आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई जन्मभूमीसाठी पाथरीकर कोर्टात जाणार, शासकीय समिती स्थापण्याच्या मागणीवर ठाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी : पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याच्या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय गुरुवारी पाथरीत झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ६ महिन्यांत समितीच्या माध्यमातून उपलब्ध पुराव्यांआधारे जन्मस्थळाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी करू, असे कृती समितीचे अध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पाथरीला तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत १०० कोटींचा निधी दिला असून त्यातून विकासकामे करण्याचा सल्ला दिला होता. पाथरीला साईबाबांचे जन्मस्थान म्हणूनच निधी मिळायला हवा, अशी भावना गुरुवारी कृती समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींशी आ. बाबाजानी यांनी दूरध्वनीवरूनच चर्चा करत जन्मभूमीच्या प्रश्नावर आता न्यायालयात जाण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयानुसार औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करून त्याद्वारे सरकारला समिती गठित करण्यास भाग पाडले जाणार आहे. या समितीने सहा महिन्यांत जन्मभूमीबाबतचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी केली जाणार आहे.

भक्तांचा ओघ वाढला

मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शिर्डीवासीयांनी केलेल्या विरोधामुळे पाथरीची ख्याती देशभर पसरली आहे. यातूनच राज्यासह परराज्यातूनही भाविकांची संख्या वाढली आहे. गुरुवारी कर्नाटक, तेलंगणा प्रांतासह मराठवाड्यातून भाविक मोठ्या संख्येने पाथरीतील साई मंदिराच्या दर्शनासाठी दाखल झाले होते.

पाथरीचे नामांतर साईधाम करा : आ. मेघना बोर्डीकर

पाथरीचे नाव बदलून साईधाम करावे, अशी मागणी जिंतूरच्या भाजप आ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन दिले. नगरपालिकेनेही याबाबतचा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवावा, त्याचबरोबर शासनाने साईबाबांचे गुरुस्थान असलेल्या सेलू, जन्मभूमी पाथरी ते कर्मभूमी शिर्डी असा कॉरिडॉर विकसित करावा, अशीही मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...