आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोडपाणी झाल्यानेच डान्स बारवरील बंदी उठली; पवारांचा फडणवीस सरकारवर आरोप 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- दिवंगत आर.आर.पाटील यांनी माेठे धाडस दाखवून डान्स बार बंदीचा निर्णय घेतला हाेता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या कायद्यातील अटी रद्द ठरवत डान्स बारवरील बंदी उठवली. सरकारला वकिलांमार्फत आपली बाजू भक्कमपणे मांडता आली नाही. यात तोडपाणी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर केला. 

संपर्क यात्रेनिमित्त ते शुक्रवारी चाळीसगाव येथे आले होते. या वेळी झालेल्या सभेत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. उत्तर महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्याची सुरुवात चाळीसगाव येथून झाली. डान्स बारवरील बंदी कायम राहण्यासाठी आताच्या बिनकामी सरकारने काहीच केले नाही. आघाडी सरकाने घेतलेल्या निर्णयाची आठवण करून देत आर.आर. पाटील यांनी डान्स बार बंदीबाबतचा निर्णय अभ्यासाअंती घेतला होता. मात्र, आताच्या सरकारने निर्णय कायम ठेवण्यासाठी कुठलाच अभ्यास केला नाही. अनेक कुटुंब डान्स बारमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे डान्स बारला आमचा विरोध आजही कायम असल्याचे पवार म्हणाले. न्यायालयाने मंजुरी देताना अनेक अटी-शर्ती घातल्या आहेत. पण त्याचे पालन किती प्रमाणात केले जाईल? याविषयी शंका आहे. त्यामुळे हप्तेखोरी वाढेल, असाही आरोप त्यांनी या वेळी केला.

 

कर्जमाफीची यादी द्या 
अदानी अन् अंबानीस वाढवणारे केंद्र व राज्यातील सरकार कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी दाखवण्यास तयार नाही. सत्तेचा अहंकार भाजप-सेना सरकारला झाला असून नगरपालिका, महनगरपालिकेत आमच्या पक्षाच्या सदस्यांना नाहक अपात्र ठरवले जात आहे. भाजप सत्तेसाठी केविलवाणा प्रयत्न करत असून लाेकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत असल्याची टीका पवारांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका नेहमी गोंधळात टाकणारी असते. शिवनेरीची माती घेऊन ते राम मंदिर उभारणीसाठी अयाेेध्येला गेले. पण मुंबई महापालिकेत त्यांचीच सत्ता असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारले नाही, अशी टीकाही पवार यांनी केली. 

 

बातम्या आणखी आहेत...