राजकीय / भाजपच्या ‘भीती’तून निर्माण झाली ‘पवार पॉवर’

  • भाजपतील ‘दोन्ही बड्यां’ना राजकारणातील चाणक्य मानले जाते

दिव्य मराठी

Dec 16,2019 03:07:29 PM IST

राजदीप सरदेसाई

भारतीय राजकारणात शरद पवारांइतके गूढ नेते खूपच कमी असतील. मुंबईत पूर्वीपासून असे म्हटले जाते की, ‘पवार जो विचार करतात, जे बोलतात आणि जे करतात, त्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात.’ त्यामुळे गेल्या महिन्यात महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य रंगले, त्यात पवारांची वास्तविक भूमिका काय होती, ते आजही कोणी सांगू शकत नाही. पुतणे अजित पवार भाजपसोबत चर्चा करीत आहेत, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या पवारांना खरोखरच माहीत नव्हते ? की ते चांगला राजकीय लाभ उठवण्यासाठी दोन्ही बाजूंशी खेळत होते? यातील पूर्ण सत्य क्वचितच बाहेर येईल, पण हे स्पष्ट आहे, की ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलेले पवार हेच महाराष्ट्रातील राजकारणाच्या पटावरचे खरे खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आहे.


काही महिन्यांपूर्वी शरद पवार एका अर्थाने उपेक्षित होते. त्यांच्या पक्षातील डझनभर नेते आणि एक खासदार निवडणुकीआधी पक्ष सोडून गेले होते, त्यांच्या कुटुंबातही फुटीची स्थिती होती. त्यांचे नाव ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या ‘एफआयआर’मध्ये त्यांचे नाव होते. ही देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी चूक होती. त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ नेता आणि एका उदयोन्मुख ताऱ्यामध्ये खुला संघर्ष उभा राहिला. खरे तर राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी पवारांची जी प्रतिमा निर्माण केली, त्याप्रमाणे ते राज्यव्यापी नेते कधी नव्हते. त्यांचा जनाधार पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित होता आणि त्यांचे मराठ्यांवर नियंत्रण होते. ते कधीही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे बहुमत आणणारे नेता नव्हते, तर निवडणुकीनंतरच्या आघाड्यांतून किंवा फुटीर गटांमार्फत त्यांनी राज्यात आपले स्थान निर्माण केले. त्यांनी महाराष्ट्राबाहेर आपला प्रभावही वाढवला नाही. पंतप्रधान बनण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न दिल्लीतील दरबारी राजकारणाने असफल ठरले. असे असतानाही ते सदैव एक स्वयंसिद्ध आणि चतुर राजकीय नेता बनून राहिले. ‘राजकारणात कुणी कायमचा मित्र वा शत्रू नसतो, पण परस्परहित कायम असते,’ हा त्यांचा सिद्धांत होता. त्यामुळेच सर्व पक्षांमध्ये त्यांच्या मित्र आणि सहकाऱ्यांचे मोठे नेटवर्क आहे. २०१५ मध्ये त्यांच्या पंचाहत्तरीच्या वेळी नरेंद्र मोदींपासून सोनिया गांधींपर्यंत अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.


व्यक्तिगत आणि राजकीय मतभेदांच्या पलीकडे संबंध टिकवण्याच्या याच क्षमतेमुळे वर्षानुवर्षे त्यांची ‘पवार पॉवर’ कायम राहिली. ते आघाडीच्या युगातील खरे नेता आहेत. १९७८ मध्ये त्यांच्या पुरोगामी लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जनसंघ आणि समाजवादी काँग्रेस एकाच झेंड्याखाली एकत्र आले होते. हा प्रयोग दोन वर्षेच चालला, पण त्यातून हे स्पष्ट झाले की, पवार असे नेता आहेत, जे फार खोलपर्यंत विचारसरणीचे ओझे वागवत नाहीत. शिवसेनेशी राजकीय शत्रुत्व असतानाही त्यांनी कधीही एका मर्यादेपलीकडे बाळासाहेब ठाकरे यांना निशाणा बनवले नाही. पवार- ठाकरे हे परस्परांच्या सन्मानाचे किंवा सोयीचे असलेले समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख ठरले. ते कधी बंगाल किंवा तामिळनाडूसारखे राजकीय लढाई व्यक्तिगत स्तरावर नेणारे बनले नाही.


फडणवीस-अमित शहा-मोदी यांच्या उच्च प्रतिस्पर्धेच्या राजकारणाने महाराष्ट्राला अपेक्षित असलेल्या इको-सिस्टिमला धक्का दिला. राजकीय प्रतिस्पर्ध्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि ‘एफआयआर’मुळे इथल्या राजकीय वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जे भाजपमध्ये आले, त्यांना ‘सुरक्षे’चे आश्वासन मिळाले आणि जे आले नाहीत त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी निशाणा बनवायला सुरुवात केली. त्यातूनच आपलेही अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न होतो आहे, असे भाजपचा जुना सहकारी असलेल्या शिवसेनेलाही वाटू लागले.


याच भीतीचा वापर करून पवारांनी महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर असंभव वाटणारा प्रयोग यशस्वी करून दाखवला. ज्यांच्यात आपले अस्तित्व टिकवण्याच्या गरजेपेक्षा अन्य कुठलीही समानता नाही, असे पक्ष “मोदीत्वा’च्या विरोधामुळे नव्हे, तर मोदी-शहा-फडणवीस या त्रिकुटाच्या भीतीमुळे एकत्र आले. या आघाडीचे भविष्य भलेही अनिश्चित असेल, पण त्यातून भाजपच्या प्रभावाविरुद्ध प्रादेशिक पक्षांना एक आयडिया नक्कीच मिळाली आहे. पंतप्रधान संघराज्याबद्दल बोलत असले, तरी भाजपने प्रादेशिक पक्षांना कमजोर करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आघाड्याही तुटल्या. आधी तेलगू देसम आणि आता शिवसेनेच्या बाबतीत तेच झाले. कदाचित, पुढे संयुक्त जनता दलाबाबतही असेच होऊ शकते. भाजप असे म्हणू शकते की, महाराष्ट्रातील निवडणूक नरेंद्र-देवेंद्र या डबल इंजिनाच्या मुद्द्याने लढला गेली, पण निकालानंतर शिवसेनेने भूमिका बदलून धोका दिला. पण, प्रश्न हाच आहे की, त्यांना आपल्या जुन्या सहकाऱ्याशी सत्तेतील भागीदारीबाबत चर्चा करण्यापासून कुणी अडवले होते? उद्धव यांना मोदींच्या एखाद्या फोनने वा अमित शहा यांच्या ‘मातोश्री’वरील एखाद्या भेटीमुळेही स्थिती बदलली असती. हे खरे आहे की, शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आतुर होती. पण, भाजपकडून पाच वर्षे उपेक्षित ठेवले जाणे हेही त्याचे एक कारण होते.

भाजपतील ‘दोन्ही बड्यां’ना राजकारणातील चाणक्य मानले जाते, पण लहान पक्षांवर धाकदपटशा दाखवणे ही चाणक्यनीती नाही. एखाद्या सहकाऱ्याचा अहम शांत करण्यासाठी काहीतरी देवाणघेवाण करून मेळ घालण्याची गरज असते. राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे दमन करण्यासाठी सत्तेचा वापर केल्याने संशय आणि शत्रुत्व निर्माण होते. मोदी-शहा यांनी पवारांकडून हे शिकले पाहिजे की, खरे राजकारण केवळ हाती काठी घेऊन नाही, तर कधी कधी गाजर घेऊनही करावे लागते. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारादरम्यान मी पवारांना विचारले होते की, राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार आहे का? त्यावर त्यांचे उत्तर होते, ‘अभी तो में जवान हूं!’ या कहाणीचे तात्पर्य हेच की, राजकारणात सत्तेचा सुगंधच तरुण राहण्यासाठीचे शाश्वत अमृत आहे.

X
COMMENT