‘राफेलमुळेच पर्रीकरांनी संरक्षणमंत्रिपद सोडले’; कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत शरद पवारांचा दावा

प्रतिनिधी

Apr 14,2019 10:03:00 AM IST

कोल्हापूर/सांगोला - मनोहर पर्रीकर यांना राफेल विमानांचा करार मान्य नव्हता, यामुळेच ते संरक्षणमंत्रिपद सोडून गोव्यात परतले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला.

पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. राज ठाकरेंच्या प्रचाराबाबत ते म्हणाले, मोदी-शहा जोडी देशाला घातक आहे, हे त्यांना सांगायचे आहे. त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार असतील. चुकीच्या लोकांच्या हातून राज्य काढून घेण्यासाठी उद्याच्या काळात चर्चा होऊ शकते,’ असेही सूतोवाच पवार यांनी केले.

मोदींनी देशाची काळजी करावी : शरद पवार
सांगोला | गेल्या २ वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या आहेत. हे या सरकारचे अपयश आहे. मोदी आमच्या कुटुंबाची काळजी करण्याऐवजी देशाची काळजी करावी, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना मारला.

घराचा काय अनुभव?
पवार म्हणाले, मोदी राज्यात अनेक सभा घेतात, विकासावर बोलत नाहीत. त्यांना आमच्या कुटुंबाची काळजी आहे. आमच्या आईच्या संस्कारांमुळे आम्हाला घराची चिंता नाही, परंतु मोदींना घराचा काय अनुभव? या सरकारने नोटबंदी केली. परंतु रांगेत फक्त गरीबच दिसले. काळा पैसा बाहेर आला का? हे विचारण्याची वेळ आली आहे.

X
COMMENT