आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रवीण देशपांडे
परभणी - प्लास्टिकच्या वापराने होणाऱ्या भयावह परिणामांपासून दूर राहण्यासाठी प्लास्टिक मुक्तीचा संदेश घेऊन निघालेले परभणीचे अभियंता शैलेश कुलकर्णी यांनी केवळ १४ दिवसांत भारतासह नेपाळ व भुतान या दोन देशांत जनजागृतीचा उपक्रम राबवला. भारतातील ९ राज्यांतून आपल्या बुलेट मोटारसायकलवरून तब्बल साडेसहा हजार किलो मीटरचे अंतर पार करीत प्लास्टिकच्या वापरा विरोधात शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था व नागरिकांपर्यंत जनजागृतीचा संदेश पोहचवला.
शहरातील एक उपक्रमशील युवा व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे शैलेश कुलकर्णी हे अभियंता आहेत. सातत्याने विविध ज्वलंत विषय घेऊन त्या विषयावर देशाच्या विविध कानाकोपऱ्यात जाऊन जनजागृती करण्याचे काम ते करीत असतात. विशेषतः हे सर्व उपक्रम त्यांनी बुलेटवरून प्रवास करत राबवले आहेत. यंदा त्यांनी प्लास्टिक मुक्तीचा संदेश घेऊन मोठी परिक्रमा हाती घेतली. परभणीतून सुरू झालेल्या या त्यांच्या परिक्रमेला लायन्स क्लब प्रिन्स व आर्य वैश्य बँकेने सहकार्य केले. महाराष्ट्र, तेलंगना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा व छत्तीसगड या ९ राज्यांसह त्यांची ही परिक्रमा नेपाळ व भूतानपर्यंत पोहोचली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रस्त्यांच्या दुरावस्थेला, मुसळधार पावसाला तोंड देत दऱ्या-खोऱ्यांतून, जंगलातून त्यांची ही राईड एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच सुरू होती. या दरम्यान मार्गावर प्रत्येक ठिकाणी शाळा, महाविद्यालयांसह संस्था व अगदीच सीमेवरील जवानांनाही प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम त्यांनी सांगितले. या मार्गावर नाष्टा व जेवताना वा रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकालाच त्यांनी प्लास्टिक वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणिव करून देत जनजागृतीचा प्रयत्न केला. या परिक्रमेत पत्नी अपर्णा व कन्या राजलक्ष्मी यांची भक्कम साथ मिळाल्याचेही कुलकर्णी म्हणाले.
अभ्यासासाठी भूतानमध्ये
भूतानमध्ये दहा वर्षांपासूनच प्लास्टिक बंदी आहे. तरी देखील या परिक्रमेत भूतानच्या केलेल्या समावेशाबद्दल कुलकर्णी म्हणाले, अत्यंत स्वच्छ व शिस्तबद्ध अशा या देशाने प्लास्टिक बंदी अगदी काटेकोरपणे राबवली आहे. त्यामुळे त्यांनी हा उपक्रम कशाप्रकारे सुरू केला, तो कसा राबवला. याचा अभ्यास करण्यासाठी आपण भूतानमध्येही दाखल झालो. तेथील नागरिकांतील स्वयंस्फूर्तता अधिक भावल्याचेही ते म्हणाले.
जाणीव आहे, जागृतीची गरज
देशातील ९ राज्यांत व नेपाळमध्येही फिरताना लोकांमध्ये प्लास्टिक बंदीबद्दल निश्चितच सकारात्मकता आहे. त्यांना जाणिव आहे, परंतु दुष्परिणामांबद्दल फारशी माहिती नाही. सरकारने नियम केले आहेत. परंतु त्यासाठी जनजागृतीची गरज आहे. प्लास्टिकच्या वापरानंतर त्याचा पुनर्वापर होत असतो. मोठ्या शहरांमध्ये त्या दृष्टीने प्रकल्पही सुरू आहेत. याची जाण ठेऊन प्लास्टिक कचरा इतरत्र न फेकून देता त्याचा पुनर्वापर होण्यासाठी तो निश्चित ठिकाणी संकलित करण्याचे काम केले जावे. हे प्लास्टिक रस्त्यावर व इतरत्र फेकून देऊ नये, त्याचे विघटन होत नसल्याने जमिनीवर प्लास्टिक थर तयार होतो. त्यामुळे हे टाळले पाहिजे असेही शैलेश कुलकर्णी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.