आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Party's Challenge To Sena Within 'Matoshree' Courtyard; BJP's Revolt Continues Even In CM's Nagpur

‘माताेश्री’च्या अंगणातच सेनेला पक्षांतर्गत आव्हान; मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातही भाजपमध्ये बंड कायम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचे बंडखाेर चंद्रकांत पाटील हे भाजप नेते तथा खडसेंचे विराेधक गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. जामनेरमध्ये गिरीश महाजनांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही ते उपस्थित हाेते. - Divya Marathi
शिवसेनेचे बंडखाेर चंद्रकांत पाटील हे भाजप नेते तथा खडसेंचे विराेधक गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. जामनेरमध्ये गिरीश महाजनांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही ते उपस्थित हाेते.

मुंबई - ‘दोन दिवसांत बंडखोरांना थंड करू आणि नाही झाले तर त्यांना त्यांची जागा दाखवू. बंडखाेरी कराल तर याद राखा’ असा इशारा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देऊनही भाजप-शिवसेनेचे बंडखोर नमले नाहीत. मुंबईपासून ते मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भापर्यंत या दाेन्ही सत्ताधारी पक्षांतील बंडखोरी कायम राहिल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी माघार घेतली असली तरी प्रमुख बंडखोर मात्र मैदानात कायम राहिल्याने सत्ताधाऱ्यांसमाेर विराेधकांपेक्षा स्वकीयांचेच माेठे आव्हान निर्माण हाेण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान व शिवसेनेच्या राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू ‘माताेश्री’ ज्या वांद्रेत आहे, त्या भागातच शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. शिवसेनेचे प्रकाश सावंत यांच्या निधनानंतर वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेने त्यांच्या पत्नीला तृप्ती यांना संधी दिली हाेती. त्या नारायण राणे यांचा २० हजार मतांनी पराभव करून निवडून आल्या हाेत्या. मात्र, या वेळी शिवसेनेने त्यांच्याएेवजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे तृप्ती यांनी बंडखाेरी करून अर्ज दाखल केला.

वर्सोवा येथे मेटेंचा पक्ष शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर यांना महायुतीतर्फे उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविराेधात शिवसेनेचे विभागप्रमुख राजुल पटेल यांनी अर्ज कायम ठेवून बंडखाेरी केली आहे. ही बंडखोरी मोडून काढण्यात शिवसेना नेतृत्व अपयशी ठरले. अंधेरीमध्ये शिवसेनेचे रमेश लटके यांच्यविराेधात भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास नकार देत बंडाचा झेंडा कायम ठेवला.  मीरा-भाईंदरमध्ये भाजपचे नरेंद्र मेहता यांच्यासमोर भाजपच्याच माजी महापौर गीता जैन यांनी आव्हान उभे केले आहे. भाजप नेतृत्वाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे या मतदारसंघात भाजपविरोधात भाजप अशी लढाई हाेईल.
 

मनसे- राष्ट्रवादीची अशीही युती
1 लाेकसभेपासून मनसेला आघाडीत घ्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही हाेते. मात्र उत्तर भारतीय मतांवर परिणाम हाेण्याच्या भीतीने काँग्रेसने या प्रस्तावाला विराेध केला. मात्र तेव्हापासून राष्ट्रवादी व मनसेचे ‘मनाेमिलन’ झाल्याचे दिसते. आता विधानसभेला ठाण्यात भाजपने संजय केळकर या विद्यमान आमदाराला उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने सुहास देसाई तर मनसेनेही अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली. मात्र मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेऊन मनसेला पाठिंबा दिला आहे.

2 नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापून मनसेतून आलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्याविराेधात बंड करत सानप यांनी राष्ट्रवादीचे तिकीट मिळवले. तर मनसेने माजी महापौर अशोक मुर्तडक यांना मैदानात उतरवले हाेते. मात्र मतविभाजन टाळण्यासाठी मुर्तडक यांनी माघार घेत सानप यांच्या मागे मनसेची ताकद उभी केली.

खडसेंंविराेधात राष्ट्रवादी- सेना बंडखाेर युती
जळगाव - मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या कन्या राेहिणी यांच्याविराेधात 
राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. रवींद्र पाटील व शिवसेनेचे बंडखाेर चंद्रकांत पाटील हे रिंगणात हाेते. मात्र साेमवारी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेऊन चंद्रकांत पाटील यांना पुरस्कृत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २०१४ मध्ये याच मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एेनवेळी तेव्हाचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देऊन खडसेंविराेधात मदत केली हाेती. त्या निवडणुकीत खडसेंचा अवघ्या ९,७०८ मतांनी विजय झाला हाेता. शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना एकत्रित १० हजार ९९४ मते मिळाली हाेती. या वेळी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देऊन खडसेविराेधात खेळी राष्ट्रवादीने खेळली आहे.
 

दक्षिण नागपूर : भाजप विरुद्ध भाजप
दक्षिण नागपूर मतदारसंघात भाजपचे सतीश होले यांची मोहन मते यांच्याविराेधात बंडखोरी कायम आहे. तर राष्ट्रवादीचे नेते दुनेश्वर पेठे यांनी पूर्व नागपूर आणि काँग्रेसचे मनोज सांगोळे यांनी उत्तर नागपुरातून अर्ज मागे घेतले. गोंदियात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार गोपाळ अग्रवाल यांना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजपचे नेते विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी कायम ठेवली. तिरोडा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिलीप बनसोड यांनी अर्ज कायम ठेवल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्यापुढे पक्षांतर्गत आव्हान कायम आहे.
 

साेलापूर : शिवसेना विरुद्ध भाजप
पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याविराेधात कांॅग्रेसचे शिवाजीराव काळुंगे यांनी अर्ज कायम ठेवला. पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.  साेलापूर मध्यमध्ये कांॅग्रेसच्या प्रणिती शिंदेंविराेधात राष्ट्रवादीने मात्र अर्ज मागे घेतला. इथेच शिवसेनेचे दिलीप माने यांच्याविराेधात पक्षाचेच महेश काेठे यांनी बंड कायम ठेवले. बार्शीत सेनेेचे दिलीप साेपलविराेधात भाजपचे राजेंद्र राऊत, करमाळ्यात सेनेच्या रश्मी बागलविराेधात जयवंत जगताप यांनी बंड केले हाेते. त्यांनी आता माघार घेऊन राष्ट्रवादीचे संजय शिंदेंना पाठिंबा दिला.
 

इंदापुरात भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीतूनच पाठबळ
पुणे जिल्हा बंॅकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते अप्पासाहेब जगदाळे यांनी इंदापूरमध्ये अर्ज मागे घेतल्याने भाजपचे हर्षवर्धन पाटील यांना दिलासा मिळाला. छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घाेलप, राष्ट्रवादीचे अशाेक घाेगरे, अरविंद वाघ यांनीही पाटील यांना पाठिंबा दिला.
 

पुण्यात महापाैर टिळक यांच्यासमाेर सेनेचे आव्हान
पुण्यातील मावळ मतदारसंघात भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याविराेधात भाजपचेच रवींद्र भेगडे यांनी बंड करत अर्ज केला हाेता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार रावसाहेब दानवे यांच्यासाेबत मुंबईत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी बंडाची तलवार म्यान केली.

पुण्यातील एकही मतदारसंघ न साेडल्यामुळे शिवसेनेने पाच मतदारसंघांत भाजपविराेधात बंडखाेरी केली हाेती. त्यापैकी चार ठिकाणी अर्ज मागे घेण्यात आले. परंतु गिरीश बापट यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ भागात भाजपच्या महापाैर मुक्ता टिळक यांच्याविराेधात सेनेचे विशाल धनवडे यांनी बंडखाेरी कायम ठेवली.

पिंपरीत भाजपचे बंडखाेर अपक्ष उमेदवार बाळासाहेब आेव्हाळ यांनी उमेदवारी कायम ठेवली. तर चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविराेधात शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंड कायम ठेवले. 

चिंचवड, भाेसरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने थेट स्वत:चा उमेदवार उभा न करता बंडखाेरांना पाठिंबा दिला आहे. काेथरूड मतदारसंघात मनसे उमेदवाराला आघाडीचे सहकार्य लाभले आहे.