आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७२ वर्षानंतर आजही ब्रिटिश कंपनीच्या मालकीच्या जीर्ण ट्रॅकवर चालतेय भारतीय ‘शकुंतला’ रेल्वे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ब्रिटिश जोखडातून  देश स्वतंत्र झाल्याचा ७२ वा उत्सव आनंदात सुरू आहे. मात्र, भारतीय अशी ओळख असलेली ‘शकुंतला रेल्वे’ आजही ब्रिटिश कंपनीच्या मालकीच्या जीर्ण ट्रॅकवरून धडधडत प्रवाशांना सेवा देत आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारने एका कंपनीसोबत करार केला. नंतर दुसऱ्या कंपनीला देखभालीचे काम दिले. रेल्वेने प्रवाशांच्या सोईसाठी ट्रॅक रॉयल्टीवर घेऊन गाडी सुरू केली. इतर रेल्वेचे राष्ट्रीयीकरण होत असताना झालेले दुर्लक्ष, अशा अडथळ्यांचा प्रवास ही रेल्वे आजही करत आहे.  


‘भारतीय रेल्वे आपल्याच देशात रेल्वे चालवायला ब्रिटिश कंपनीला देते रग्गड पैसा’ या ‘रेल्वेवर अजूनही आहे इंग्रजांची मालकी’, ‘भारताच्या या भागात अजूनही ब्रिटिश कंपनीच चालवतेय रेल्वे’ अशा वृत्तांमुळे शकुंतला एक्सप्रेस प्रसिद्ध आहे. कमी खर्चात सेवा देण्याचे काम मात्र ही रेल्वे आजही करत आहे. वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबई मार्गे मँचेस्टरकडे नेण्याच्या मूळ उद्देशाने ब्रिटिशांनी हा मार्ग उभारला. पुढे या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली. मध्य रेल्वेने प्रवासी रेल्वेची जबाबदारी स्वीकारली आणि मूर्तिजापूर ते अचलपूर या ७७ किलोमीटर आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ मार्गावर शकुंतलेचा प्रवास सुरू झाला. रेल्वेच्या वतीने ब्रिटिश कंपनीला रेल्वे ट्रॅक आणि संबंधित अास्थापनांच्या बदल्यात वार्षिक सुमारे १ कोटी २० लाखांवर रॉयल्टी द्यावी लागत होती. त्या कंपनीचा करार १०० वर्षांनंतर १९९६ मधेच संपला. नंतर भारत सरकार व कंपनीतील वाटाघाटींनुसार २००६ आणि पुन्हा  २०१६ पर्यंत त्याला मुदतवाढ मिळाली. शकुंतला एक्स्प्रेससाठी अमरावतीचे खासदार आनंद आडसूळ आणि वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी पाठपुरावा केला. तेव्हा याच्या ब्रॉडगेजसाठी रेल्वे मंत्रालयाने २१०० कोटींच्या खर्चाला मान्यता दिली. मात्र, या ट्रॅकची मालकी आजही ब्रिटिश कंपनीकडे आहे. या रेल्वेच्या राष्ट्रीयीकरणासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे आणि करार संपल्यामुळे सध्या या ट्रॅकची मालकी कोणाकडे हा संभ्रमच आहे.


भवितव्य अधांतरी...
यवतमाळ ते मूर्तिजापूर या ११४ किलोमीटरच्या प्रवासासाठी पूर्वी ११ रुपये तर आता १९ रुपये भाडे आहे.  एसटी यासाठी सुमारे १२५ रुपये भाडे आकारते. मूर्तिजापूर-यवतमाळ ही गाडी सध्या बंद करण्यात आली आहे. यापूर्वीही असे प्रयत्न झाले, पण त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. पण ट्रॅकची दुर्दशा पाहता त्या किती दिवस चालतील याबद्दल शंका व्यक्त केली जाते. कारण रॉयल्टी घेणाऱ्या कंपनीने या रेल्वेच्या विकासासाठी नंतर कोणतेही पाऊल उचललेले नाही.  


नेक्सन अँड कंपनी  
२५ डिसेंबर १९०३ रोजी शकुंतलेचा प्रवास सुरू झाला. या मार्गाची उभारणी क्लिक - नेक्सन अँड कंपनी या ब्रिटिश कंपनीने केली. नंतर त्याचे नाव ‘सेंट्रल प्रोव्हिन्स’ झाले. १०० वर्षांच्या करारानुसार कंपनीकडे रेल्वे, ट्रॅकची मालकी आली. १९५२ मध्ये इतर रेल्वेचा ताबा भारताकडे आला. शकुंतला रेल्वे लाइनची मालकी मात्र कंपनीकडेच राहिली. अलीकडे कमी उत्पन्न आणि देखभालीचा खर्चच जास्त यामुळे मध्य रेल्वेने या कंपनीला रॉयल्टी देणे बंद केले अाहे. जे उत्पन्न मिळते त्यात देखभालीसाठी खर्च सुरू आहे. 

 

सेंट्रल प्रोव्हिन्सचे आजही नेटवर्क  
‘सेंट्रल प्रोव्हिन्स कंपनी लिमिटेड’ आजही छोट्या रेल्वे मार्गांची उभारणी करून मग ती भारतीय रेल्वेला हस्तांतरित करते. या कंपनीने दौंड- बारामती, पुलगाव- आर्वी, पाचोरा - जामनेर, दारव्हा - पुसद यासह अनेक लाइन टाकल्या, त्या भारतीय रेल्वेच्या भाग झाल्या. शकुंतला मात्र त्याला उपवाद राहिली.

 

म्हणून सुरू होऊ शकली रेल्वे  
१९०३ मध्ये यवतमाळ रेल्वे लाइन आणि १९१३ मध्ये अचलपूर रेल्वेचा विस्तार करण्यात आला. या दोन्ही खंडांचे काम तेव्हा ‘ग्रेट इंडियन पेन्सिलर रेल्वे’  म्हणजे जीआयपीआरच्या वतीने करण्यात आला होता. १९२५ मध्ये जीआयपीआर ही भारतीय रेल्वेत समाविष्ट झाली. त्यामुळे या ट्रॅकवरून गाड्या चालवायला सुरुवात करण्यात आली.  

 

शतकानंतर टाकला रेल्वेचा लोगो  
२०१८ मध्ये शकुंतलाच्या डब्यावर भारतीय रेल चा लोगाे  लागला.तर मूर्तिजापूर - अचलपूर धावणाऱ्या गाडीचा क्रमांक १३७ व १३८ आणि यवतमाळ गाडीवर १३१ व १३२ हा क्रमांक होता. लोगोसह  या गाड्यांना पाच अंकी क्रमांक देण्यात आला. या आकड्यांच्या आधी ५२ हा आकडा वाढवण्यात आला आहे.  

 

नामकरण  
स्वातंत्र्यसैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्नी शकुंतलाबाईंच्या नावावरून गाडीला नाव पडले. शकुंतलाबाईंचे वडील रेल्वेत अधिकारी होते. रेल्वेच्या दुर्दशेबद्दल त्या दु:ख व्यक्त करत. त्यांच्या स्मृतिदिनी या लोहमार्गाच्या विकासासाठी मूर्तिजापूर ते अचलपूर अशी प्रवास परिक्रमा या गाडीने आयोजित करण्यात आली होती.


फाटक आले की उतरतो कर्मचारी   
शतकोत्तर शकुंतलेची शोकांतिका म्हणजे तिच्या मार्गावरील एकाही गेटवर कर्मचारी नाही. त्यामुळे फाटक आले की गाडी थांबते. गाडीतून कर्मचारी उतरतो, फाटक बंद करतो किंवा दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवतो. गाडी हळूहळू पुढे जाते, नंतर  पुन्हा तो गाडीत जातो आणि पुढचा प्रवास सुरू होतो.


राष्ट्रीयीकरणच विसरले
गाड्यांचा विकास, अपघात, सुरक्षा यासंबंधातील व्यवस्थापन आणि समन्वय करताना ट्रॅक खासगी असल्यामुळे मोठ्या अडचणी आहेत. विदेशी आणि खासगी गुंतवणूक धोरणानुसार ट्रॅक आणि पायाभूत सुविधांची खासगी मालकी विचारात घेतली जाऊ शकत नाही. ‘सेंट्रल प्रोव्हिन्स’च्या रेल्वे लाइनचे राष्ट्रीयीकरण करणे शासन विसरले आहे. ‘ग्रेट इंडियन पेन्सिलर रेल्वे’ जीआयपीआर ही केवळ ऑपरेटर आहे, तर सेंट्रल प्रोव्हिन्स कंपनी ही क्लिक – नेक्सन अँड कंपनीची एजंट आहे.  

 

वारसा व पर्यटन रेल्वे करा  
शकुंतला ही ऐतिहासिक रेल्वे आहे. या भागातील निसर्ग व वारसा स्थळांचा विचार करून ही वारसा आणि पर्यटन रेल्वे म्हणून चालवली जावी. ब्रॉडगेजची चर्चा आहे. ते यापूर्वी झालेल्या स्वतंत्र सर्व्हेच्या जागेवर करावे आणि शकुंतला वाचवावी. -  विजय वेल्हेकर, शेतकरी नेते आणि शकुंतलेचे अभ्यासक


ताब्यात आल्याशिवाय विकास नाही : यादव   
ट्रॅक वाईट अवस्थेत आहेत. पण लोकभावना पाहता सध्या रेल्वे सुरू आहे. कंपनी कोणताही खर्च करत नाही आणि रूट ताब्यातही देत नाही. त्यामुळे निर्णय घेता येत नाही. रूट ताब्यात आल्याशिवाय काहीच विकास होेणार नाही. चर्चा सुरू आहे. 
-  आर. के. यादव, डीआरएम, मध्य रेल्वे, भुसावळ

 

बातम्या आणखी आहेत...