आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार-आमदारांच्या मनोमिलनाचे परभणीकरांना सुखद धक्के

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खा.संजय जाधव व अामदार डाॅ.राहुल पाटील यांच्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनाेमिलनाचा प्रयत्न झाला. - Divya Marathi
खा.संजय जाधव व अामदार डाॅ.राहुल पाटील यांच्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनाेमिलनाचा प्रयत्न झाला.

परभणी - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत युतीचा धर्म पाळण्याऐवजी आपल्या विरोधात खुलेआमपणे कटकारस्थाने केलेल्या शिवसेनेचे स्थानिक आमदार डॉ.राहुल पाटील व भारतीय जनता पक्षाचे आ.मोहन फड या दोघांचा  विधानसभा निवडणुकीत हिशोब चुकता करू, असे जाहीर वक्तव्य केलेल्या खा.संजय जाधव यांची आ.पाटील पाठोपाठ आ.फड यांनी गेल्या दोन दिवसात निवासस्थानी भेट घेऊन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. 
 चार महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी मोठे मताधिक्य मिळवून विजय मिळवला. तेव्हा आपल्या विजयात निष्ठावान कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक व मित्र परिवाराचाच मोठा वाटा राहिल्याची प्रतिक्रिया खा.जाधव यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केली. विरोधक राहिले दूर मित्रपक्ष व स्वकियांचाच प्रखर असा विरोध आपणास त्रासदायक ठरत होता, असेही नमूद केले. स्वकीय असो की मित्र ज्या-ज्या मंडळींनी आपल्या विरोधात कटकारस्थाने केली. त्यांचे आपण निश्‍चितच हिशोब चुकते करू, असे खासदार जाधव यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे बोलवून दाखवले होते. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत खा.जाधव हे स्थानिक आमदार पाटील व आमदार फड यांच्या विरोधात उभे राहतील, असे स्पष्ट चित्र दिसत होते. परंतु आपण त्यांच्या सारखे नाहीत. युतीचा धर्म निश्‍चीत पाळू अशी पुष्टी जोडून खा. जाधव यांनी त्या भावनांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्नही केला. 

या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खासदार जाधव यांच्या परभणी व पाथरीतील भूमिकेबाबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांत प्रश्‍न चिन्ह उभे केले जात होते. विशेष म्हणजे खा.जाधव यांनी त्या अनुषंगाने या काळात त्या भूमिकेचा पुनरुच्चार केला नाही. त्यामुळेच कार्यकर्त्यांत संभ्रम अवस्था निर्माण झाली. या दरम्यानच गेल्या दोन दिवसांत घडलेल्या दोन घटना कार्यकर्त्यांना सुखवणाऱ्या ठरल्या. 

भेटीची फलश्रुती काळच ठरवेल :
खासदारांबरोबर भेटीच्या या दोन प्रसंगाची छायाचित्रे सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाली. त्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही येऊ लागल्या. पाटील व खासदार भेटीचे फोटो जुने आहेत, अशाही कॉमेंट्स अाल्या. परंतु फड व खासदार जाधव यांच्या भेटीचे फोटो ताजे असल्याचे निदर्शनास आल्याने या भेटीबाबत कोणीही आक्षेपार्ह टिप्पणी केली नाही.  येत्या काळातच या भेटीची फलश्रुती ठरेल. 
 

आ. पाटलांपाठोपाठ फडही भेटीस 
राहुल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर खा. जाधव यांची निवासस्थानी भेट घेऊन सत्कारही केला होता. त्यानंतर ते गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या भेटीस बंगल्यावर दाखल झाले होते. ही सदिच्छा भेट आहे, असे पाटील यांनी नमूद केले.  यावेळी खा. जाधव यांनी पाटील यांना पेढा भरवला. या भेटीपाठोपाठ आमदार मोहन फड यांनीही बुधवारी बाळासाहेब ठाकरे नगरातील खासदारांच्या बंगल्यावर धाव घेतली .