आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांचे संस्कारच वाढवतात मनामध्ये सेवाभाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैलाश अग्रवाल

उदयपूरमधील भिंडर येथे २ जानेवारी १९४७ राेजी माझा जन्म झाला. वडील मदनलाल अग्रवाल आणि आई साेहनीदेवी भक्तिमय जीवन व्यतीत करीत असत. वडिलांचे भांड्याचे लहानसे दुकान हाेते, गरजेपुरते उत्पन्न मिळायचे. याशिवाय गरीब, गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असत. त्यांच्यामुळेच लहानपणापासून साधू-संतांचे सान्निध्य मला लाभले. याच काळात महान व्यक्तित्वांवर आधारित पुस्तके वाचली. त्यामुळे माझ्या मनात मानवजातीविषयी करुणा-दया आणि सेवेचे बीज अंकुरले.

अभ्यासात हुशार हाेताे. सिराेही पाेस्ट ऑफिसमध्ये नाेकरी मिळाली. १९७६ ची घटना आहे, त्या वेळी सिराेही जिल्ह्याच्या पिंडवाडा गावात एका बसला अपघात झाला. त्यात माझे इष्टमित्र जखमी झाले. तत्काळ घटनास्थळी पाेहाेचलाे. आराेग्य केंद्राकडून उपचार मिळत नसल्यामुळे ४० जखमी तडफडत हाेते. सात जणांचा मृत्यू झाला हाेता. सगळ्या जखमींना सिराेही रुग्णालयात कसेबसे दाखल केले. पुरेशी सुविधा नव्हती. काेणाला रक्त हवे हाेते, तर काेणाकडे पैसे नव्हते.

नाेकरीतून रजा काढून मी जखमींची सेवा केली. एके दिवशी किशन भिल यांच्याशी भेट झाली. त्यांनी वाढलेल्या जेवणाचा काही भाग बाजूला ठेवला हाेता. विचारल्यावर त्यांनी सांगितले, मी उपाशी आहे, परंतु माझ्यासाेबत मुलगा आणि भाऊदेखील आहे. आमच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी हे जेवण ठेवले आहे. तेव्हा मी निर्धार केला की, अशा लाेकांची मदत कशी करता येईल?

त्यानंतर मी नातेवाईक, परिचितांना 'नारायण सेवा' लिहिलेले काही कंटेनर दिले आणि आग्रह केला की, यामध्ये राेज थाेडे पीठ टाका. त्या पिठाच्या पाेळ्या पत्नी बनवायची आणि सायकलवरून एमबी हाॅस्पिटलमध्ये गरीब, गरजूंना पुरवत हाेताे. येथूनच 'नारायण सेवा'चे व्रत सुरू झाले. एकदा उदयपूरमध्ये दुष्काळ पडला तेव्हा नारायण संस्थानच्या नावाने मी सधन लाेकांकडून कपडे, औषधी, भाेजनसामग्री घेऊन ग्रामीण आणि आदिवासी परिसरातील छावण्यांमधील गरजूंना पुरवत हाेताे.

एकदा छावणीतील भाेजन पुरवत असताना पाेलिओग्रस्त मनुष्य रांगत आला आणि मदत मागू लागला. त्यास मी मुंबईत नेले, तेथे उपचार करवले. तेव्हा दिव्यांगासाठी काम केले पाहिजे असा निर्धार केला आणि अनेक पाेलिअाेग्रस्तांवर मी उपचार करवून आणले. मुंबईतील उपचाराचा खर्च महागडा ठरायचा त्यामुळे उदयपूरमध्ये रुग्णालय उभारण्याचे स्वप्न पाहिले. १९९७ मध्ये उद्याेगपती चैनराज लाेढा यांच्या आर्थिक साहाय्याने १५१ बेडच्या 'मानव मंदिर रुग्णालय'ची पायाभरणी केली. येथे पाेलिओग्रस्तांवर नि:शुल्क ऑपरेशन आणि उपचार केले जातात.

दिव्यांगांना स्वावलंबी बनवायचे एवढाच उद्देश मनाशी बाळगला हाेता. कर्कराेग विशेषज्ञ डाॅ. आर. के. अग्रवाल आणि बिसलपूर यांचे राजमल जैन यांनी या कामात माेठे याेगदान दिले. १९८५ ते २०१८ पर्यंत अडीच लाख दिव्यांगांना माेफत तीनचाकी, व्हील चेअर पुरवण्यात आल्या. आता हे हाॅस्पिटल ११०० बेडचे झाले आहे. आतापर्यंत २० हजारांहून अधिक जणांना कृत्रिम हातपाय लावण्यात आले आहेत. फिजिओथेरपी, कॅलिपर, क्रचिस, श्रवणयंत्र, दृष्टिहीनांसाठी छडी आणि कृत्रिम अंग नि:शुल्क दिले जातात.

दिव्यांग, निराधार रुग्णांचे ऑपरेशन, औषधी, रुग्णांसाेबत राहणाऱ्या नातेवाइकास राहण्याची-भाेजनाची व्यवस्था माेफत केली जाते. येथे १२५ डाॅक्टरांची टीम आहे. दिव्यांगांना माेबाइल दुरुस्ती, संगणक, शिलाई प्रशिक्षण आम्ही पुरवताे, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुरू राहील. नारायण संस्थानने आतापर्यंत २४०० दिव्यांग आणि निर्धन दांपत्यांचा विवाह घडवला आहे.

माझ्या मानवसेवेची सुरुवात ३४ वर्षांत देशभरातील ४ लाखांहून अधिक दिव्यांगांना नवजीवन देईल याची कधी कल्पना केली नाही. ईश्वराच्या कृपेने आतापर्यंत ३.७० काेटी लाेकांना जेवण देण्याची संधी मिळाली. १९९० मध्ये आदिवासी आणि ग्रामीण भागातील बेघर मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या हेतूने अनाथालय सुरू केले. आमच्या नारायणसेवा संस्थानच्या देशात ४८० आणि विदेशात ८६ शाखा आहेत. जगभरातील मानांकित बिगर लाभाच्या संस्थांमध्ये याचा समावेश हाेताे. आतापर्यंत मला अनेक पुरस्कार मिळाले, परंतु राष्ट्रपती डाॅ. कलाम यांनी व्यक्तिगत क्षमतेद्वारे केलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी २००३चा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गाैरवले. २००८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

(शब्दांकन : गिरीश शर्मा, उदयपूर)
नारायण सेवा संस्थान, उदयपुर संस्थापक-अध्यक्ष, पद्मश्री कैलाश अग्रवाल
 

बातम्या आणखी आहेत...