आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परळी अवैध गर्भपात प्रकरण. : डाॅ. मुंडे दांपत्याचा गुन्हा गंभीर, दयेस पात्र नाहीत, दोघांनाही 10 वर्षांची शिक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या गर्भलिंगनिदान व अवैध गर्भपात प्रकरणात अखेर शुक्रवारी निकाल लागला. डाॅ. सुदाम व सरस्वती मुंडे यांनी केलेले कृत्य गंभीरच आहे. ते दयेस पात्र नसल्याचे सांगत बीड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. गांधी यांनी मुंडे दांपत्याला 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. डाॅ. मुंडेच्या दवाखान्यात गर्भपातादरम्यान मरण पावलेल्या विजयमाला पटेकर या महिलेच्या पतीलाही काेर्टाने दोषी ठरवत सक्तमजुरी सुनावली. मात्र, तो 2012 मध्ये जामिनावर सुटल्यापासून फरारच अाहे. सबळ पुराव्याअभावी कोर्टाने 11 अाराेपींची निर्दोष मुक्तता केली. 4 जणांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झालेला अाहे. या प्रकरणी 19 मे 2012 रोजी गुन्हा नोंद झाला होता. 


तिन्ही दोषींना कोर्टाने प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. दंडातून वसूल केलेली रक्कम मृत पटेकर यांच्या 4 मुलींना देण्यात येणार अाहे. मुंडे दांपत्य 6 वर्षांपासून तुरुंगात अाहे. यामुळे सुनावलेल्या शिक्षेतून हा काळ वगळून त्यांना आता 4 वर्षे कैदेत काढावी लागतील. 


गर्भपातादरम्यान मृत महिलेच्या पतीलाही शिक्षा - डाॅ. मुंडेचे वकील
वय, आजारांचा विचार करून कमी शिक्षा द्या 

कोर्टात डाॅ. मुंडेचे वकील अॅड. साळुंखे यांनी युक्तिवादादरम्यान सुदाम मुंडे व सरस्वती मुंडे यांचे वय झाले आहे. त्यांना विविध आजार आहेत. शिवाय, त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाची नोंदणी रद्द केलेली असल्याने यापुढे ते असा प्रकार करण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी कोर्टाकडे विनंती केली. 


चार मुलींचे मातृछत्र हिरावले, दया नकाेच - सरकारी वकील 
सरकारी वकील मिलिंद वाघीरकर म्हणाले, मृत विजयमालाच्या ४ कन्यांचे मातृछत्र हिरावले गेले. अवैध गर्भपात करणारे हे डॉक्टर आहेत. त्यांचे वय जास्त आहे, मग समजही जास्त असायला हवी. मात्र तसे नाही. हे कृत्य करून मुंडे दांपत्य समाजात चुकीचा संदेश देत होते. त्यामुळे त्यांना कठोर शिक्षा व्हावी. दंड करून ती रक्कम मुलींना द्यावी. 


याअाधारे नराधम आरोपींना झाली सक्तमजुरीची शिक्षा 
1. जबाब 

तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सरकारी पंच, जळगाव येथील दाेन डाॅक्टर, स्वाक्षरी, हस्ताक्षर तज्ज्ञ अादींची साक्ष व सरकारी वकिलांचा युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य धरला. 
2. पोस्टमार्टेम 
विजयमाला यांचा गर्भ 18 ते 20 अाठवड्यांचा हाेता. मात्र, डाॅ. मुंडेने ताे 10 ते 12 अाठवड्यांचा दाखवला. ही बाब कोर्टाच्या निदर्शनास अाणून देण्यात अाली. 
3. हस्ताक्षर तज्ज्ञ 
जळगावमधील ज्या डाॅ.काेल्हेच्या रजिस्टरमध्ये डाॅ. सुदाम मुंडेकडे पेशंट रेफर केल्याची नाेंद अाहे, त्या रजिस्टरवरून हस्ताक्षर तज्ज्ञांनी अतिशय महत्त्वाची माहिती पाेलिसांना दिली. 

 

तीन मुलींना सुप्रिया सुळेंनी घेतले दत्तक 
पटेकर दांपत्याला 4 मुली होत्या. अाराेपी महादेव फरार झाल्यानंतर त्याच्या तीन मुलींना खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतलेले आहे. यापैकी रोहिणी 11 वीत, तेजस्विनी दहावी तर ऋतुजा नववीत शिकत अाहे. चौथ्या मुलीचा सांभाळ अाजी- अाजाेबा करतात. 


8 वर्षांपासून 'फरार' महादेवशी दिव्य मराठी ने साधला संवाद 
मृत महिलेचा पती महादेव पटेकर हा पोलिस दप्तरी 2012 पासून फरार अाहे. त्याने पुत्रप्राप्तीसाठी पहिली पत्नी गमावली. दुसरे लग्न केले. नंतर मुलगा झाला. मात्र तो ५ महिन्यांतच वारला. 'फरार' महादेवला 'दिव्य मराठी'ने शोधून काढत संवाद साधला.... 


दुसरे लग्न केले, त्यातून झालेला मुलगाही वारला, पश्चात्ताप होतोय 
माझी पहिली पत्नी गेली. अाता पश्चात्ताप हाेताेय. 2016 मध्ये मी दुसरे लग्न केले. एक मुलगी व एक मुलगा झाला. कावीळ झाल्याने नुकताच माझा मुलगाही गेला. मी अाता ऊसताेडीचे काम करतोय. 


शेतातील विहिरीत भ्रूणांची विल्हेवाट 
परळीत डॉ. सुदाम व डॉ. सरस्वती मुंडे यांच्या दवाखान्यात विजयमाला महादेव पटेकर (भोपा, ता. धारूर) या महिलेचा गर्भपातादरम्यान 18 मे 2012 रोजी मृत्यू झाला होता. तपासात गर्भलिंगनिदान, नंतर अवैध गर्भपाताचा मुंडे दांपत्याचा कारनामा समोर आला होता. जळगावच्या डॉ. राहुल कोल्हेकडे गर्भलिंगनिदान करून मुंडे आपल्या रुग्णालयात गर्भपात करत असे. पडीक विहिरीत डॉ. मुंडे हा भ्रूण आणि गर्भांची विल्हेवाट लावायचा. 


17 अाराेपी, 34 साक्षीदार 
सुरुवातीला या प्रकरणात डाॅ. सुदाम व सरस्वती मुंडेसह महादेव पटेकर हे अाराेपी हाेते. तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस अाल्यानंतर अाराेपींची संख्या 17 वर गेली हाेती. 

बातम्या आणखी आहेत...