आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन दरवाढीचा लोकांत आक्रोश, तरीही बंदला संमिश्र प्रतिसाद!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद- पेट्रोल-डिझेलची वाढती दरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला.  ऑगस्टमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलने होत राहिल्याने सातत्याने बाजारपेठा बंद राहिल्या. त्यातच आता उत्सवांना सुरुवात झाल्याने व्यापाऱ्यांसह नागिरकांनीही बंदला फारसे प्राधान्य दिले नाही. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्यांनीही बंद करण्यासाठी अधिक जोर दिला नाही. त्यामुळे आजच्या  बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 


लातूर :  पेट्रोलपंप बंद, आमदारांनी दिली फुले
पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला सोमवारी लातूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.  आमदार अमित देशमुख यांनी उषाकिरण पेट्रोलपंपावरील आंदोलनात सहभाग घेतला. तेथील कर्मचाऱ्यांना आमदार देशमुख यांनी गुलाबाची फुले दिली. जिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोलपंपासमोर आंदोलन करून पंप बंद ठेवण्याचा काँग्रेसचा उद्देश सफल झाला.  बस वाहतूक दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागात नोकरीसाठी ये-जा करणाऱ्यांची अडचण झाली.   शहरातील रिक्षा वाहतूक  सुरळीत होती. सकाळी बंद असलेली बाजारपेठ दुपारनंतर  सुरू झाली.    अहमदपूर, शिरुर अनंतपाळ, औसा, देवणी , निलंगा, रेणापूर या तालुक्यांच्या ठिकाणच्या बाजारपेठा बंद होत्या.   पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या निलंगा शहरात  बाजारपेठ बंद होती.


नांदेड : चांगला प्रतिसाद, मात्र वाहतूक सुरू
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, माकप, मनसे आदी पक्षांच्या वतीने आयोजित सोमवारी भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने बंद होती. बंदचा वाहतुकीवर मात्र परिणाम झाला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून मोदी सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बंदमध्ये शहरातील पेट्रोल पंपही सहभागी झाले.  स्कूल बस संघटनेने बंदला पाठिंबा दिल्याने शाळांमधील उपस्थितीवर त्याचा परिणाम जाणवला. काँग्रेसच्या  रॅलीत आमदार डी.पी.सावंत, अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.  सायंकाळच्या सुमाराला शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले. रेल्वे व बस वाहतुकीवर बंदचा परिणाम झाला नाही.  सोळाही तालुक्यात  बंदला  संमिश्र प्रतिसाद मिळाला. 


परभणी : अवघ्या दोन तासांनंतर बाजारपेठ पूर्ववत सुरू
पेट्रोल, डिझेलवरून पुकारण्यात आलेल्या सोमवारच्या (दि.१०)भारत बंदला शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात बाजारपेेठ अवघी दोन तास बंद राहिली. या दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाकपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन केले होते.  राज्यात परभणीतच पेट्रोल व डिझेलचे भाव सर्वाधिक राहू लागले आहेत.  सोमवारच्या बंदमध्ये काँग्रेसने पुढाकार घेतला होता. त्याला भाजप शिवसेना वगळता अन्य पक्षांनी पाठिंबा देत सहभाग नोंदवला.  बाजारपेठ दहा ते बारादरम्यान बंद राहिली. मध्यवर्ती भागातच बंदचा प्रभाव होता.  जिंतूर, पाथरी, पूर्णा, मानवत येथेही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.  गंगाखेड येथे  तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यात गाढव, घोडे व बैलगाड्या असल्याने या मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधले.


बीड : जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद
इंधन दरवाढ व महागाईच्या मुद्यावर काँग्रेससह राष्ट्रवादी, मनसे व इतर समविचारी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला बीड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. परळीत विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली रॅली काढून बंदचे आवाहन केल्याने परळीत प्रतिसाद मिळाला. मात्र दुसरीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान असलेल्या माजी खासदार रजनी पाटील यांच्या केजमध्ये  बंदचा पुरता फज्जा उडाला.  बीड शहरासह शिरुर, धारुर, केज, पाटोदा या शहरात सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत होते अपवाद फक्त परळीचा होता.   धनंजय मुंडें यांचे परळी होम पीच असल्याने व स्वत: धनंजय हे परळीत रस्त्यावर उतरल्याने परळीत कडकडीत बंद पाहायला मिळाला. इतर तालुक्यांत मात्र संमिश्र प्रतिसाद होता. अनेक ठिकाणी दुपारपर्यंत बंद पाळून पुन्हा व्यवहार सुरळीत झाले. सर्व तालुक्यांत काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष यांनी प्रशासनाला निवेदने दिली.


हिंगोली :  बंद केवळ निवेदने देण्यापुरताच!
हिंगोलीत विरोधी पक्षांनी रस्त्यावर न उतरता जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि कार्यालयात निवेदने देऊन निषेध नोंदवला. सकाळी ९ वाजता येथील गांधी चौकात दोन्ही काँग्रेस, मनसे आणि समविचारी पक्षांचे पदाधिकारी जमा झाले. त्यांनी सकाळी १०.३० वाजेपर्यंत गांधी चौक, जवाहर रोड, आंबेडकर चौक भागात दुकाने उघडण्यापूर्वीच बंदचे आवाहन केले आणि नंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.  आमदार संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष बोंढारे, आमदार रामराव वडकुते, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, बालाजी बांगर, शेख निहाल, सुरेशअप्पा सराफ आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. अशीच स्थिती कळमनुरी, वसमत, सेनगाव आणि औंढा नागनाथ येथेही होती.  औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथे टायर जाळून  रास्ता रोको केला. 


उस्मानाबाद :  काँग्रेसच्या बंदचा फज्जा, केवळ हातगाडेच बंद, दुकाने सुरूच
शहरात काँग्रेसने पुकारलेल्या बंद आंदोलनाचा पुरता फज्जा उडाला.  पेट्रोल, डिझेलचा प्रत्यक्ष संंबंध नसलेल्या  हातगाडीवर अन्नपदार्थ विकणाऱ्यांनीच बंदला पाठिंबा दिला. शहरात सकाळी ११ वाजेच्या दरम्यान काही काँग्रेस कार्यकर्ते दुकाने बंद करण्याचे अावाहन करत फिरत होते. मात्र, शहरातील दुकानदारांनी बंदला प्रतिसाद दिलाच नाही सकाळच्या दरम्यान काही ठिकाणी दुकाने बंद होती.  दुपारी १२ पर्यंत  सर्वच व्यवहार पूर्वपदावर आले.  आमदार बसवराज पाटील यांचे प्राबल्य असलेल्या उमरगा तर आमदार मधुकरराव चव्हाणांचे गाव असलेल्या अणदूरमध्ये प्रतिसाद मिळाला. 

बातम्या आणखी आहेत...