आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यावरचे ठसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा दोन वेळा पुलित्झर पुरस्कारप्राप्त अमेरिकी पत्रकार-लेखक. सध्या तो “आऊट ऑफ इडन वॉक’ या ऐतिहासिक दशकी मोहीमेंतर्गत, आफ्रिका खंडात जन्मलेल्या मानवाने पहिल्यांदा स्थलांतराची जी वाट चालली, त्या वाटेवरून चालत  जग पायी पालथे घालतो आहे. त्यातल्या भारतातल्या पदयात्रेत राजस्थानच्या थरच्या वाळवंटी प्रदेशात त्याला आलेल्या अनुभवांचे हे कथन. नुकत्याच पाळल्या गेलेल्या जागतिक जलदिनानिमित्त...


तुम्ही जादूगार आहात का?’
तळपत्या सूर्याखालून राजस्थानातल्या थर वाळवंटातून चालणाऱ्या आम्हाला हा प्रश्न विचारला आहे, येथील गावकऱ्यांनी. एका भारवाहू गाढवासह आम्ही भारतभर फिरत आहोत. स्थानिक लोक आम्हाला डोंबारी, वैदू, सर्कसवाले समजतात. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दरवेळी अर्थातच हो हेच असते. आमच्याकडे जादू आहे. पण ती तुमच्याकडेही आहे. 

 

ती पाण्यात असते.
माणूस हा प्राणी म्हणजे, अंमळ खाऱ्या पाण्याची फिरती विहीरच. आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण हे तेवढेच आहे, जेवढे या भूतलाचे क्षेत्रफळ समुद्राने व्यापले आहे, म्हणजेच ७१ टक्के. हे काही फार मोठे गुपित नाही, अगदी शाळकरी मुलांनाही ही गोष्ट माहीत आहे. जलमय ग्रहावर जन्मलेले आपण एकप्रकारचे जलजीवच आहोत. पाणी सगळीकडेच आहे आणि कुठेही नाही. परिवर्तनशील, अस्थिर आणि नित्य प्रवाही असणारे असे हे एक चंचल संयुग आहे. वायू ते द्रव आणि द्रव ते घन तसेच या उलटही याचा आकार सातत्याने बदलत असतो. (दक्षिण ध्रुवावरील दहा लाख वर्ष जुन्या दीड मैल जाडीच्या हिमथराखालीदेखील संथगतीने का होईना, हे वाहतच असते.) भूतलावरील एकूण पाण्यापैकी ९७.२५ टक्के पाणी हे समुद्रात आहे. उत्तर-दक्षिण ध्रुव आणि हिमनद्यांमध्ये २ टक्के पाणी अडकलेले आहे. उणेपुरे पिण्याजोगे जे काही उरते- त्या बहुमोल अशा ०.७५ टक्के द्रव स्वरूपातील ताज्या पाण्यावर अखिल मानवजातीचे अस्तित्व अवलंबून आहे. तेच पाणी आपण एखाद्या वेडगळाप्रमाणे वाया घालवत असतो. १.३ अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतातील अर्धी लोकसंख्या पाण्याच्या दुर्भिक्षाला तोंड देत आहे. दिल्ली, बंगळूरू आणि हैदराबादसह भारतातील २० शहरांनी पुढील दोन वर्षांत आपले जलधारक (aquifers) पूर्णपणे आटवलेले असतील. याचाच अर्थ तब्बल दहा कोटी लोकांना शून्य भूजलावर जगावे लागेल. भारताच्या अन्नदात्या राज्यांपैकी एक असलेल्या पंजाबमधील शेतकरी म्हणतात, ‘एकाच पिढीत आमच्या येथील भूजल पातळी ४०, ६० ते १०० फुटांनी खोल गेली आहे.’ शेवटच्या हिमयुगानंतर, हजारो वर्षांपासून जपलेल्या पाण्याच्या वारश्याचा औद्योगिक शेती आणि हरितक्रांतीसाठी अंधाधुंद उपसा होत आहे. यावर शासनाचे उत्तर काय? तर दुष्काळी भागांची तहान भागवण्यासाठी आणखी मोठी धरणे बांधा (भारतात आधीच ५,००० मोठी धरणे असून त्यातील सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत) आणि नद्यांचा प्रवाह बदला. दरम्यान, बदलत्या तपमानामुळे मोसमी पाऊस अधिकाधिक अनियमित होत चालला आहे. आणि दरवर्षी ताज्या पाण्याची मागणी करणाऱ्या १.६ कोटी लोकांची त्यात भर पडत आहे.’

 

‘संवर्धन? त्याबद्दल कोणीच बोलत नाही,’ निसर्ग छायाचित्रकार असलेल्या आणि थारमधील कोरडवाहू शेतकऱ्यांमध्ये राहिलेल्या, माझ्या पायी प्रवासातील सोबती आरती कुमार-राव सांगत होत्या.

 

भारतातील वाळवंटात राहणाऱ्या लोकांची पावसाचे पाणी साठवण्याची पद्धत प्राचीन आणि विलक्षण आहे. हे लोक जमिनीच्या व्यापक पृष्ठभागाचे बारकाईने निरीक्षण करून त्यावरील सौम्य उतार शोधतात. त्यानंतर आगोरची निर्मिती केली जाते. आगोर म्हणजे तलावाच्या परिघातील पाणी तलावात येण्यासाठी विशिष्टप्रकारे बांधून तयार केलेला उतार. आगोरमध्ये पडलेले पावसाचे पाणी खडीन या तात्पुरत्या तलावांमध्ये साठवले जाते. सिंचनाशिवाय दुष्काळातही येणारी ज्वारी-बाजरीसारखी पिके घेण्यासाठी, या लोकांनी शेकडो, कदाचित हजारो वर्षांपासून ही पावसाचे पाणी साठवण्याची पद्धत जपली आहेत.  कुमार-राव आणि मी वाळवंटातील एका विहिरीजवळ थांबलो. सूर्य आग ओकत होता. तापमान ४५ डिग्रीपर्यंत गेले होते. आम्हाला तहान लागली होती. मी एका लाकडी दारातून पत्र्याचा बादलीवजा डब्बा आत टाकला. पाण्याचा छपाक असा आवाज आला आणि ते गोड ओझे मी दोरखंडाने वर ओढले. 

 

‘ओय!’ एक माणूस ओरडला. ‘काय करत आहात?’
एका झोपडीतून बाहेर आलेला तो माणूस एक मेंढपाळ होता. हे त्याने साठवलेले पावसाचे पाणी होते. जे आसपासच्या कित्येक एकर परिघातून या हाताने खोदलेल्या खड्ड्यात जमा केले होते. ‘तुम्हाला हवे तेवढे पाणी तुम्ही पिऊ शकता’ तो आम्हाला म्हणाला, ‘हा प्रत्येक वाटसरूचा अधिकार आहे, पण तुम्ही काही धुवू शकत नाही.’  


शेवटी सालासर या तीर्थक्षेत्रात आमचे मार्ग बदलताना, कुमार-राव या आपले दुखरे पाय एका टोपलीतील याच पारदर्शक द्रव्यात भिजवणार आहेत.पाण्याची सर कशालाच नाही. ऑक्सिजनचा एक आणि हायड्रोजनचे दोन अणु.

 

पाण्याचे रेणू हे बाणाच्या टोकासारखे, कोपरासारखे वाकलेले असतात. यामुळे त्यांच्यात एक विशिष्ट ध्रुवीयपणा, एक अतिसूक्ष्म प्रभार असतो. जो संपूर्ण जगालाच आकार देतो. मेंदूतील पेशी, पर्वत, सकाळची कॉफी आणि टॅक्टॉनिक प्लेट्स यांना सर्वांना जोडणारे आणि मोडणारे हे रेणू म्हणजे, एक जादुई द्रावकच!   

 

थर वाळवंटाच्या किनाऱ्यावरून चालताना मी अशा गावांमधून फिरलो, जेथे पाण्याच्या बदललेल्या वापराने लोकांच्या आयुष्यात विष कालवले आहे. पूर्वी जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी माणसाची तहान भागवण्यास पुरेसे होते. आता, आधुनिक शेती आणि वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी हजारो कूपनलिका (बोरवेल्स) खोदल्या गेल्या आहेत. मशीनच्या मदतीने जमिनीत खोलवर पाडल्या जाणाऱ्या या छिद्रांनी जमिनीची अक्षरशः चाळणी केली आहे. पण कधीतरी मानवास दुर्लभ असलेला हा सर्वच पाणीसाठा आरोग्यास हितकारक नाही. यात खनिजे आहेत, फ्लुरॉइड आहे, विषारी द्रव्ये आहेत. त्यांचे या पाण्यातील प्रमाण गावागावांनुसार बदलत आहे. हे केवळ समस्येचे अर्धचित्र आहे, यात गुणवत्ता दिसते, प्रमाण नाही.

 

‘तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या पाण्यातील फ्लुरॉइडचे प्रमाण सुरक्षितत मानल्या गेलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे?’ माझ्या पायी प्रवासातील नवे सोबती, पर्यावरणवादी सिद्धार्थ अगरवाल यांनी एकत्रित जमलेल्या गावकऱ्यांना विचारले. 

 

भारतातील नद्यांच्या कडेने हजारो किलोमीटरचा पायी प्रवास केलेले अगरवाल बऱ्याचदा गावातील नळांचे पाणी तपासण्यासाठी रस्त्यात थांबतात. त्यांच्या स्मार्टफोनला जोडलेल्या एका उपकरणाच्या मदतीने ते फ्लुरॉइडचे पाण्यातील प्रमाण तपासतात. पाण्याचे काही थेंब एका धातूच्या डब्ब्यात टाकून, ते आपल्या फोनद्वारे त्याचे छायाचित्र घेतात. त्यांच्या फोनमधील एक अॅप त्या पाण्याच्या रंगाचे विश्लेषण करून त्यातील खनिजांचे प्रमाण दर्शवते. पाण्यातील फ्लुरॉइडच्या आधिक्यामुळे दात आणि हाडांची विकृती जडते.  गावकरी विषण्णतेने मान डोलावतात. बहुदा त्यांना फ्लुरॉइडबद्दल माहिती असते. पण ते काय करतील? अधिकाऱ्यांनी पाणी शुद्धीकरण यंत्र (फिल्टर) पुरवण्याचे वचन दिले आहे. ते वाट पाहत आहेत, दरम्यान टँकरचे पाणी विकत घेत आहेत. किंवा हेच सौम्य स्वरुपातलेविष पीत आहेत. आपले शरीर म्हणजे जिवंत विहीर आहे, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही.  ‘सर्वांत महत्त्वाचा स्तर आपण ज्यावर चालत आहोत तो नाही,’ अगरवाल सांगत होते, ‘तो आहे आपल्या पायाखालील पाण्याचा.’ अगरवाल जमीन पाहतात, ते या एक्सरेच्या चष्म्यातून. जमिनीखालील पाण्याच्या रचनेवरून त्या-त्या क्षेत्रातील झाडे, पिके, मानव संस्कृती सर्वच बदलत असते. हाच जमिनीखालील जगाचा द्रवरूप आधार आज नाहीसा होत चालला आहे.  कित्येक आठवड्यांनंतर, जयपूर शहराजवळील मचूळ पाण्याचा सांभर तलाव ओलांडताना मला काही स्त्रिया तेथे काम करताना दिसल्या. जवळपास दीड-दोनशे रूपये रोजाने त्या राबत होत्या. तासंतास मागे-मागे चालत, एका होरपळून काढणाऱ्या विस्तृत मैदानात मिठाचे ढीग रचत होत्या. उष्णतेच्या झळांमुळे त्यांचे पाय अचानक दिसेनासे होतात, पुन्हा अवतरतात. किती वेदनादायी हे दृश्य. कोणातरी जादुगाराचा क्रूर आब्राकाडाब्रा! पण तो जादुगार, दुसरा कोणी नाही. आपणच आहोत.

("पॉल सॅॅलोपेक यांचा हा लेख प्रथम नॅशनल जिओग्राफिकच्या आउट ऑफ एडन या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला.’)

 

अनुवाद : परीक्षित सूर्यवंशी

(suryavanshipd@gmail.com)
 

बातम्या आणखी आहेत...