शिक्षक दिन विशेष : परितेवाडी जि.प.ची शाळा बनली शिक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र
परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळा आणि त्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षण पद्धती महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर नावाजली आहे. एकेका
-
सोलापूर- परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळा आणि त्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षण पद्धती महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर नावाजली आहे. एकेकाळी गोठ्यात भरत असलेली ही शाळा आज राज्यातील शिक्षकांच्या आकषर्णाचे केंद्र बनली आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे पाठ्यपुस्तकातील घटक जगाच्या पाठीवर जिथे कुठे अस्तित्वात असतील त्याठिकाणी व्हर्च्युअली जाऊन तेथील स्थानिक नागरिक, अभ्यासक यांच्याकडून त्याविषयी माहिती घेऊन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शिकण्याला मुले प्राधान्य देतात. त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी व नवीन गोष्टी शिकून घेण्याची वृत्ती वाढण्यास मदत झाली आहे.
शाळा-शिक्षक-विद्यार्थी या त्रिसूत्रीवर आधारित संचालन प्रणाली
छोट्याशा वस्तीशाळेची ही गगनभरारी वाटते तितकी सहजसोपी नाही. अनेक अडथळ्यांवर मात करून, प्रसंगी प्रशासकीय कारवाईला सामोरे जाऊन आज हे यश शाळेला मिळाले आहे. शाळा-शिक्षक-विद्यार्थी या त्रिसूत्रीवर आधारित संचालन प्रणाली हेच यामागील रहस्य आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने मुले अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकतात, हे संशोधनाच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. मुलांच्या शैक्षणिक वर्तनाचे विश्लेषण करून त्याला पूरक असे अध्यापन करण्यासाठी तंत्रज्ञान वापरले जाणे महत्त्वाचे आहे. मुलांच्या शैक्षणिक गरजांनुसार वेगवेगळे अध्ययन अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. वन नोट, स्वेय, फ्लिपग्रीड, प्लिकेर यांसारख्या अॅप्लिकेशनमुळे मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे मुलांना स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी अशा अॅप्लिकेशनमधून मिळत आहे.
इतर देशातील मुलांशी संवाद
सन २००९ मध्ये जेव्हा शाळेत रुजू झालो तेव्हाची परिस्थिती फारच विचित्र होती. एक वर्ग खोली गोठा म्हणून वापरत. दुसऱ्या खोलीत वर्ग भरत होता. पालकांची अनास्था, शिक्षणाविषयी उदासीनता यावर मात करायची होती. पालकांशी संवाद साधून जागरूकता वाढवली. मुलांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च ही गुंतवणूक आहे, हे त्यांना पटवून दिले. ९ वर्षात शाळेतील कॉम्प्युटरसारखी साधने लोकसहभागातून उपलब्ध झाली. मुले ऑनलाइन झाली. इतर देशातील मुलांशी संवाद करू लागली.
- रणजितसिंह डिसले, परितेवाडी, जि. प. शाळा