आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी येथील वैद्यनाथ देवस्थानाचा रेल्वेच्या तीर्थक्षेत्र यादीत समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी येथील वैद्यनाथाचे मंदिर. - Divya Marathi
परळी येथील वैद्यनाथाचे मंदिर.

धनंजय आढाव 

परळी  - बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ मंदिराचा रेल्वे खात्याच्या तीर्थक्षेत्रांच्या सूचीत समावेश करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतला अाहे. तशा प्रकारचे पत्र बीड जिल्ह्याच्या खा. प्रीतम मुंडे यांना पाठवले आहे. रेल्वेमंत्र्यांच्या या निर्णयाने आतापर्यंत देशभरातील भाविकांना माहीत नसलेल्या परळीच्या वैद्यनाथाबद्दल माहिती होणार असून देशातील भाविकांचा परळीत ओघ वाढणार आहे. रेल्वे खात्याच्या या निर्णयाने परळीतील भाविकांची मोठी मागणी मान्य झाली आहे.

परळीतील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध अाहे. १२ ज्योतिर्लिंगांमध्ये परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य आहे. मंदिराच्या परिसरातील लांब पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. धार्मिक ग्रंथामध्ये परळीच्या ज्योतिर्लिंगाचा बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून उल्लेख आहे. परंतु वैद्यनाथ देवल कमिटीच्या दुर्लक्षामुळे मध्य, उत्तर व पूर्व भारतातील भाविक झारखंडमधील बाबा वैद्यनाथास ज्योतिर्लिंग म्हणून मानत असल्याने केंद्र शासन व रेल्वे खात्याच्या तीर्थक्षेत्रांच्या यादीत परळीच्या वैद्यनाथाचा समावेश नव्हता. यासाठी परळीतील भाविक दहा वर्षांपासून सातत्याने मागणी करत होते. परंतु लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे परळीचे वैद्यनाथ मंदिर केंद्राच्या सूचीत येऊ शकले नव्हते.  
खा. प्रीतम मुंडे यांचा पाठपुरावा : खा. प्रीतम मुंडे यांनी ११ जुलै २०१९ रोजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना एका पत्राद्वारे परळीच्या वैद्यनाथ मंदिराचा रेल्वे खात्याच्या तीर्थक्षेत्रांच्या यादीत समावेश करावा असे पत्र दिले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात प्रश्न उपस्थित करताना रेल्वेच्या तीर्थक्षेत्रांच्या यादीत परळी रेल्वेस्थानकाचा समावेश करावा अशी मागणी केली होती. तसेच मंत्री पंकजा मुंडे यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला होता. दहा वर्षांपासून पाठपुरावा  करत असलेल्या भाविकांच्या या मागणीवर रेल्वेमंत्र्यांनी अवघ्या एक महिन्यात निर्णय घेत १८ सप्टेंबर रोजी खा. प्रीतम मुंडे यांना पत्र लिहून वैद्यनाथांचा रेल्वे खात्याच्या तीर्थक्षेत्र यादीत समावेश करण्यात येत असल्याचे सांगितले.  
 

फटाके फोडून स्वागत
रेल्वेच्या तीर्थक्षेत्र यादीत वैद्यनाथ देवस्थानाचा  रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थक्षेत्र स्थळांमध्ये समावेश झाल्याने भाविकांत आनंद व्यक्त होत आहे. बाहेरील पर्यटकांची संख्या वाढून शहराची बाजारपेठ यामुळे वाढणार आहे. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले आहे. याप्रसंगी खा. डाॅ प्रीतम मुंडे यांच्यासह भाजपचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
 

हा ऊहापोह करण्याचा विषय नाही
परळीचे वैद्यनाथ क्षेत्र हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून त्याचा अनेक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. रेल्वे खात्याच्या यादीत देवस्थानाचा समावेश असणे किंवा नसणे याचा काहीही फरक भाविकांच्या भक्तीमध्ये झालेला नाही.  या निर्णयाचे स्वागत. विरोध व ऊहापोह करण्याचा  विषय नाही. यापूर्वीही आठवड्यातून एक रेल्वेगाडी भाविकांना घेऊन येत होती.  देशभरातील रेल्वेचे भाविक परळीत येण्याची संख्या वाढणार असली तरी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दृष्टीने हा खूप काही मोठा निर्णय नाही.
- राजेश देशमुख, सचिव, वैद्यनाथ देऊळ कमिटी