आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाठवीच्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दाेघा टवाळखाेरांना नागरिकांनी बदडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील गणेश कॉलनी परिसरात एका खासगी क्लासमध्ये जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा गेल्या १५ दिवसांपासून दोेन टवाळखोर सातत्याने पाठलाग करून छेड काढत होते. अखेर या मुलीने मैत्रीण व कुटंुबीयांच्या मदतीने धाडस करुन मंगळवारी या दोन्ही टवाळखोरांना सापळा रचून पकडले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना चोप देऊन जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


गणेश कॉलनी परिसरातच राहणारी व आठवीच्या वर्गात शिकणारी ही अल्पवयीन मुलगी आहे. ती मैत्रिणीसह याच परिसरातील एका खासगी क्लासमध्ये जाते. गेल्या १५ दिवसांपासून गोपाल कैलास शर्मा (रा. जुना खेडीरोड) व बालाजीपेठेत राहणारा एक अल्पवयीन असे हे दोघे टवाळखोर दुचाकीने (एम. एच. १९ बी. झेड. ६२५८) या मुलीचा पाठलाग करीत होते. मुलगी क्लासमध्ये बसल्यानंतर ते दरवाजाजवळ उभे राहून चित्रपटातील गाणे म्हणून तिची छेड काढत होते. दरम्यान, सुरुवातीला मुलीने दुर्लक्ष केले. परंतु, त्याचा गैरफायदा घेत टवाळखोर दररोज हा प्रकार करू लागले. यामुळे मुलीच्या मनात असुरक्षिततेची भावना तयार झाली. अखेर तिने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस केले. दररोजप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वाजता ही मुलगी क्लाससाठी घरुन निघताच टवाळखोर तिचा पाठलाग करीत क्लासपर्यंत पोहचले. 


चित्रपटांची गाणी म्हणून छेड काढू लागले. मुलगी क्लासमध्ये बसल्यानंतर तिने टवाळखोरांच्या दुचाकीचा नंबर नोट करुन ठेवला. यानंतर थेट आईला फोन करून माहिती दिली. काही वेळात तिची आई, काका हे क्लासजवळ पोहचले. मात्र, टवाळखोर तोपर्यंत बेपत्ता झाले होते. त्यांनी बराच वेळ त्यांचा शोध घेतला. क्लास सुटल्यानंतर टवाळखोर पुन्हा तेथे पोहचताच मुलीसह तिची आई, काका व परिसरातील नागरिकांनी टवाळखोरांवर झडप घालून त्यांना पकडले. यानंतर जागेवरच त्यांना चोप देऊन दुचाकी ताब्यात घेतली. याच वेळी काही नागरिकांनी जिल्हापेठ पोलिसांना फोनवरुन माहिती दिली. काही मिनिटातच पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही टवाळखोरांसह त्यांची दुचाकी ताब्यात घेतली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन टवाळखोरांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे तपास करीत आहेत. रात्री उशिरा गाेपाल शर्मा या टवाळखाेराला अटक करण्यात आली तर अल्पवयीनला पाेलिसांनी समजपत्र दिले. 


निर्भया पथकाने सुरू करावी गस्त 
शहरात टवाळखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली. परंतु, या पथकाकडून नियमितपणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी गस्त होत नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे. गणेश कॉलनी, शिव कॉलनी या रहिवासी भागांसह शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तरुणींचा वावर असतो. तर याचा फायदा घेत टवाळखोर देखील याच भागांत छेडखानी करीत असतात. निर्भया पथकाने नियमित गस्त सुरू करून टवाळखोरांना धडा शिकवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. 


छेड काढण्याचे प्रकार नित्याचे 
शाळकरी, महाविद्यालयीन मुली विविध भागात क्लासेससाठी जातात. अनेक ठिकाणी मुलींची छेड काढण्याचे प्रकार उघडपणे सुरू आहेत. मंगळवारी गणेश कॉलनीतील या शाळकरी मुलीने धाडस दाखवून हा प्रकार घरी सांगितला. तिच्या आईने देखील तेवढ्याच गांभीर्याने तत्काळ तिच्या पाठीशी उभी राहून टवाळखोरांना धडा शिकवण्यासाठी पुढाकार घेतला. मुलीचे धाडस आणि कुटंुबीयांची साथ या दोन्ही गोष्टींमुळे टवाळखोरांना अद्दल घडली. मुलींच्या पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...