पतीच्या साथीने ऊर्मिलाचा प्रचार, तिला पाहण्यासाठीच जमते गर्दी; असा असतो उर्मिलाच्या प्रचाराचा दिनक्रम

चंद्रकांत शिंदे

Apr 18,2019 09:16:00 AM IST

मुंबई - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसने चित्रपट अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना मैदानात उतरवले आहे. आपली वाट अवघड आहे याची जाणीव ठेवूनच उर्मिला मातोंडकरने प्रचाराचा धडाका लावला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मतदारसंघात प्रचार फेऱ्या काढून ती मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारकार्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही कार्यकर्ते दिसून येत आहेत.

असा असतो प्रचाराचा दिनक्रम

> ऊर्मिला म्हणाली, सकाळी ७ वाजता मी तयार होते. कार्यकर्त्यांसोबत बैठका घेते. त्यानंतर प्रचारफेरीची माहिती घेऊन तेथे कोण कोण आहेत, कोणत्या सोसायटीत जायचे आहे, तेथे कोणता समाज आहे याची माहिती घेते. दुपारी एक वाजता प्रचार संपल्यानंतर थोडेसे खाऊन पुन्हा बैठका, चर्चा आणि पुढील नियोजनाबाबत ठरवले जाते. ४ वाजता पुन्हा प्रचार, रात्री पुन्हा बैठका. झोपायला १२ ते १२.३० वाजतात.

> थकायला होता नाही का? असे विचारले असता ऊर्मिला म्हणाली, चित्रपटात काम करतानाही श्रम असतातच, फक्त तेथे सोयी-सुविधा असतात, येथे नाही. ज्या वेळी पदयात्रा असतात तेव्हा खूप थकायला होते. रात्री मग पायांना मालिश करावे लागते. सुरुवातीला त्रास झाला, परंतु आता त्याची सवय झाली आहे.

सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रचारात व्यग्र

सकाळी ९ : बुधवारी सकाळी ऊर्मिलाने बोरिवली पश्चिममध्ये प्रचारफेरी घेतली. राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेचे कार्यकर्ते हजर होते. ९.३० ला ऊर्मिला आली. टेम्पोला प्रचार रथाचे रूप देण्यात आले होते. टेम्पोवर गुजराती व मराठीत मोठे फलक लावलेले होते. ऊर्मिला प्रत्येक सोसायटीत न जाता मुख्य रस्त्यावरूनच प्रचार करत होती. ऊर्मिला नागरिकांना हिंदीमध्ये मत देण्याचे आवाहन करत होती. ऊर्मिला तिच्या पतीच्या गाडीतून निघून गेली आणि दुपारची प्रचार फेरी पावणेएक वाजता संपली.

दुपारी ४ : महिंद्रा कंपाउंड, दामूनगर बस स्टॉप, आझादवाडी, गौतमनगर अशी प्रचार फेरी होती. आजूबाजूचे दुकानदार बाहेर येऊन ऊर्मिलाला बघत होते. आपल्या मोबाइलमधून फोटो काढत होते आणि पुन्हा कामाला लागत होते.

रात्री ८ : रात्री आठ वाजता कांदिवली पूर्व येथील इंद्रायणी शॉपिंग सेंटर जवळ पब्लिक मीटिंगचे आयोजन करण्यात आले आणि ऊर्मिला मातोंडकरचा दिवसभराचा प्रचार संपला. मात्र एकूणच प्रचारात जसा जोश दिसायला हवा तसा दिसला नाही.

मनसे कार्यकर्त्यांना निरोप
स्थानिक मनसे शाखाप्रमुख म्हणाले, सकाळी प्रचारफेरीत जाण्याबाबत मंगळवारी रात्री उशिरा निरोप आला. आम्ही सकाळी महिला, मुली आणि कार्यकर्ते गोळा करून प्रचारात आलो. मात्र प्रचारात ऊर्मिला मराठी मुलगी बोलत असली तरी मराठीत घोषणा देत नसल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

पैसे कॉन्ट्रॅक्टरला मिळतात
प्रचारात सहभागी मुले म्हणाली, प्रचार कामाचे पैसे मिळतात. परंतु ते आमच्याकडे थेट न येता आम्हाला ज्यांनी बोलावले त्या कॉन्ट्रॅक्टरकडे जातात. नंतर तो आम्हाला पैसे देतो.

आम्ही तर ऊर्मिलाला पाहण्यासाठी आलो
प्रचारफेरीदरम्यान काही वयस्कर महिलांना निवडणुकीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, ऊर्मिला कशी दिसते ते पाहण्यासाठी आम्ही आलो. काही दुकानदारांना विचारले असता ऊर्मिला केवळ एक अभिनेत्री आहे, तिला असे रस्त्यावर पाहायला मिळते एवढेच. ती आता दिसते, नंतर दिसेल की नाही माहिती नाही. आम्हाला नेहमी उपयोगी पडणारा खासदार हवा. गोपाळ शेट्टी निवडून येतील का, असे विचारले असता त्यांनी स्पष्ट काही सांगण्याऐवजी निकालानंतर कळेलच असे सांगितले.

X
COMMENT