आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींच्या खांद्यावरील औताचे ओझे घालवण्यासाठी दिली बैलजोडीची भेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - बिकट आर्थिक स्थितीत कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी ठेक्याने घेतलेल्या शेतात पेरणीसाठी बैलजोडीही नसल्याने स्वतःच्या दोन मुलींकरवी पेरणीचे काम करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्याची दखल घेत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी शुक्रवारी (२६ जुलै) बैलजोडीची भेट दिली. 


परभणी विधानसभा मतदारसंघातील पिंगळी बाजार या गावातील बाबूराव राठोड हे भूमिहीन आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नीसह चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे. सुरुवातीस ऊसतोड कामगार म्हणून त्यांनी काम केले. नंतर रसवंतीचा व्यवसायही त्यांनी गावात चालवला होता. परंतु यावर मोठा कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांनी गावातील एका संस्थानची पाच एकर जमीन वार्षिक ठेक्याने कसण्यासाठी घेतली होती. स्वतःजवळ कोणतीही साधनसामग्री नसल्याने या वर्षी पेरणी करण्याचा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. औत उभारून त्या औताला बैलजोडी नसल्याने त्यांनी चक्क दोन मुलींनाच औताला जुंपले. पत्नी लक्ष्मी व ते स्वतः पेरणीच्या या कामात राहिले. याची माहिती समाजमाध्यमातून समोर आली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ठेक्याने शेती घेऊन ती कसण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. त्यांच्या या परिस्थितीचे चित्रण समोर आले. 


मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसावरील खर्च टाळला : याची दखल भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी घेत राठोड कुटुंबीयांची संपूर्ण चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसही दोन दिवसांपूर्वी झाल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्य उपक्रमांवर खर्च करण्याऐवजी भरोसे यांनी या राठोड कुटुंबीयांना मदत करण्याचा संकल्प सोडला हाेता.


चेहऱ्यावर फुलले हास्य
शेतीकामासाठी राठाेड कुटुंबीयांना बैलजोडी घेऊन देण्याचा निर्णय घेत शुक्रवारी एका छोटेखानी कार्यक्रमात बाबूराव राठोड व त्यांच्या पत्नी लक्ष्मी राठोड यांचा सत्कार करत भरोसे यांनी त्यांना बैलजोडी दिली. त्या वेळी राठोड कुटुंबीयांच्या चेहऱ्यांवरील समाधानाचे हास्य पिंगळीच्या ग्रामस्थांसह उपस्थितांनी अनुभवले. या वेळी गोपाळ गरुड, बालाजी गरुड, महेश गरुड, भागवत गरुड, श्रीनिवास गरुड, रामेश्‍वर गरुड, निवृत्ती गरुड, गोविंद गरुड, संतोष गरुड, राजू गरुड, प्रसाद गरुड, गजानन गरुड, संतोष जाधव, वैभव गरुड, नागेश गरुड, बालासाहेब गरुड, नितीन गरुड, शंकर गरुड, बबलू गरुड, एकनाथ गरुड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...