आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनरेट्यामुळे परळी येथील वैद्यनाथाच्या पिंडीवर बसवलेले चांदीचे आवरण नऊ वर्षांनंतर काढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या पिंडीची झीज होऊ नये माहणून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दागिन्यांसाठी दिलेल्या देणगीतून २५ किलो चांदीचे आवरण तयार करून ते पिंडीवर बसवले होते. परंतु भाविकांची स्पर्श दर्शनाची परंपरा खंडित झाल्याने भाविकांसह नागरिकांत संतापाची लाट उसळली. मागील नऊ वर्षांत भाविकांनी उपोषण, आंदाेलन, परळी बंद पाळून न्यायालयात धाव घेतली होती. शेवटी जनरेट्यापुढे देवल कमिटी हतबल झाली असून १३ जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता देवल कमिटीने पिंडीवरील चांदीचे आवरण बाजूला करताच  वैद्यनाथ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. परंतु सण, उत्सवाच्या दिवशी पिंडीच्या संरक्षणासाठी आवरण कायम राहणार आहे.अभिषेकासाठी   शुद्ध पाण्याबरोबच साहित्य वापरण्याच्या सूचना पुरोहित व दुकानदारांना देण्यात आल्या असून यांच्याकडून हमीपत्र घेण्यात येईल. 


बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथे वैद्यनाथाचे स्पर्श दर्शन घेण्याची परंपरा होती. ही परंपरा वैद्यनाथ देवल कमिटीने २०११ मध्ये  बंद केली होती.  लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथाच्या पिंडीसाठी अलंकारासाठी दिलेल्या रकमेमधून कमिटीने वैद्यनाथाच्या पिंडीवर २५ किलो  चंादीचे आवरण तयार केले होते. २०११ मध्ये महाशिवरात्रीला देवल कमिटीचे तत्कालीन सचिव बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते बसवले. आवरणामुळे भाविकांना वैद्यनाथाचे स्पर्श दर्शनाचे पुण्य मिळत नसल्याने भोजराज पालिवाल यांच्यासह अनेक भाविकांनी हे आवरण हटवण्याची मागणी केली.  तेव्हा कमिटीने रासायनिक पदार्थामुळे वैद्यनाथाच्या पिंडीची  झीज होत असल्याने ही झीज थांबवावी म्हणून  आवरण बसवले असल्याचे सांगत  न्यायालयात जावे , असा सल्लाही दिला होता. 


चांदीचे आवरण हटवण्यासाठी भाविकांनी एक  स्पर्श दर्शन कृती समिती स्थापन करून स्वाक्षरी मोहीम घेत हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्या धर्मादाय आयुक्तांकडे पाठवल्या. १ सप्टेंबर २०१५  रोजी गोपाळ आंधळे व अतुल दुबे यांनी वैद्यनाथाच्या पायऱ्यांशेजारी उपोषण केले होते. त्यानंतर ३० सप्टेंबर २०१५  रोजी  नागरिकांनी  कडकडीत बंदही पाळला होता. ऑक्टोबर २०१५  मध्ये सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई राठोड  यांच्यासह महिलांनी  वैद्यनाथ मंदिरात अनधिकृतपणे  प्रवेश  करून  पिंडीवरील चांदीचे आवरण काढून गाभाऱ्याबाहेर आणले. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे  देवल कमिटीने पुन्हा हे आवरण पिंडीवर बसवले. चांदीच्या आवरणाविरोधात जनक्षोभ वाढल्याने तत्कालीन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी हे आवरण काही काळासाठी बाजूला काढून स्पर्श दर्शन उपलब्ध करून दिले होते. 


१०  जुलै २०१९ रोजी शहरातील ३०० महिलांनी वैद्यनाथास जलाभिषेक केला. पिंडीवरील चांदीचे आवरण काढण्याची मागणी केली होती. आजपर्यंत आंदोलने , उपोषणांना दाद न देणाऱ्या  वैद्यनाथ देवल कमिटीने १३ जुलै २०१९  रोजी पहाटे साडेपाच वाजता चांदीचे आवरण  काढले.


शंकराचार्यांनी कोर्टाच्या परवानगीने घेतले होते दर्शन 
शृंगेरी पीठाचे शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती महास्वामी  हे बीड येथे  काही महिन्यांपूर्वी  आले तेव्हा त्यांनी  परळीच्या वैद्यनाथाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त  केली होती तेव्हा  वैद्यनाथ देवल कमिटीने स्पर्श दर्शन देण्यास त्यांना स्पष्ट नकार दिला.  तेव्हा शंकराचार्यांनी ३ मार्च २०१९  रोजी  स्पर्श दर्शनासाठी न्यायालयाची  विशेष परवानगी आणली होती. 


शुद्ध साहित्य वापरा 
वैद्यनाथाच्या पिंडीवरील  चांदीचे आवरण काढण्याचा  निर्णय घेण्यात आला.  सण, उत्सवाच्या  दिवशी  आवरण बसवले  जाईल. पिंडीची झीज होऊ नये यासाठी शुद्ध साहित्य वापरण्याच्या सूचना पुरोहितांना व मंदिर परिसरातील दुकानदारांना दिल्या. - राजेश देशमुख, सचिव, वैद्यनाथ देवल कमिटी, परळी वैजनाथ


आवरण व आंदोलने 
* २०११ -  महाशिवरात्रीला  देवल कमिटीकडून  वैद्यनाथाच्या पिंडीला चांदीचे आवरण अर्पण 
* १ सप्टेंबर २०१५-  वैद्यनाथाच्या पायऱ्यांशेजारी  स्पर्श दर्शन समितीचे उपोषण 
* ३० सप्टेंबर २०१५-  पिंडीवरील आवरण काढावे म्हणून  नागरिकांचा बंद 
* ऑक्टोबर २०१५ -  महिलांनी  पिंडीवरील आवरण काढून गाभाऱ्याबाहेर आणले. 
* १० जुलै २०१९ - ३०० महिलांनी आवरण काढण्याची लावून मागणी धरली होती.
* १३ जुलै २०१९ - पिंडीवरील आवरण काढले.

बातम्या आणखी आहेत...