आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांसह एकूण 830 कर्मचाऱ्यांचे सात महिन्यांपासूनचे वेतन थकवले! 33 लाख रुपये वसूल करून संस्थेने फसवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय चिंचोले

औरंगाबाद : ग्रामीण भागामधील मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारायचाय, असे म्हणत एक संस्था स्थापन केली. ही संस्था केंद्र सरकारच्या मानव संसाधन व बालपृष्ठ आहार मंत्रालयाशी संलग्नित असल्याचे सांगितले. त्यातून शिकवणी वर्गासाठी नोंदणी शुल्क म्हणून हजारो मुलांकडून लाखोे वसूल केले. शिकवण्यासाठी म्हणून हजारो कर्मचारी नेमले. त्यांच्याकडूनही नोंदणी शुल्काच्या रूपात लाखोंची वसुली केली. फक्त औरंगाबाद जिल्ह्यातूनच संस्थेने ३३ लाख रुपये गोळा केले, पण प्रत्यक्षात गेल्या सात महिन्यांपासून कुणालाही ठरलेल्या पगाराचा एक खडकूही दिला नाही, ना मुलांना कुठल्या सवलती दिल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांत अजूनही हे वर्ग चालू आहेत. या हजारो कर्मचाऱ्यांना भविष्यात सरकारी नोकरीचेही आमिष दाखवण्यात आले होते. पण नोकरी तर दूर आहे ते तुटपुंजे मानधनही सात महिन्यांपासून त्यांना मिळालेले नाही.

महेंद्र सिडाम (रा. तुलना, ता. राजुरा, जि. चंद्रपूर ) असे आमिष दाखवणाऱ्याचे नाव असून त्याने महाराष्ट्रातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, पूर्णा, परभणी, नांदेड, जालना, जळगाव, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अहमदपूर, पोंभूर्णा व अन्य जिल्ह्यांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांकडून त्याने पैसे गोळा केले आहेत. तो सध्या कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यासाठी दिल्ली कार्यालयात आल्याचे सांगत आहे.

कार्यालयही थाटले

सिडाम याने चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे व्यंकटेश कॉम्प्युटरच्या पाठीमागे पंचायत समिती भागात खास कार्यालयही थाटले आहे. चंद्रपूरमध्ये तुकुमरोड, मातोश्री शाळेच्या पाठीमागे आई या अपार्टमेंटमध्ये तर नागपूर जिल्ह्यातील लाखनी बसस्थानकासमोर पोस्ट ऑफिसच्या वरच्या मजल्यावरही त्याचे अलिशान कार्यालय आहे. आपल्या या संस्थेचे मुख्य कार्यालय उत्तर प्रदेशातील नोएडा येथील ११ सी ब्लॉक, अपूर्वा अपार्टमेंट, सेक्टर ५५ येथे असल्याचे तो सांगतो.

संस्थेची नावेही वेगवेगळी

सिडामने कधी प्रयास रन जेसेस नावाने संस्था, तर कधी जागृती सेवा संस्थान समिती नोएडा या संस्थेअंतर्गत संस्था स्थापन केल्याचे सागतो. महाराष्ट्रातील ४ ते १४ या वयोगटातील पहिली ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण देत त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, मोबदल्यात त्यांना शिष्यवृत्ती, गणवेश, पोषण आहार व कुटुंबाला एक लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय सेवा दिली जाईल, असे आश्वासन सुरुवातीला त्याने दिले होते.

असे ठरले होते मानधन

संस्थेच्या कामकाजासाठी सिडामने इतर जिल्ह्यांप्रमाणेच औरंगाबाद जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची पर्यवेक्षक, शिक्षक, तालुका समन्वयक, जिल्हा समन्वयक या पदावर नियुक्ती केली. पर्यवेक्षकांना सुरुवातीचे ३ महिने ६८०० रुपये व टप्प्याटप्प्याने ९ हजार ८०० ते १२ हजार रुपये मानधन, तर शिक्षकांना याच पद्धतीने १५०० ते २२५० आणि काहींना २२०० ते ५५०० रुपये मानधन. तालुका समन्वयकाला १४ हजार ६०० व जिल्हा समन्वयकांना २५ ते ४० हजार रुपये मानधन देण्याचे आमिष सिडामने दाखवले. पण प्रत्यक्षात यातील कुणालाही त्याने गेल्या सात महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. औरंगाबाद जिल्ह्यात तर ३३ हजार २०० विद्यार्थी आणि ८०० हून अधिक बेरोजगार या आमिषाला बळी पडल्याचे नेहा ढोके (रा. शिवाजीनगर, औरंगाबाद) या महिलेने सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यामधून तर तब्बल ३३ लाख रुपये मिळवले

औरंगाबाद जिल्ह्यात हा उपक्रम गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री येथील ४५० गावांत सुरू असून तब्बल ७७६ बॅच सुरू आहेत. यात ३३ हजार २०० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ७० रुपयांप्रमाणे २३ लाख २४ हजार तसेच ८३० शिक्षकांपैकी १०० शिक्षकांकडून १०३० रुपयांप्रमाणे १० लाख ३० हजार रुपये, असे एकूण ३३ लाख ५४ हजार रुपये सिडामने वसूल केले.

कर्मचाऱ्यांनीच पैसे गोळा केल्याचा उलटा आरोप

नेहा ढोके या महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार डीबी स्टारने नोएडा कार्यालयातील स्टेट हेड वल्लभ पांडे यांना फोनवर सलग आठ दिवस संपर्क केला. संदेशही पाठवले मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नंतर डीबी स्टार चमूने जागृती संस्थेत शिक्षक या पदावर काम करत असल्याचे सांगत नागपूरमधील महाराष्ट्र अधिकारी भुवनेश्वर गेडाम यांच्याशी संपर्क केला. आमचा पगार कधी होणार असा सवाल करताच त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यावर मी दिल्ली कार्यालयात उद्या येणार असल्याचे सांगताच त्यांनी नोएडा येथे कुठल्याही इतर व्यक्तीला प्रवेश नसल्याचे सांगत संशय असेल तर काम सोडून देण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर चमूने सिडाम व या संस्थेचे कंेद्रीय अधिकारी वल्लभ पटेल यांना संपर्क केला. त्यांना काही प्रश्नही विचारले. पण त्यांनी महाराष्ट्रात खूप चांगले काम सुरू असून तुम्ही कुठेही माहिती घ्या, असे सांगत बनावट पत्रके कर्मचाऱ्यांनीच छापली, त्यांनीच पालकांकडून पैसे घेतल्याचे सांगत कर्मचाऱ्यांकडेच बोट दाखवले.

काय म्हणतात सुशिक्षित बेराेजगार

ही संस्था बोगस आहे. मी स्वत: या संस्थेत वर्षभर ब्लॉक ऑफिसरचे काम केले आहे. नांदेड जिल्ह्यातून प्रत्येक कर्मचारी आणि पालकांकडून आम्ही संस्थेला एक कोटीच्या वर पैसे संकलित करून दिले. पण गेल्या वर्षभरापासून नांदेड जिल्ह्यात एकाही कर्मचाऱ्याचा पगार झालेला नाही. यासंदर्भात आम्ही तक्रार केल्यानंतर सिडामची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्याने इकडील सर्व व्यवहाराला टाळे ठोकून तो पसार झाला आहे. -रवी घोडके, नांदेड

सिडामच्या जाळ्यात अडकलेल्या सुशिक्षित बेरोजगारांनी आमच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार आम्ही मुंबईतील राज्य गुप्तचर विभागाकडे तक्रार केली आहे. बेरोजगारांच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी राज्य आयुक्त गुप्तवार्ता, तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी जाबजबाब नोंदवणे सुरू केले आहे. -डॉ. एन. एम. घोटकेकर, राष्ट्रीय क्रांतिकारी समाजवादी पार्टी, अहमदपूर

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी गावात कर्मचारी आणि पालकांचा खिसा खाली केला. वर्षभरापासून पगाराची वाट पाहत आहोत.नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडेही आम्ही या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. -विजय वाघमारे, कर्मचारी

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातही या संस्थेने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व शिक्षण अधिकाऱ्यांकडे या बोगस संस्थेची चौकशीची मागणी केली होती. पण पुढे काहीही झाले नाही. आम्हीच आमच्या सुशिक्षित बेरोजगारांना आणि राज्यभरातील पालकांना विनंती करतो की, अशा बनावट संस्थांच्या भूलथापांना बळी पडू नका. -विनोद कोहपुरे, कर्मचारी, पोंभूर्णा (चंद्रपूर)

काय म्हणतात जबाबदार

मी स्वत: या संस्थेचा कर्मचारी आहे. महाराष्ट्र ऑफिसर या पदावर माझी नियुक्ती केली आहे. शिक्षिकांचे पगार आणि विद्यार्थ्यांचे शुल्क परत मिळावे म्हणून मी दिल्ली कार्यालयात पैसे घेण्यासाठी आलो आहे. लवकरच कर्मचाऱ्यांचे पगार करून शिकवणी वर्ग नव्याने सुरू करणार आहोत. -महेंद्र सिडाम, महाराष्ट्र ऑफिसर, चंद्रपूर

औरंगाबादसह गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री येथे विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन आम्ही महेंद्र सिडाम यांच्या स्वाधीन केले आहेत. पण अद्याप एकाही विद्यार्थ्याला सुविधा मिळाली नाही. कुठल्याही कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप झाला नाही. सिडाम यांनी ७ जानेवारी २०२० या तारखेचा ५६ लाख ८६ हजारांचा चेक व्हॉट्सअॅप केला आहे. आता आम्ही औरंगाबाद पोलिस आयुक्तालयात स्वत: तक्रार करणार आहोत. तय्यब पठाण, जिल्हा समन्वयक