आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांशी बापूंची बांधिलकी : शरद पवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- बापू सदैव ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार मांडत. काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांशी बापूंची बांधिलकी होती. बापूंचे विचार आणि आदर्श मनाशी बाळगत समाजाचा व परिसराचा सर्वांगीण विकास साधणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून त्यासाठी एकविचाराने राहून सर्वांगीण विकास साधणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 


रविवारी पवार यांनी वांगदरी येथे नागवडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. ते म्हणाले, बापूंनी सहकारी संस्थांमध्ये कामाचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. तो जतन करणे गरजेचे आहे. बापूंचे मार्गदर्शन हा सगळ्यांना मोठा आधार होता. त्यांना राज्यातील सहकारी कारखानदारीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. बापू आमदार राहुल जगताप यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले, त्यामुळेच त्यांना संधी मिळाली. बापूंची पुढची पिढी अनुराधा व राजेंद्र नागवडे चांगले काम करत आहेत. बापूंच्या जाण्याने त्यांचा आधार तुटला आहे, नागवडे कुटुंबीयांना साथ देणे ही आमदार राहुल आणि सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पवार म्हणाले, बापूंकडे प्रचंड इच्छाशक्ती होती. ते आजारपणातून बाहेर पडतील अशी सर्वांना आशा होती. मात्र, सर्व काही तुमच्या आमच्या-हातात नसते. बापूंनी दाखवलेल्या आदर्श मार्गाने मार्गक्रमण करून समाजाचा व परिसराचा सर्वांगीण विकास साधणे हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांचे सर्वांशी सुसंवाद व विचारविनिमय केलेले काम आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावनाही पवार यांनी व्यक्त केली. 


आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार अशोक पवार, अरुण कडू, प्रताप ढाकणे, पोपटराव पवार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विश्वजित माने, जगन्नाथ भोर, आनंद कदम, प्रांजल शिंदे, रमेश खाडे, कैलास तांबे आदींनी नागवडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. 

बातम्या आणखी आहेत...