Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Parner's politics to change due to Autti-Lanke crisis

आमदार औटी-लंके संघर्षामुळे बदलणार पारनेरचे राजकारण

शशिकांत भालेकर | Update - Sep 04, 2018, 11:40 AM IST

पारनेर तालुक्यातील राजकारण आता वेगळ्या वळणावर आले आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी आणि शिवसेनेतून गच्छंती झालेले

 • Parner's politics to change due to Autti-Lanke crisis

  पारनेर- पारनेर तालुक्यातील राजकारण आता वेगळ्या वळणावर आले आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी आणि शिवसेनेतून गच्छंती झालेले नीलेश लंके यांच्यातील संघर्षामुळे तालुक्यातील राजकारण पुढील काळात बदललेले दिसेल.


  पारनेर तालुका हा एकेकाळी कम्युनिस्ट विचारसरणीचा होता. कम्युनिस्टांचा हा बालेकिल्लाच. शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी यांचे वडील १० वर्षे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार होते. बाबासाहेब ठुबे या कम्युनिस्ट नेत्यानेही पाच वर्षे आमदारकी भूषवली. पुढे त्यांचे चिरंजीव आझाद ठुबे यांनी तालुक्यात कम्युनिस्ट चळवळ जिवंत ठेवली. आजही काही गावांत कम्युनिस्ट विचारांचे कार्यकर्ते आहेत. मात्र, फक्त कान्हूर पठार गटात कम्युनिस्टांचा प्रभाव उरला आहे. आझाद ठुबे यांची पत्नी तेथे जि. प. सदस्य आहेत. त्यांच्या विजयात आमदार औटी यांचे जास्त योगदान आहे. आझाद ठुबे हे त्यांचे भाचे असल्याने कान्हूर पठार गटात शिवसेनेचा उमेदवार न देता ठुबे यांच्यामागे त्यांनी सर्व ताकद उभी केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ठुबे हे औटी यांना मदत करतात. मामा-भाचे यांचे मिळून मिसळून राजकारण तालुक्यात सुरू आहे. या विधानसभा निवडणुकीत ठुबे हे औटी यांनाच मदत करतील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.


  पारनेर तालुक्यात सत्तासंघर्षाचे राजकारण पेटले आहे. आमदार औटी व त्यांचेच एकेकाळचे सहकारी, माजी शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून मतभेद निर्माण झाले असून लंके यांनी औटी यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. दोघांकडून एकमेकांवर जाहीर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली जात नाही. लंकेंबरोबर युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपण सर्वसामान्य कुटुंबातील असून कुठलाही राजकीय वारसा नसताना आपण राजकारणात उतरलो अाहोत. सर्वसामान्य जनतेला मी अहोरात्र मदत करतो, असे ते सांगत असतात. तेच त्यांचे बलस्थान आहे. आमदार औटी हे आतापर्यंत तीनदा निवडून आले आहेत. मागील चौदा वर्षांत मतदारसंघात विविध भागांत केलेल्या विकासकामांमुळे जनता पुन्हा आपल्यालाच आमदार करेल, असा त्यांचा दावा आहे. निवडणूक गनिमी काव्याने लढायची असते, असे ते सांगतात. त्यामुळे ऐनवेळी ते कोणती खेळी खेळतात हे महत्त्वाचे आहे.


  औटी व लंके यांच्या राजकीय कुरघोडीत व मतविभागणीत तिसऱ्या कोणाचा फायदा होऊ शकतो का, याबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार हे जवळजवळ निश्चित अाहे. राष्ट्रवादीकडून सुजित झावरे हे प्रबळ दावेदार अाहेत. तथापि, राष्ट्रवादीतदेखील मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन गटांचे मनोमिलन निवडणुकीदरम्यान होईल का? दुसऱ्या गटाशी झावरे जुळवून घेतात का, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. झावरे हे निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागलेले दिसत नाहीत. त्यातच नगर तालुक्यातून माधवराव लामखडे हे राष्ट्रवादीकडून तयारी करत आहेत. नगरकरांनी एकच उमेदवार दिल्यास त्याचा फायदा लामखडे यांना कितपत होतो हे पहावे लागेल.


  काँग्रेसमध्येदेखील दोन गट आहेत. एक सभापती राहुल झावरे यांचा, तर दुसरा उरलेल्या काँग्रेसजनांचा. औटी यांनी झावरे यांना सभापतिपदापर्यंत पोहोचवत मागील निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड केली. आता झावरे आगामी निवडणुकीत काय भूमिका घेतात ते महत्त्वाचे आहे. दुसऱ्या गटातील राहुल शिंदे व इतर दूध संघ खरेदी-विक्री व बाजार समितीत राष्ट्रवादी सोबत आहेत. काँग्रेसचे दोन्ही गट विखे यांचे नेतृत्व मानतात. त्यामुळे या दोन्ही गटांना प्रवरेचा काय आदेश येतो, त्याप्रमाणे ते निर्णय घेतील. भाजपची सत्ता राज्यात आहे. त्याचा फायदा या मतदारसंघात त्यांना करून घेता आलेला नाही. तालुक्यात भाजपकडे कोणतीही सत्ता नाही, तसेच त्यांच्याकडे विधानसभेसाठी सक्षम उमेदवारही नाही. मागील निवडणुकीप्रमाणे ऐनवेळी पक्षाबाहेरच्या उमेदवारास उमेदवारी दिली जाऊ शकते. लंके यांच्यावर भाजपचा डोळा असून लंके त्यांच्या गळाला लागतात का, हे लवकरच कळेल. तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, माजी जि. प. सदस्य वसंत चेडे हा पर्याय भाजप पुढे करू शकते. तथापि, त्यांच्यातही मतभेद आहेत. राजकीय इतिहास पाहता आतापर्यंत तालुक्यातील सत्ता घराणेशाही भोवतीच फिरत असल्याचे दिसते. जी घराणी ५० वर्षांपासून राजकारणात आहेत, त्यांच्याकडेच आजही तालुक्यातील महत्त्वाची सत्ताकेंद्रे आहेत. लंके निवडणुकीत कोणता झेंडा हातात घेतात की अपक्ष लढतात, हेच अद्याप नक्की नाही. विधानसभेसाठी तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार हे निश्चित आहे. या मत विभागणीचा फायदा कोणाला होणार यावरच विजयाची सर्व गणिते अवलंबून आहेत.


  वादग्रस्त विधानामुळे औटी अडचणीत
  औटी व लंके दोघांनीही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. तालुका ते पिंजून काढत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडत आहेत. त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा आंदोलनादरम्यान मराठा कार्यकर्त्यांनी औटी यांचा राजीनामा मागितला होता. त्यात लंकेही होते. औटी यांनी एका कार्यक्रमात पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्याविषयी जे विधान केले, त्यांची व्हिडीअो क्लिप व्हायरल झाली. त्या वादग्रस्त विधानामुळे ते अडचणीत आले. आपण हे विधान केलेच नसल्याचा दावा त्यांनी केला, पण त्यात किती तथ्य आहे हे जनता जाणून आहे.


  लंके यांना राष्ट्रवादीची ऑफर?
  लंके हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असले, तरी कुठल्या पक्षातर्फे रिंगणात उतरणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांच्यापुढे अनेक पर्याय आहेत. राष्ट्रवादीदेखील त्यांना उमेदवारी देऊ शकते. कारण राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार सुजित झावरे हे मागील निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर जिल्हा परिषदेतही पराभूत झाले. नगर येथील सभेत अजित पवार यांनी त्यांना याबाबत सुनावले होते. सलग तीन पंचवार्षिकला राष्ट्रवादीचा उमेदवार तालुक्यात पराभूत होत आहे. त्यामुळे लंके यांना राष्ट्रवादी उमेदवारी देऊ शकते.

Trending