८ एमकेआय’ आणि अन्य शस्त्रास्त्रे सामील केली गेली आहेत. मात्र, हवाई दलाला आपली क्षमता कायम टिकवून ठेवण्यासाठी अशाच प्रकारची आणखी विमाने आणि शस्त्रसामग्रीची अतिशय आवश्यकता भासत आहे. हवाई दलाच्या शक्तीत वाढ करण्याच्या दृष्टीने ‘सुखोई-३० एमकेआय’ या बहुउद्देशीय, दीर्घ पल्ल्याच्या अवजड लढाऊ विमानाबरोबरच ‘रफाल’ या अत्याधुनिक बहुउद्देशीय मध्यम पल्ल्याच्या विमानांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हवाई दलाची शक्ती वाढवण्यात अवकाशातील दूरसंपर्क उपग्रहही अतिशय मदत करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ने (इस्रो) अवकाशात स्थापित केलेल्या ‘नाविक’ उपग्रह मालिकेचा या दृष्टीने उपयोग होणार आहे. भारतीय हवाई दलात अलीकडील काळात सामील झालेल्या अवजड मालवाहू विमानांमुळे त्याची ‘व्यूहात्मक पोच’ वाढण्यास मदत झालेली आहे. अशा ‘शक्तिवर्धक’ ठरणाऱ्या विमाने आणि हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश करण्यामागे तोही एक हेतू होताच.


  जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यावर भारताच्या हितसंबंधांचा विस्तारही जगाच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेला आहे. त्यातच ‘सकल देशांतर्गत उत्पन्ना’नुसार (जीडीपी) विचार केल्यास आज भारत जगातील सहावी सर्वात मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आलेला आहे. अलीकडील काळात चीनच्या लष्करी हालचालींमुळे भारत चिंताग्रस्त झाला आहे. या सर्व परिस्थितीत भारतासमोरील आव्हाने आव्हाने परतवून आपल्या राष्ट्रहिताचे प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी हवाई दलाची ‘व्यूहात्मक पोच’ वाढणे आवश्यक ठरत आहे.

  आज भारतीय हवाई दलाकडे ती क्षमता आलेली असून तिचीच प्रचिती ‘सी-17’ विमानाने चेन्नई ते टाऊनव्हिलपर्यंत केलेल्या थेट उड्डाणातून पुन्हा एकदा आलेली आहे. त्यामुळे भारतीय हवाई दल भारताच्या देशांतर्गत आणि देशाबाहेरील हितसंबंधांचे संरक्षण करण्यास सक्षम असल्याचे दिसत आहे.


  भारतीय हवाई दलाने गेल्या दोन दशकांमध्ये विविध देशांमधील युद्धसरावांमध्ये सहभाग घेतला आहे. त्या वेळी मिळालेल्या अनुभवांचा हवाई दलाला आपली ‘व्यूहात्मक पोच’ वाढवण्यासाठी उपयोग झालेला आहे. हवाई युद्धसरावांमधील अत्यंत क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या ‘रेड फ्लॅग’ सरावांमध्ये भारतीय हवाई दल सहभागी होत असते. या सरावांच्या २०१६च्या सत्रात सहभागी होण्यासाठी गुजरातमधील जामनगरच्या हवाई तळावरून चार ‘सुखोई-३० एमकेआय’, ‘चार जग्वार डॅरिन-२’, दोन ‘आयएल-७८ एमकेआय’ आणि दोन ‘सी-१७ ग्लोबमास्टर-३’ या विमानांनी अलास्काच्या दिशेने उड्डाण केले होते. वाटेत या विमानांच्या ताफ्याने बहारीन, इजिप्त, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा आणि यूएई अशा विविध देशांमध्ये थांबे घेतले होते. अखेर ही विमाने चार खंडांमधून सुमारे २० हजार किलोमीटरचे अंतर १८ दिवसांमध्ये पार करत नियोजित स्थळी पोहोचली होती.


  दरवर्षी आठ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दल आपला स्थापना दिवस साजरा करते. १९३२ मध्ये याच दिवशी भारतीय हवाई दलाने अवघ्या चार वापिटी विमानांसह आपली कारकीर्द सुरू केली होती. आज ८६ वर्षांनंतर भारतीय हवाई दलात आमूलाग्र परिवर्तन झालेले आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेले भारतीय हवाई दल आता पश्चिमेला होर्मुझची सामुद्रधुनी आणि एडनच्या आखातापासून दक्षिण चीन सागरापर्यंत तसेच मध्य आशियापासून दक्षिण हिंदी महासागरापर्यंत, इतक्या अवाढव्य क्षेत्रातील भारताच्या सीमांचे संरक्षण करत आहे.

  या रुंदावलेल्या कार्यक्षेत्रावर आपला प्रभाव टिकवण्याची जबाबदारी भारतीय हवाई दल उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने पार पाडत आहे. असे असले तरी भारताच्या सुरक्षेसमोरील आव्हानांचा विचार करता भारतीय हवाई दलाला अधिकाधिक अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे. ती उपलब्ध करून देण्यासाठी वेगाने निर्णय प्रक्रिया राबवली जाणेही तितकेच आवश्यक आहे.

  - पराग पुरोहित
  संरक्षण अभ्यासक
  parag12951@gmail.com

Trending