आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलैमध्ये प्रवासी वाहन विक्रीत ३१% घट, २ ते ३ महिन्यांत १५,००० नोकऱ्या गेल्या : सियामचा अहवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वाहन क्षेत्रात या वर्षी जुलै महिन्यातील आकडेवारीदेखील नकारात्मक अाली. या महिन्यात देशातील वाहन विक्रीत दाेन दशकांतील सर्वात माेठी घसरण नोंदवण्यात अाली. डिसेंबर २००० नंतर पहिल्यांदाच वाहन क्षेत्रातील विक्रीमध्ये ३१ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली आहे. या दरम्यान उत्पादनातही १७ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. वाहन क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात ३.५ कोटी लोकांना रोजगार मिळालेला आहे. खासगी संस्था सीएमआयईनुसार जुलै २०१९ मध्ये बेरोजगारी दर वाढून ७.५१ टक्के झाला आहे, जो एका वर्षापूर्वी समान कालावधीत ५.६६ टक्के होता. 

सियामचे महासंचालक विष्णू माथुर यांनी सांगितले की, सरकारकडून या क्षेत्राला दिलासा देणाऱ्या पॅकेजची किती आवश्यकता आहे, हे या आकडेवारीवरून लक्षात येते. तत्काळ काही तरी करण्याची अवश्यकता आहे. उद्योग विक्री वाढण्यासाठी सर्व उपाय करत आहे. मात्र, सध्या या उद्योगाला सरकारच्या मदतीची आवश्यकता अाहे. सरकारने या क्षेत्राला पॅकेज देण्याची गरज आहे.
 

प्रवासी वाहन विक्रीत सलग ९ व्या महिन्यात घसरण
जुलै २०१९ मधील देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीचा विचार केल्यास यामध्ये ३०.९% घसरण झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन आॅटाेमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)च्या अहवालानुसार प्रवासी वाहन विक्रीत सलग ९ व्या महिन्यात घसरण नोंदवण्यात आली आहे. यामुळे वाहन उद्योगातून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली आहे. 
 

दुचाकी वाहनांच्या विक्रीत १६ टक्के घसरण
वर्ष २०१९ च्या जुलै महिन्यात एकूण २,००,७९० प्रवासी कारची विक्री नोंदवण्यात आली होती. मागील वर्षी समान कालावधीत  २,९०,९३० कारची विक्री झाली होती. तर या वर्षी जुलै महिन्यात दुचाकी विक्री १६.८२ टक्क्यांच्या घसरणीसह १५,११,६९२ राहिली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात १८,१७,४०६ दुचाकींची विक्री झाली होती.
 

यंदा एसअँडपी वाहन निर्देशांकात २३% घसरण
वाहन क्षेत्रातील घसरणीनंतर एसअँडपी वाहन निर्देशांकात २३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.  देशातील सर्वात माठी वाहन कंपनी मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये वर्षभरात २० टक्के घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्येही आतापर्यंत सर्व वाहन कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये सर्वाधिक ५.६०%, मारुती सुझुकीमध्ये ५.१०%, हीरो मोटोकॉर्पमध्ये २.५३%, बजाज ऑटोत १.५१% घसरण झाली आहे.
 

सुमारे ३०० डीलरशिप स्टोअर बंद 
देशात सुमारे ३०० डीलरशिप स्टोअर बंद झाले आहेत. त्यामुळे २ लाख लोकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. याव्यतिरिक्त  उपकरणांची निर्मिती करणाऱ्या क्षेत्रातही सुमारे १५ हजार लोकांना नोकरीवरून काढण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त नगदीची कमतरता, मागणी नसल्यानेही या क्षेत्राशी संबंधित रोजगारात घट नोंदवण्यात आली आहे. सियामचे महासंचालक विष्णू माथुर यांनी विविध स्रोतांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार एक वर्षापासून आलेल्या मंदीमुळे सुमारे १३ लाख लोकांना रोजगार गमावावा लागला असल्याचे सांगितले आहे.
 
 

बातम्या आणखी आहेत...