आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड अवैध गर्भपात प्रकरण : परवानगी 10 खाटांची, प्रत्यक्षात 114 खाटा; अवैध गर्भपाताचा होता कारखाना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड/औरंगाबाद - अवघ्या दहा खाटांची परवानगी असलेल्या सुदाम मुंडेच्या रुग्णालयात तब्बल ६० खोल्या आणि ११४ खाटा होत्या. मुंडेचा हा दवाखाना म्हणजे अवैध गर्भपाताचा कारखानाच बनला होता.  मुंडे दांपत्याने चार हजारावर अवैध गर्भपात केल्याचा ठपका होता.  विजयमाला पटेकर या गरोदर महिलेच्या मृत्यूनंतर या गर्भपाताच्या कारखान्याचे बिंग फुटले आणि मुंडे दांपत्य गजाआड झाले. बीड न्यायालयाने या दांपत्यासह मृत महिलेचा पती महादेव पटेकर यांना १० वर्षे कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात ३४ पैकी  १८ साक्षीदार फितूर झाले. यामध्ये मृत विजयमाला पटेकर यांच्या नातेवाइकांचाही समावेश होता. मात्र, योग्य तपास आणि सरकारी अधिकाऱ्यांंच्या साक्षी कायम राहिल्याने हे दांपत्य शिक्षेपर्यंत पोहोचू शकले. 


परळी शहरातील मुंडे हॉस्पिटलच्या माध्यमातून सुदाम आणि सरस्वती यांनी गर्भलिंग निदानानंतर अवैध गर्भपाताचा सपाटा लावला होता. जळगावचा  डॉ. राहुल कोल्हे याच्याकडे गर्भलिंग निदानासाठी रुग्ण पाठवून नंतर परळीत गर्भपात करत होता.  १८ मे २०१२ रोजी विजयमाला  पटेकर (रा. भोपा ता. धारूर) हिचा  गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर मुंडे दांपत्याच्या पापाचा घडाही फुटला. 


शहर ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी प्रारंभिक तपास केला. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी स्वाती भोर यांनी सखोल तपास केला. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनीही मुंडे हॉस्पिटलची तपासणी करून सर्व पुरावे समोर आणले.  


पोलिसांनी सुदाम मुुंडेच्या रुग्णालयातील कर्मचारी, जळगावच्या डॉक्टर कोल्हेच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले होते.   विविध वस्तू व इतर साहित्य जप्त करून पंचासमक्ष पंचनामा केला होता. 


यातील अनेक जण नंतर फितूर झाले. सरकारी वकील  मिलिंद वाघीरकर म्हणाले, विजयमालाचे मामा विष्णू उजगरे, नणंद मंगल शिंदे यांच्यासह पंच   प्रदीप इंगोले, डॉ. कोल्हेची बायको हेमांगी, हरी कोल्हे, किशोर गित्ते, कमल सोनवणे, चालक वानखेडे, राजू बळवंत, राजेंद्र सुखदेव मस्के, अतिश मुंडे, ऊर्मिला जाधव, इंद्रजीत भंडारे हे साक्षीदार फितूर झाले.


सील केलेल्या मशीनद्वारे कोल्हे करायचा सोनोग्राफी
विजयमाला यांना पूर्वीच ४ मुली असल्याने १७ मे रोजी सुदाम मुंडे यांनी पटेकर दांपत्याला जळगाव येथे गर्भलिंग निदानासाठी पाठवले होते. डॉ. कोल्हे याने सोनोग्राफी करून गर्भ मुलीचा असल्याचे सांगितले. त्यानंतर १८ मे रोजी गर्भपात करताना विजयमालाचा मृत्यू झाला. १९ मे रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. पीसीपीएनडीटी कायद्यानुसार सिल केलेल्या मशीनद्वारे डॉ. कोल्हे गर्भलिंग निदान करत होता. पोलिस तपासात त्याने तो सिल केलेल्या मशीनवरही सोनोग्राफी कशी करतो याचे प्रात्यक्षिक पोलिसांना दाखवले होते. डॉ. कोल्हेचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला.


गर्भ २० आठवड्यांचा, नोंद १२ आठवड्यांची 
शवविच्छेदन अहवालानुसार, विजयमाला पटेकर यांचा गर्भ १८ ते २० आठवड्यांचा होता मात्र, सुदाम मुुंडे याने विजयमाला यांना रुग्णालयात दाखल करून घेताना व गर्भपातादरम्यान, १० ते १२ आठवड्यांचा गर्भ होता असे लिहिले होते. ही बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. 


कोल्हेच्या रजिस्टरवर, ५५ वेळा मुंडेच्या नोंदी  
जळगाव येथील डॉ. कोल्हेकडे सुदाम नियमितपणे रुग्ण गर्भलिंग निदानासाठी पाठवत होता.  कोल्हे याच्याकडून जप्त केलेल्या रजिस्टरमध्ये जानेवारी ते एप्रिल २०१२ या काळात ५५ वेळा सुदाम मुंडेने रुग्ण रेफर केल्याच्या नोंदी असून त्याच्यासमोर रकमांचा उल्लेख आहे. हस्ताक्षर तज्ज्ञांकडून या नोंदी कोल्हे यानेच केल्याचे निष्पन्न झाले. 


पळून जाण्यास मदत केल्यामुळे वाढली आरोपींची संख्या 
गुन्हा नोंद झाल्यानंतर मुंडे दांपत्याला जामीन मिळाला. त्यानंतर पुन्हा कलम वाढल्यानंतर त्यांच्या अटकेची गरज भासली मात्र ते फरार झाले. राज्यातील विविध भागांसह ते परराज्यातही गेले.  त्यांना ज्यांनी फरार व्हायला मदत केली त्या सर्वांना पोलिसांनी आरोपी केले होते. त्यामुळे एकूण १७ आरोपी यामध्ये झाले. अखेर पळवाटा बंद झाल्याने मुंडे दांपत्य शरण गेले.


पत्नी सरस्वतीच्या आग्रहाखातर शरणागती
गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंडे दांपत्य  तब्बल २६ दिवस फरार होते.  या काळात ते मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड या पाच राज्यांत तोंड लपवत राहिले.  दिवसभर प्रवास आणि रात्र  होईल त्या शहरात लॉजवर मुक्काम करायचे. चालकाच्या नावाने लॉज बुक करायचे. जिल्हा प्रशासनाने मालमत्ता जप्ती कारवाई सुरू केल्यानंतर पत्नीच्या आग्रहामुळे  हे दांपत्य थेट २७ व्या दिवशी पोलिसांना शरण आले होते.  गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवस तो खुलेआमपणे परळीतच वावरला होता. पण, या घटनेची देशपातळीवर चर्चा सुरू होताच दोघे फरार झाले.  चालकासोबत स्वत:ची इनोव्हा आणि एका खासगी व्यक्तीची बोलेरो गाडी घेऊन मुंडे दांपत्य परळी शहर सोडून औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. 


खोक्यात भरून विहिरीत टाकायचा अर्भक
परळीपासून जवळच नंदागौळ शिवारात डॉ. मुंडेची जमीन आहे. या पडीक जमिनीवर असलेल्या विहिरीत तो पिशव्या, इंजेक्शनच्या रिकाम्या खोक्यात अर्भक टाकून फेकायचा. विजयमाला पटेकर हिचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्यानंतर या विहिरीत इंजेक्शनच्या रिकाम्या खोक्यात अर्भक सापडले होते.


या कलमांनुसार ठोठावली शिक्षा
सुदाम मुुंडे, सरस्वती मुंडे व महादेव पटेकर यांना भादंवि ३१२, ३१३, ३१४, ३१५ तसेच एमटीपी अॅक्ट कलम ३ व ५ नुसार दोषी ठरवण्यात आले. दहा वर्षे सक्तमजुरी  व प्रत्येकी ५० हजारांची शिक्षा न्यायालयाने त्यांना  ठोठावली.


१९७८ पासून करायचा गर्भपात
डॉ. सुदाम हा अस्थिरोगतज्ज्ञ  आहे. सुदामने औरंगाबादच्या घाटीतून एमबीबीएस केले. तो १९७८ पासून गर्भपात करत असल्याचे  तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालात नमूद केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...