Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | party's mediators did injustice to the Shiv Sena with me

उद्धव ठाकरेंनी नव्हे, पक्षातील मध्यस्थांनी माझ्यासह शिवसैनिकांवर अन्याय केला

प्रतिनिधी | Update - Nov 07, 2018, 11:08 AM IST

आम्ही शिवसेनेवर नाराज असणाऱ्या शिवसैनिकांना बाहेर जाऊ देणार नाहीत

 • party's mediators did injustice to the Shiv Sena with me

  वडवणी - जिल्ह्यात दोन दिवसापूर्वीच शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या. या निवड प्रक्रियेत निष्ठावंत व चांगले काम असणाऱ्या शिवसैनिकांना डावलल्याने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी मंगळवारी नाराज शिवसैनिकांची वडवणीत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु शिवसेना न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

  शिवसेनेत काम न करणाऱ्यांची पदे जातात. परंतु काम करणाऱ्यांची येथे पदे जातात हे दुर्दैव वाटते. आम्ही शिवसेनेवर नाराज असणाऱ्या शिवसैनिकांना बाहेर जाऊ देणार नाहीत, कोणालाही रान मोकळे सोडणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्हे, तर पक्षातील मध्यस्थांनी माझ्यासह इतर शिवसैनिकांवर अन्याय केल्याचा आरोप माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केला आहे.


  वडवणी शहरातील बचत गट भवनात मंगळवारी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस विनायक ढगे धारूर, राजेश अंडील, नितीन अंडील, गणेश मोरे, राजाभाऊ लोमटे, गंगाभिषण शिंदे, अशोक आरदे माजलगाव या नाराजांसह प्रा. शिवराज बांगर, माजी तालुकाप्रमुख विनायक मुळे, नगरसेवक कचरू जाधव, शिवाजी टकले, संजय उजगरे, युवराज शिंदे, बाबासाहेब राऊत, बंडू जाधव, मनोहर कसबे, नरेंद्र राठोड, नागेश डिगे, माउली गोंडे, अशोक चाटे, वचिष्ठ शेंडगे, दिगंबर अलगट, बाळासाहेब लोकरे, भय्या खोसे, अंबादास जाधव, महेश जाधव यांच्यासह माजलगाव, धारूर तालुक्यातूनही दीड हजार शिवसैनिक उपस्थित होते.

  बैठकीत माजी जिल्हाप्रमुख जगताप म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करायचे आहेत. त्यामुळे आम्ही कायम शिवसेनेत आहोत आणि उद्धव ठाकरेंनी नाही तर पक्षातील मध्यस्थांनी माझ्यासह शिवसैनिकांवर अन्याय केला. परळी, माजलगाव, धारूर व वडवणीत हीच परिस्थिती आहे. मी सर्व पदाधिकाऱ्यांना फोन करून सांगितले की, आताच कोणताही निर्णय घेऊ नका आपल्याला शिवसेनेचे काम करायचे आहे. पक्षावर कोणीही नाराज होऊ नका व आम्ही त्यासाठीच काम सुरू केले आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यातील सहापैकी किमान चार तरी आमदार पक्षाला द्यायचे आहेत. ऊर्जा देणारे शिवसैनिक आज शिवसेनेत असून त्यांच्यापासूनच आम्हाला ऊर्जा मिळते. यापुढे तुम्ही आवाज द्याल त्यावेळी आम्ही अर्ध्या रात्री तुमच्यासाठी धावून येऊ. प्रास्ताविक युवराज शिंदे यांनी, तर आभार वचिष्ठ शेंडगे यांनी मानले.

  बैठकीत माजी तालुकाप्रमुख विनायक मुळे हे बोलताना भावुक झाले. शिवसेनेत ते कसे घडले. चांगले काम करताना त्यांना कसे डावलले गेले हे ते सांगत असताना अन्य शिवसैनिकाचे डोळेही पाणावले होते. शेवटी राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.

  वाघ लवकरच निर्णायक वळणावर, पोस्ट झाली होती व्हायरल

  वाघ लवकरच निर्णायक वळणावर अशी माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या फोटोसह एक तीन दिवसापूर्वी पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाली होती. या पोस्टवरच जगतापांच्या गटाच्या शिवसैनिकांनी जय महाराष्ट्र भावी आमदार, केंव्हाही तुमच्या सोबत, पक्ष सोडू नका दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, येणाऱ्या भगव्या वादळाची सुरुवात अशा कॉमेंट्स पडल्यान वातावरण ढवळून निघाले होते. जगताप हे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे नजराही होत्या. परंतु वडवणीच्या नाराज शिवसैनिकांच्या बैठकीत जगताप यांनी पक्ष सोडणार नाही, असे स्पष्ट केले.

  अनिल जगताप यांच्या नेतृत्वात काम सुरू केल्यानंतर पत निर्माण झाली. माणसांकडे पद नसले तरी चालेल, परंतु पत असावी. बैठक घेण्याचा उद्देश हा पक्षाचा आदेश झुगारणे अजिबात नाही. बीडनंतर फक्त वडवणीतच शिवसेना जास्त मजबूत आहे. शिवसेना आमचा श्वास आहे.
  -प्रा. शिवराज बांगर, पदाधिकारी शिवसेना.

Trending