आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३००+ जागांचा दावा केला तर लाेक मला हसले : माेदी, दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याआधी घेतला आईचा आशीर्वाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद  - लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी प्रथमच गुजरातला पोहोचले. भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, गुजरातचा विकास पाहून लोकांच्या मनात भाजपबद्दल विश्वास निर्माण झाला होता. यंदाच्या या निवडणुकीत सर्व राजकीय पंडितांचे अंदाज चुकले. सहाव्या टप्प्यानंतर मी ३०० हून अधिक जागा जिंकू, असे सांगितल्यावर अनेकांनी खिल्ली उडवली होती. जनादेशासोबत आलेल्या जबाबदाऱ्यांचा उल्लेख करत मोदींनी कार्यकर्त्यांना नम्र राहण्याचा सल्ला दिला. आगामी पाच वर्षे लोकसहभाग, जनचेतना आणि सर्वांगीण विकास होईल. या पाच वर्षांचा वापर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी करायचा आहे. जागतिक स्तरावर भारताला आणखी अग्रेसर करावे लागेल. दरम्यान, १७ व्या लाेकसभेचे पहिले अधिवेशन ६ ते १५ जूनपर्यंत चालेल. ३१ मे राेजी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अधिवेशनाची तारीख औपचारिकरीत्या निश्चित केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

 

दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याआधी आईचा आशीर्वाद

अहमदाबादेतील सभेनंतर मोदी रात्री आई हिराबेन यांची भेट घेण्यासाठी गांधीनगरातील भावाच्या घरी गेले. तिथे त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले. २०१४ मध्येही निवडणूक जिंकल्यानंतर मोदींनी सर्वप्रथम आईची भेट घेतली होती.
 

३० मे रोजी ७ वाजता मोदीं यांचा मंत्र्यांसह शपथविधी

नवी दिल्ली। पंतप्रधान मोदी ३० मे रोजी सायं. ७ वाजता दुसऱ्या कार्यकाळासाठी पद व गोपनीयतेची शपथ घेतील. राष्ट्रपती भवनातून रविवारी ही माहिती दिली. शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनात होईल. या वेळी राष्ट्रपती मंत्रिमंडळातील सदस्यांनाही शपथ देतील. मंत्र्यांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत.
 

विदेशी नेत्यांची उपस्थिती निश्चित नाही
शपथविधी समारंभासाठी अन्य देशांतील नेते येणार आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. मोदी यांनी २०१४ मध्ये शपथविधीस पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह सार्क देशांतील नेत्यांना निमंत्रित केले होते. तेव्हा विदेशी पाहुण्यांसह दोन हजार लोक कार्यक्रमास हजर होते.

 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले माेदींचे अभिनंदन

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे लाेकसभा निवडणुकीतील यशाबद्दल फाेन करून अभिनंदन केले. लाेकांच्या भल्यासाठी दाेन्ही देश मिळून काम करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावर माेदी यांनी खान यांना सांगितले की, ‘प्रादेशिक शांतता व समृद्धीसाठी हिंसाचारमुक्त व दहशतवादमुक्त वातावरणाची गरज अाहे.’