आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभव समाेर दिसू लागल्याने पवारांची चिडचिड हाेतेय​​​​​​​

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'पराभव माणसाची सद्सद‌्विवेकबुद्धी कमी करतो, चिडचिड वाढवतो. त्यामुळे भाषणांमध्ये वक्तव्यांसोबत हातवारे केले जातात. परंतु मी तसे करणार नाही,' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'दिव्य मराठी'ला दिलेल्या विशेेष मुलाखतीत दिली. मंत्र्यांची कापलेली तिकिटे, अादित्य ठाकरेंची उमेदवारी अन‌् बंडखाेरांचा ताप याबाबतच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.

प्रश्न : तुम्ही म्हणता समोर विरोधकच नाही. मग प्रचारात मोदी, अमित शहांपासून इतर नेत्यांचा का वापर केला जात अाहे?
मुख्यमंत्री : विराेधक नसले तरी चुरस असतेच ना. निवडणुका गाफीलपणे घेता येत नाहीत. तुम्ही प्रचार करता की नाही हे इतर काेणी पाहत नसले तरी जनता पाहत असते. तसे न केल्यास जनतेला वाटते तुम्हाला मतांची गरज नाही. त्यामुळे निवडणूक ही निवडणुकीप्रमाणेच लढली पाहिजे. जास्तीत जास्त जागा जिंकणे हे युतीचे ध्येय अाहे. त्यामुळेच माेठ्या नेत्यांना राज्यात बाेलावले अाहे. अन‌् जनतेलाही माेदींचे भाषण एेकायचे असते.

प्रश्न : मग तुम्ही तुमच्या नागपूर मतदारसंघाकडे का फिरकत नाही?
मुख्यमंत्री : तिथेही मी सभा घेतल्या आहेतच. हे मान्य की राज्यात जेवढ्या सभा घेत आहे त्यामानाने नागपूरमध्ये घेत नाही. परंतु निवडून अाल्यानंतर मी राज्यात जबाबदारी कशी पार पाडली अाहे हे नागपूरकरांनी पाहिले अाहे. त्यांना माझ्या कामाची जाण असल्याने तेथे मी प्रत्यक्ष नसलो तरी त्यांच्या सोबतच आहे हा विश्वास त्यांना आहे. नितीन गडकरी यांनी माझ्या मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे. मतदारांचा विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे माझा विजय निश्चित आहेच.

प्रश्न : तुमची लढाई फक्त शरद पवार यांच्याबरोबरच आहे का?
मुख्यमंत्री : तुम्हीच सांगा काँग्रेसकडे काेणी नेतृत्व अाहे का? राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मात्र या वयातही पक्षाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन राज्य पिंजून काढत आहेत. जो समोर असेल त्यांच्याबरोबरच आम्हाला लढाई करावी लागते. आमची लढाई ही महायुती विरुद्ध महाआघाडी अशी आहे. परंतु शरद पवारांशिवाय काँग्रेस आणि अन्य कोणत्याही पक्षाचा नेता समोर नाही.

प्रश्न : शरद पवारांची वक्तव्ये, हातवारे याबाबत काय सांगाल?
मुख्यमंत्री : पराभव समाेर दिसत असल्याने पवारांची चिडचिड वाढली अाहे. पराभव माणसाची सद‌्सद‌्विवेकबुद्धी कमी करतो, चिडचिड वाढवतो. त्यामुळे भाषणांमध्ये हातवारे केले जातात. त्यांच्यासारख्या नेत्याकडून अशी अपेक्षा नाही. परंतु पराभव अनेक गोष्टी करण्यास भाग पाडतो. त्यांनी काहीही केले तरी मी तसेच प्रत्युत्तर देणार नाही.

प्रश्न : राज ठाकरेंच्या मनसेला प्रबळ विराेधी पक्ष व्हायचंय?
मुख्यमंत्री : राज ठाकरे हे अत्यंत प्रॅक्टिकल आहेत. त्यांना ठाऊक आहे जनतेकडे सत्ता मागून काहीही उपयोग होणार नाही म्हणून त्यांनी मध्यम मार्ग काढलाय. लोकसभेला ज्या पक्षासाठी त्यांनी मते मागितली आता त्याच पक्षांची जागा अाता त्यांना घ्यायची अाहे. त्याच वेळी आम्ही राज ठाकरेंना सांगत हाेताे 'तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी उडवली जात आहे...' परंतु त्यांनी ऐकले नाही. आता त्यांना कसलीही संधी मिळणार नाही.

प्रश्न : सरकारच्या धोरणामुळे अमोल यादवला परदेशात जाऊन विमान बनवावे लागले. मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया योजना अयशस्वी ठरल्या का?
मुख्यमंत्री : बरे झाले तुम्हीच विषय काढलात. काही मिनिटांपूर्वीच मला अमोल यादव यांचा मेसेज आला आहे. (मोबाइलवर मेसेज वाचून दाखवला). अमोल यादव म्हणतात, 'राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मला मदत केल्यामुळेच मी देशातील पहिले विमान बनवू शकलो आहे आणि आता त्याला सर्व परवानग्या मिळाल्याने व्यावसायिक काम सुरू करता येईल. यासाठी आपले खूप खूप धन्यवाद....' आता तुम्ही मला सांगा आम्ही अयशस्वी ठरलो आहे का? बाकी राज्यात किती गुंतवणूक झाली, किती नोकऱ्या उपलब्ध झाल्या त्याची आकडेवारी सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही. कारण ही सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे. शेतकरी कर्जाची माहितीही ऑनलाइन उपलब्ध आहे. आम्ही कृषीवर जेवढे पैसे खर्च केले तेवढे आघाडी सरकारने १५ वर्षांत केलेले नाहीत. देशावर मंदीचा थोडाफार परिणाम होईल, परंतु त्यातून आपण बाहेर पडून प्रगती करणारच आहोत.

प्रश्न : निवडणुकीच्या काळातच शरद पवार, राज ठाकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावला?
मुख्यमंत्री : ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे आणि ती न्यायालयाच्या निर्णयानुसार काम करते. न्यायालय काही भाजपचे नाही, म्हणून ते भाजपच्या फायद्यासाठी नाेटीस काढणार नाहीत. अाणि अाराेपांत किती तथ्य आहे ते चौकशीत बाहेर येईलच. प्रफुल्ल पटेल मंत्री असताना त्यांचे देशात बॉम्बस्फोट करणाऱ्या दहशतवाद्याशी संबंधित असल्याची बाब पुढे अालीय, ते दुर्दैवी आहे.

मंत्र्यांचे तिकीट कापणे अामच्यासाठीही शाॅकिंग... 
प्रश्न : खडसे, तावडे, मेहता व बावनकुळे यांना उमेदवारी का दिली नाही?
मुख्यमंत्री : ज्या जागा हमखास निवडून येतील अशा ठिकाणी एकाच उमेदवाराचे आणि जेथे थोडाफार संशय असेल अशा ठिकाणी दोन नावे अाम्ही केंद्रीय समितीकडे पाठवली होती. विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांची तर सिंगलच नावे होती. मात्र केंद्रीय समितीने खडसे यांच्याऐवजी दुसरा उमेदवार द्यावा, असे कळवले होते. खडसेंनाही अाम्ही तसे पूर्वीच कळवले हाेते अाणि म्हणून तिथे उमेदवार बदलला. इतर मंत्र्यांची नावे केंद्रीय समितीने का नाकारली हे मी सांगू शकत नाही, केंद्रीय समितीला तसे अाम्ही विचारूही शकत नाही. मात्र, आमच्यासाठीही ही बातमी शॉकिंग होती.

विदर्भात अात्महत्या करणारा 'ताे' शेतकरी नव्हताच... 
प्रश्न : भाजपचा टी शर्ट घालून शेतकरी अजूनही आत्महत्या का करतायत?
मुख्यमंत्री : 'त्या' व्यक्तीच्या आत्महत्येमागचे कारण वेगळे आहे. ते मी सांगून त्यांच्या कुटुंबाविषयी गैरसमज पसरवू इच्छित नाही. दुसरी गोष्ट अशी की विदर्भातील तो शेतकरी नव्हता, त्याच्या नावावर जमीन नाही आणि त्याने कर्जही घेतलेले नाही आणि महत्त्वाचे म्हणजे ताे भाजपचा कार्यकर्ता होता.
 

बातम्या आणखी आहेत...