आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिलीप झगडे
माजलगाव - देशातील विद्यार्थी, युवक वर्ग आज हक्क, अधिकारांसाठी झगडतो आहे. आपल्या ‘देश’रूपी शेतात येणारे पीक म्हणजे हे विद्यार्थी, युवक आहेत. हे पीक चांगलेच येईल व देशाला दिशा देईल. मात्र, जनहितासाठी रस्त्यावर संघर्ष करत असताना तरुणाईने हे लक्षात ठेवावे की संसदीय संघर्षही तितकाच आवश्यक आहे, असे प्रतिपादन माकपचे आमदार विनोद निकोले यांनी केले.
एसएफआयच्या जिल्हा अधिवेशनानिमित्त राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणून ओळख असलेले डहाणूचे आमदार निकोले हे मंगळवारी (ता. १४ जानेवारी) माजलगाव येथे आले होते. याप्रसंगी त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. युवकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने बोलताना आमदार निकोले म्हणाले, ‘भांडवलदारी व्यवस्थेने युवकांची पिळवणूक लावली आहे. श्रमाचे मूल्य देण्यासही आज अनेकजण नकार देताहेत. ही स्थिती बदलली पाहिजे. आपण स्वत: डीवायएफआय या युवक संघटनेतून पुढे आलो आहोत. रस्त्यावर जसा आपण संघर्ष करत होतो, तसाच आता सदनातही करू.’ कर्जमाफीच्या मुद्द्यावर निकोले यांनी महाविकास आघाडीच्या सरकारने आपल्या आश्वासनावर ठाम राहत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी केली. आताच्या अटी शर्तींसह केलेली कर्जमाफी पुरेशी नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकरी, कामगारांच्या मागण्यांसाठी आपण दोन वर्षांपूर्वी लाँग मार्च काढला होता. त्यातील मागण्याही अजून पूर्ण झालेल्या नाहीत. आपण यापुढे संसदीय पद्धतीने समाजातील सर्व घटकांचे प्रश्न मांडणार आहोत. त्यात आणखीन सामान्य घटकांतील युवक सोबत यावेत, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
धोरणात्मक बदल होणे सर्वात आवश्यक
आज शासन शेतकऱ्यांना तात्पुरती मदत म्हणून कर्जमाफी देते. मात्र, त्यातही कित्येक अटी असतात. त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहतात. वास्तविक पाहता ही परिस्थिती बदलावी, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगून अनेक विषयांवार आमदार विनोद निकोले यांनी सांगितले.
जनतेसाठी झटणाऱ्या युवकांच्या पदरात झुकते माप ही ताकद
आजपर्यंत मी केवळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. साधी ग्रामपंचायतीची निवडणूकही लढवलेली नाही. जनतेच्या प्रश्नांना मांडण्याचे काम करणे एवढाच अनुभव होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली अन् जीवनातील पहिली निवडणूक लढलो. एकीकडे धनदांडगे असताना जनतेने त्यांच्यासाठी झटणाऱ्या युवकांच्या पदरात झुकते माप टाकले हीच लोकशाहीची ताकद आहे, अशी भावना आमदार निकोली यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी या वेळी त्यांचा राजकीय प्रवास उलगडून सांगितला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.