आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरडी, कॉमेडी की ट्रॅजेडी?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कोंडी' या शब्दाचा अर्थ शोधायचा, तर राज ठाकरेंकडे पाहायला हवे. नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करू शकतात, असे महाराष्ट्राला सर्वप्रथम कोणी सांगितले असेल, तर ते राज यांनी. आपल्या तेरा आमदारांना त्यांनी तेव्हा गुजरातचा दौरा करायला सांगितले, तेव्हा इथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते. मात्र, हेच मोदी प्रत्यक्षात देशाचे सर्वेसर्वा झाले तेव्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. शरद पवारांशी सर्वप्रथम राजकीय सलगी केली ती राज यांनीच. 'उद्धव की राज?' असा रॅपिड फायर प्रश्न राज यांनी त्या महामुलाखतीत विचारल्यावर चाणाक्ष पवार उत्तरले होते : 'ठाकरे कुटुंब'! पण, त्यांच्या मनातले उत्तर 'राज' हेच आहे, असा समज महाराष्ट्राचा करून देण्यात राज यांना यश आले होते. प्रत्यक्षात त्याच पवारांनी उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी केला. पवारही म्हणत नव्हते, तेव्हा 'मोदी- शहांना सत्तेच्या पटलावरून हद्दपार करा', असे राज ठाकरे सांगत होते. देशात नाही, पण राज्यात सत्तेच्या पटलावरून भाजप हद्दपार झाला, तेव्हा मात्र राज कुठेच नव्हते. महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाने कोंडी झालेले खरे नेते दोन. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे. बाकी, हर्षवर्धन पाटील यांच्यापासून ते राधाकृष्ण विखे आणि मोहिते पाटलांपासून ते पंकजांपर्यंत अनेकांची कोंडी झाली आहे. मात्र, या दोघांचे जे झाले आहे, ते अभूतपूर्व आहे. आता हे दोघे एकत्र येऊन ती कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना अधिकच हास्यास्पद भासत आहेत. राज ठाकरे म्हणाले तसे, 'यशाला अनेक बाप असतात, तर अपयशाला खूप सल्लागार असतात.' राज यांच्या सल्लागारांचा विचार आता करावाच लागणार आहे. कारण परवाच्या महाअधिवेशनात त्यांनी म्हटले की, पक्ष स्थापन केला तेव्हा मला हाच झेंडा हवा होता. पण, मी तेव्हा अवघ्या ३६ वर्षांचा होतो. मला नीट सांगणारे कोणी नव्हते. त्यामुळे काहींनी सुचवले आणि 'सोशल इंजिनिअरिंग' म्हणून मी हा झेंडा निवडला. आता लोकसभेच्या धामधुमीत 'लाव रे तो व्हिडिओ'चा सल्ला त्यांना कोणी दिला होता, ते यथावकाश समोर येईलच. शरद पवारही मोदी - शहांबद्दल जपून बोलत असताना त्यांच्यावर असा थेट हल्ला चढवण्याचा सल्ला राज यांना कोणी दिला होता ते माहीत नाही. स्वतःचा एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज जाहीर सभा घेत होते. त्या सभांना शब्दशः प्रचंड प्रतिसाद मिळत होता. लोकसभेच्या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण, ती निवडणूक महाराष्ट्रात गाजवली ती मात्र केवळ आणि केवळ राज यांनी. तरुणाई रस्त्यावर उतरली असताना त्यांचा हा 'आयकॉन' कोणत्या गर्दीत सामील होणार आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात राज यांच्यासारखा करिष्मा असणारा एकही नेता नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना राज यांनी केली, त्याला आता १४ वर्षे होत आहेत. आपल्याकडच्या मराठी वृत्तवाहिन्या साधारणपणे त्याच सुमारास आल्या. राज यांची प्रत्येक सभा लाइव्ह दाखवत तर त्या उभ्या राहिल्या. तरुण आणि महिलांना राज यांचे एवढे आकर्षण होते की इतर पक्षांतील भल्या भल्या नेत्यांची पंचाईत झाली होती. आपल्या घरातही राज यांचाच करिष्मा आहे, असे ते खासगीत सांगत. मनसेच्या समोर शिवसेना संपणार, राज यांच्यापुढे उद्धव नामोहरम होणार, असे आडाखे तेव्हा बांधले जात होते. प्रत्यक्षात काय घडले, त्याला इतिहास साक्ष आहे. मुळात, परप्रांतीयांचा संपलेला मुद्दा घेऊनच राज यांनी राजकारण आरंभल्याने त्यांच्या पक्षाचे आयुर्मान किती असेल, हे स्पष्ट होते. बाळासाहेब ठाकरे आणि राज यांची नेहमीच तुलना होत असते. बाळासाहेबांचा तोच करिष्मा, तेच वक्तृत्व राज यांच्याकडे आहे, यात शंका नाही. बाळासाहेबांनी 'मातोश्री'तून अवघे राजकारण घडवले हे खरे, पण मुळात बाळासाहेब वेगळ्या प्रक्रियेतून आलेले. जमिनीवर राहिलेले. शिवसेना त्यांनी घडवली. आणि शिवसेनेसोबत ते स्वतःही घडत गेले. राज त्या अर्थाने आकाशातून पडलेले. पक्ष उभा करण्यासाठी त्यांनी केडर उभे करायला हवे होते. भाषणांना टाळ्या पिटणारी मंडळी आणि चाहत्यांची मांदियाळी म्हणजे 'केडर' नसते. त्यांनी पक्षाला कार्यक्रम द्यायला हवा होता. 'क्राउडपूलर' भाषणं आणि राज यांचा एकचालकानुवर्ती दरारा वगळता मनसेकडं काहीच नव्हतं. आणि, जो खळ्ळखट्याक कार्यक्रम होता, तो कधीच कालबाह्य झालेला. परप्रांतीयांचा जो मुद्दा वापरून सेनेनं सोडला, तोच घेऊन राज उभे राहिले. त्यामुळे २००९ मध्ये १३ जागा जिंकणारी 'मनसे' २०१४ च्या निवडणुकीत दखलपात्रही ठरणार नाही, असे तेव्हाच स्पष्ट झाले होते. मनसे हा शिवसेनेतून वेगळा झालेला पक्ष. पण, त्याची अवस्था पाकिस्तानसारखीच. स्वतःची स्पेस शोधण्याऐवजी शिवसेनेसोबत स्वतःची तुलना करणे आणि आपल्या धोरणविश्वाचा केंद्रबिंदूही शिवसेनाच मानणे (अगदी तिकडं आदित्य, तर इकडं अमित!) या भाऊबंदकीतून मनसेच्या इंजिनाचा वेग मंदावला. खरेतर, २०१४ पासून शिवसेना सत्तेत आहे. भाजपने शिवसेनेची जी फरफट केली आणि शिवेसेनेची स्थिती जी काही केविलवाणी झाली, त्याचा लाभ उठवत झुंजार विरोधी पक्ष म्हणून मनसेला उभे राहाता आले असते. सत्तेत असूनही विरोधाची, मोदी -शहाविरोधाचीही स्पेस शिवसेनाच काबीज करत असताना, मनसेला महाराष्ट्राच्या असंतोषाचे नायक होता आले नाही. खरे म्हणजे, एका प्रादेशिक पक्षाचा अवकाश महाराष्ट्रात होताच. शिवसेनेने भाजपसोबत जाऊन आपले तेज संपवलेले असताना तर मनसेला ही संधी अगदी थेटपणे होती. राज यांच्यासारखा करिष्मा असणारा नेता आणि एवढी पडझड होऊनही शिल्लक असणारी कार्यकर्त्यांची सेना या बळावर मनसेला काम करता आले असते. पण, लहर येईल तेव्हा सभा आणि काही मुलाखती वगळता, राजकारण म्हणजे काय करायचे, हे राज यांना कधीच समजले नाही. सर्वप्रथम त्यांनी योग्य भूमिका घेतली ती लोकसभा निवडणुकीत. राज यांचे जे व्यक्तिमत्त्व आहे, त्यामुळे तर ती भूमिका अधिकच प्रभावी ठरली. सगळे सत्तेला शरण जात असताना, एक नेता निर्भीडपणे सत्तेला सवाल विचारतो, याचे महाराष्ट्राला कोण कौतुक होते! महाराष्ट्रच काय, परराज्यांतूनही त्यांना निमंत्रणे होती. संविधान धोक्यात आलेले असताना, राज त्या संदर्भात बोलत होते. सप्रमाण बोलत होते. या सरकारचा मार्केटिंगचा डाव उघड करत होते. 'पुलवामा'सारख्या घटनेवरही शंका उपस्थित करत होते. एरव्ही विरोधकांना ट्रोल करणारे इथे मात्र तेही करू शकत नव्हते. कारण, राज यांची सेना काही कमी नव्हती! मोदी आणि शहांच्या विरोधात देशभर जी आघाडी उभी राहाते आहे, त्याचे राज हे सेनानी ठरतील, असे तेव्हा वाटत होते. लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा दारूण पराभव झाला. मोदी आणि शहा पुन्हा सत्तारूढ झाले. त्यानंतर भल्याभल्यांची बोलती बंद झाली. अनेक नेते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून बाहेर पडले. राज यांची पुन्हा कोंडी झाली. विधानसभा निवडणुकीत ती स्पष्टपणे जाणवली. निकालानंतर, हे जे तिघाडी सरकार आले, त्याने तर राज चक्रव्यूहात सापडले. मोदी आणि शहांना विरोध करावा, तर तीही स्पेस शिवसेनेनेच बळकावली आहे. आता पुढे काय? : प्रश्न बिकट होता. दीर्घकालीन उत्तराच्या दिशेने जाणे आवश्यक होते. शिवसेनेला स्पर्धक न मानता, संविधानवादी भूमिका घेत ते उभे ठाकले असते, तर महाराष्ट्राच्याच काय, देशाच्या गळ्यातले ते ताईत झाले असते. ज्या देशात पाचपैकी दोन तरूण बेरोजगार आहेत, तिथे राज तरुणाईसोबत उभे राहाते, तर सत्तेसाठी आघाड्या करणाऱ्या नेत्यांच्या गर्दीपेक्षा ते वेगळे ठरले असते. मात्र, राज यांनी सोपा रस्ता निवडला. कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेनेचे हिंदुत्व धूसर झाले आहे. आता ती स्पेस आपल्याला मिळणार आहे, असा समज त्यांनी करून घेतला. पुन्हा त्यांनी तीच चूक केली. वापरून चोथा झालेले आणि संपलेले मुद्दे घेऊन नवे राजकारण उभे करता येत नसते. एकतर, 'तुमचा नमाज, तर आमची महाआरती' हे राजकारण करून झाले आहे. गिरण्यांचा असो वा मशिदींवरचा, सगळे भोंगे वापरून झाले आहेत. 'व्हॅलेंटाइन डे'ला विरोध करणारी शिवसेना आता 'नाइटलाइफ'पर्यंत आलेली आहे. इरिलिव्हंट असे जुनाट मुद्दे घेऊन राज नक्की कोणते 'प्रबोधन' करणार आहेत? दुसरे म्हणजे, हिंदुत्वाची जी काही स्पेस असेल, ती भाजपने कधीच घेऊन टाकली आहे. भाजपला वापरता येईल, असे मनसेकडे थोडेफार काही शिल्लक असेलही, पण त्यातून मनसेचे काय होणार आहे? व्यवस्थेला न जुमानता सत्ताधीशांना सवाल करणारा, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेला महानेता, अशी प्रतिमा ज्या राज यांची तयार झाली होती, ते आज कोणती भूमिका घेताहेत? जेव्हा तरुणाई रस्त्यावर उतरली आहे, महिलांचा आवाज बुलंद होतो आहे, अशावेळी त्यांचा हा 'आयकॉन' कोणत्या गर्दीत सामील होणार आहे? पाकिस्तानचे भय दाखवणाऱ्या सत्ताधीशांना ठोकणारा हा नेता आता '३७०', राममंदिर यामुळे सीएएच्या विरोधात मुस्लिमांचे मोर्चे निघताहेत, असे सांगतो आहे. मुस्लिमांना देशभक्तीच्या प्रमाणपत्रांसाठी आता अमित ठाकरे यांच्याकडे यावे लागणार असेल, तर अमित शहांनी काय करायचे? जी 'स्पेस' आहे, असे राज यांना वाटते आहे, ती कधीचीच पादाक्रांत झाली आहे. पुन्हा एकदा राज यांची बस चुकली आहे आणि बंद पडलेले इंजिन घेऊन ते नव्या प्रवासाची घोषणा करत आहेत! संजय आवटे, राज्य संपादक  

बातम्या आणखी आहेत...