आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ज्यांना एकटे राहण्याचा अभिमान वाटतो त्यांना नाती काय कळतील; पवार कुटुंबियांचे मोदींना चोख प्रत्युत्तर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे / कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील आपल्या पहिल्याच सभेत काँग्रेस आणि शरद पवारांच्या कुटुंबावर टीका केली होती. त्या टीकेला आता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या सर्वांनीच चोख प्रत्युत्तरे दिली आहेत. पुण्यातील एका सभेत बोलताना अजित पवारांनी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची खरडपट्टी काढली. बारामती येथे बोलताना सुप्रिया सुळेंनी मोदींना एकटे राहण्यात अभिमान वाटतो असे म्हटले. तर कोल्हापूर येथे बोलताना शरद पवारांनी मोदींना पवार कुटुंबियांची चिंता करू नये असे म्हटले आहे.


भाजप नेत्यांची अंडीपिल्ली माहिती...
अजित पवारांनी पुण्यात एक प्रचार सभा संबोधित केली. यात त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या सर्वच नेत्यांची नावे जाहीर करून त्यामागची कारणे सांगणार असे स्पष्ट केले. ते नेते कशासाठी भाजपमध्ये गेले याची कारणे सांगणार, त्या सर्वांची अंडीपिल्ली मला माहिती आहेत. मुलींना पळवून नेण्याची आणि शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे असे माजी उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत. बारामती लोकसभेसाठी बुधवारी सुप्रिया सुळे आणि पुणे जागेसाठी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. याच निमित्त ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अजित पवार, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे, पार्थ पवार देखील उपस्थित होते.


ज्यांना एकटे राहण्यात अभिमान वाटतो त्यांना नाती काय कळतील...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वर्धा येथे पहिला प्रचार सभा घेताना पीएम नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबियांवर घणाघात केला होता. पवार कुटुंबियात सध्या गृहयुद्ध सुरू आहे. शरद पवारांची पक्षावर पूर्वीसारखी पकड राहिलेली नाही. पुतणे अजित पवार राष्ट्रवादी ताब्यात घेत आहेत असे मोदी म्हणाले होते. त्यास सुप्रिया सुळेंनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी आपले बंधू अजित पवार यांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतला. तसेच सभेला संबोधित करताना, ज्यांना एकटेच राहण्यात अभिमान वाटतो अशा लोकांना नाती-गोती काय कळतील असे म्हणत थेट मोदींवर निशाणा साधला.


कोल्हापुरात शरद पवारांचे मोदींना खडेबोल...
कोल्हापूर येथे महाआघाडीच्या सभेला संबोधित करताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले, की "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये. माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत. माझी आई कोल्हापूरची होती." पवार पुढे म्हणाले, की मोदी जेथे जातात तेथे काँग्रेसवर टीका करतात. परंतु, इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवून इतिहासच नाही तर भूगोल घडवला. तर सोनिया गांधींचे पती राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यांनी देश सोडला नाही. त्यांनी देशाची बांधिलकी जपली असेही पवार यांनी सांगितले आहे.

0