आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेक बाउन्स झाल्यास वीज ग्राहकांना दीड हजाराचा दंड; दंडासह वीजपुरवठा खंडित करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वीज बिलाचा भरणा केलेला धनादेश कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाउन्स) झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला आहे. १ नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 

औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यात सुमारे नऊ हजार लघुदाब वीज ग्राहक हे धनादेशाद्वारे दरमहा वीज बिलांचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे साडेतीनशे धनादेश दरमहा विविध कारणांमुळे बाउन्स होत आहेत. त्यासाठी संबंधित वीज ग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड लावण्यात येत होता. मात्र, आता १ नोव्हेंबरपासून १५०० रुपये दंड लावण्यात येत आहे. वीज बिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीज ग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीज बिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणतः तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो.

 

त्यामुळे मुदतीनंतर वीज बिलाचा भरणा झाल्यास संबंधित ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाउन्स झाला तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. महावितरणचे घरबसल्या वीज बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन पेमेंटची सोय उपलब्ध आहे.

 

इंटरनेट व मोबाइल अॅपच्या माध्यमातून औरंगाबाद परिमंडळात सद्य:स्थितीत सुमारे दीड लाख वीज ग्राहक सुमारे ३० कोटी रुपयांचा दरमहा वीज बिल भरणा करत आहेत. त्यामुळे धनादेशाऐवजी वीज ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंट सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात सुमारे नऊ हजार वीज ग्राहक धनादेशाद्वारे वीजबिलाचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे ३५० धनादेश दरमहा विविध कारणांमुळे बाऊन्स होत आहेत. त्यामुळे वीज कंपनीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 

बातम्या आणखी आहेत...