आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, परळी भाजपकडून पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- राष्ट्रवादीचे नेते आणि परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धनंजय यांच्यावर बहिण आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर अश्लील विधान केल्याचा आरोप आहे. केजमधील विडा गावात झालेल्या एका प्रचार सभेत धनंजय मुडेंनी विचित्र हातवारे करत पंकजा मुंडेबद्दल अश्लील विधान केले होते. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत, ही व्हिडिओ क्लिप एडीटेड असल्याचे स्पष्ट केले आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, ही क्लिप एडीट केलेली आहे. निवडणुक जिंकण्यासाठी विरोधकांनी खेळला डाव असून, मला विलन दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे." संबंधित क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच. बीडमधील भाजप कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. त्यानंतर त्यांनी परळी पोलिस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली.
परळी भाजप अध्यक्ष जुगल किशोर लोहिया यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ही एफआयआर शनिवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आली. धनंजय मुंडे विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 500 अंतर्गत (बदनामी करणे), 509(शब्द, हावभाव किंवा अपमान करण्याच्या हेतूने हातवारे करणे) आणि 294 (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे), या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. परळी पोलिस स्टेशनचे पोलिस अधिक्षक पुरुषोत्तम चोबे यांनी सांगितले की, लोहिया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांनी केजमधील विडा गावात 17 ऑक्टोबरला झालेल्या सभेत पंकजा मुंडे यांच्यावर अश्लील टीका केली आहे. भाजपने पोलिस स्टेशनशिवाय निवडणूक आयोग आणि राज्य महिला आयोगाकडेही धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. बीडमध्ये धनंजय मुंडेच्या प्रतिकात्म पुतळ्याचे दहन


बीड जिल्ह्यातील शिरूर-कासार येथे काही भाजप कार्यकर्त्यांनी धनंजय मुंड्या प्रतिकात्म पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त केला. दरम्यान, धनंजय मुंडेंनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत, ही क्लिप बनावट असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी आणि जनतेसमोर मला खलनायक दाखवण्यासाठी असे केले जात आहे. माझ्या विडामध्ये झालेल्या सभेतील भाषणासोबत छेडछाड करुन ही क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. शब्द टाकला असता तर माघारही घेतली असती


पंकजा मुंडे आणि माझे नाते रक्ताचे आणि बहीण-भावाचे आहे. तरीही काही लोक बनावट क्लिप बनवून ती व्हायरल करत आहेत. काही लोकांना मी पृथ्वीतलावरच नको. मला जग सोडून जावंसं वाटतंय अशी भावूक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी रविवारी दिली आहे. परळी विधानसभा मतदार संघात प्रचार करताना धनंजय मुंडेंनी कथितरित्या पंकजांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यावरून महिला आयोगाने धनंजय मुंडेंना नोटीस बजावली आहे. त्यानंतरच पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे भावूक झाले. तसेच आपल्यावर लावलेले सर्वच आरोप खोटे असून त्या क्लिपची फॉरेन्सिक चाचणी करण्यात यावी अशी मागणी केली.
अशा प्रकारचे खालच्या पातळीवरील वक्तव्य मी कधीच करणार नाही. एवढेच नव्हे, तर पंकजा मुंडेंनी शब्द टाकला असता तर निवडणुकीतून माघारच घेतली असती. इतक्या वाइट प्रकारे माझी कुप्रसिद्धी केली जात आहे, माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर जीवही देईन असे भावनिक विधान धनंजय मुंडेंनी केले.

बातम्या आणखी आहेत...