आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेनड्राइव्हमधून चिन्मयानंद यांचा खरा चेहरा येईल समोर : पीडितेचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहांपूर : माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा भाजपचे चर्चित नेते स्वामी चिन्मयानंद प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीकडून पीडित मुलीच्या कुटुंबीयांची कसून चौकशी करण्यात येत अाहे. यामुळे पीडित कुटुंब हैराण झाले असून आपल्याला मुद्दाम त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, पीडित मुलीने ज्या तरुणाला भाऊ असल्याचे म्हटले आहे, त्याने पोलिसांना एक पेनड्राइव्ह दिला आहे. या पेनड्राइव्हमधून चिन्मयानंद यांचा खरा चेहरा समोर येईल, असा दावा त्या तरुणाने केला आहे. यामुळे लहानसा पेनड्राइव्ह महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे सांगितले जात आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीकडून पीडित मुलीच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे. कुटुंबीयांनी आरोप केला की, एसआयटीच्या अधिकाऱ्यांची चौकशीची पद्धत अशी आहे की, तेच जणू अपराधी आहेत आणि जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, भाऊ असल्याचे सांगणाऱ्या ज्या तरुणाबरोबर पीडिता राजस्थानात सापडली होती, त्या तरुणाने एसअायटीला सोमवारी एक पेनड्राइव्ह दिला. या प्रकरणाची चौकशी करणारी एसअायटी काही सांगत नसली तरी चिन्मयानंद यांची झोप उडवणाऱ्या मुलीचा आणि तिचा भाऊ असल्याचे सांगितले जात असलेल्या तरुणाचा दावा आहे की, जर एसआयटीने प्रामाणिकपणे याची चौकशी केली तर पेनड्राइव्हमध्ये 'सर्वकाही' आहे. 'सर्वकाही' बाबत बोलताना तरुणाने सांगितले की, या पेनड्राइव्हमध्ये एक व्हिडिओ आहे. चिन्मयानंदचा खरा चेहरा काय आहे, हे चौकशीत सिद्ध करण्यासाठी हा पेनड्राइव्ह पुरेसा आहे.

या तरुणाची एसआयटीने १०-११ तास चौकशी केली. पीडित मुलीचे कुटुंबीय सुरुवातीपासूनच उत्तर प्रदेश पोलिस आणि त्यांच्या एसआयटीकडे संशयाने पाहत आहेत. पोलिस या पेनड्राइव्हमधून काय शोधून काढतात याची उत्सुकता लागून आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी पीडित मुलीने शाहजहांपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, महाविद्यालयाच्या वसतिगृहातील तिची खोली उघडून बघितली जावी. चिन्मयानंद यांच्याविरोधात त्या खोलीत सर्व पुरावे उपलब्ध आहेत. मुलीच्या कथित भावाने जर पेनड्राइव्ह पोलिसांना सोपवला, ज्यात चिन्मयानंद यांच्याबाबतीत चित्रफीत आहे, तर मग यापेक्षा अधिक काय महत्त्वाचे त्या खोलीत असेल, असा सवाल उपस्थित होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एसआयटीने पीडित मुलीच्या वसतिगृहातील खोली उघडली. या खोलीत काय मिळाले, असा प्रश्न केला असता उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंग तसेच एसआयटी प्रमुख आयजी नवीन अरोरा यांनी उत्तर दिले नाही.

पेनड्राइव्ह तसेच इतर पुरावे उच्च न्यायालयाच्या बेंचकडे सोपवली जातील, असे बोलले जात आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्यांनी सांगितले की, एसआयटीला जे पुरावे गोळा करायचे आहे ते त्यांनी करावेत. कुटुंबाने सोपवलेला पेनड्राइव्हमधील चित्रफितीतून सर्वकाही समोर येईल.

सीसीटीव्ही रेकाॅर्डिंग पाेलिसांच्या ताब्यात
मुलीच्या आरोपांमुळे चिन्मयानंद यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. मुलीने पत्रकार परिषद घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी एसआयटीचे पथक स्वामी चिन्मयानंद यांच्या आश्रमात गेले आणि त्यांची अनेक तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एसआयटीने आश्रमातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रेकाॅर्डिंग ताब्यात घेतली. तसेच ज्या विधी महाविद्यालयात मुलगी शिकतेय तेथील वसतिगृहात जात एसआयटीने तिच्या खोलीतून काही वस्तू ताब्यात घेतल्या. मुलीने याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप चिन्मयानंद यांच्यावर केले होते. पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोपही तिने केला होता. स्वामी चिन्मयानंद यांच्याविरुद्ध मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. तर चिन्मयानंदांच्या वतीने खंडणीची तक्रार करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...