आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमित जागा नावावर करण्यासाठी यावलमध्ये २ तास रास्ता रोको आंदोलन...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तब्बल २५ वर्षांपासून वास्तव्य असलेली अतिक्रमित जागा नावावर न केल्याने संतप्त झालेल्या परसाडे बुद्रूक येथील आदिवासी बांधवांनी सोमवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत दोन तास अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली. यानंतर शेकडो आंदोलकांनी तहसील कार्यालयात गाठले. तेथे देखील एक तास ठिय्या देऊन लेखी आश्वासन मिळाल्यावर ते माघारी फिरले. 


परसाडे बुद्रूक येथे गट क्रमांक १६१ मध्ये १५० पेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांचा २५ वर्षांपासून रहिवास आहे. सन २०१६ मध्ये ग्रामसभेने ही जागा अतिक्रमित रहिवाशांच्या नावे करावी, असा ठराव मंजूर केला होता. यानंतर तसा शासन निर्णय देखील झाला. मात्र, ही जागा अद्यापही ग्रामपंचायत नमुना ८ मध्ये आदिवासी बांधवांच्या नावे लागलेली नाही. हा तिढा सोडवण्यासाठी सोमवारी दुपारी १२ वाजेला शेकडो रहिवासी महिला-पुरुषांनी यावल शहरातून गेलेल्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर दुपारी १२ वाजेपासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले, त्यानंतर प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढली. मात्र, लेखी आश्वासन दिले तरच रस्ता मोकळा करू अशी, भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी तहसीलदार, बीडीओंनी लेखी आश्वासनाची हमी देत तहसील कार्यालयात चर्चेला येण्याचे आवाहन केले. यानंतर आंदोलक तहसीलमध्ये आले. येथे त्यांनी पुन्हा एक तास ठिय्या मांडला. मात्र, मागणीविषयी लेखी हमी व जिल्हाधिकाऱ्यांकडे जागा वाटपाचे पत्र देण्याचे आश्वासन मिळताच आंदोलन मागे घेण्यात आले. आदिवासी महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्रकुमार गवळी, राज्याध्यक्ष युनूस तडवी, परसाडे सरपंच बबीता तडवी, उपसरपंच रूस्तम तडवी, अल्लाद्दीन तडवी, यासिन तडवी, फिरोज तडवी, हमीद तडवी आदींचा सहभाग होता. 


लेखी आश्वासनानंतर माघार; भुसावळ, फैजपूर, चोपडाकडे जाणारा रस्ता ब्लॉक 
आंदोलनास पाठिंबा 


आंदोलनास शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, सेनेचे आदिवासी विभागप्रमुख हुसेन तडवी, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, युवराज सोनवणे यांनी पाठिंबा दिला. तहसीलदार कुंदन हिरे, बीडीओ किशोर सपकाळे, जितेंद्र पंजे यांनी मध्यस्थी करून जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन देत तोडगा काढला. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यावर ठिय्या मारून बसलेले आंदोलक. 
रस्ता सोडल्यानंतर लेखी आश्वासनासाठी तहसील कार्यालयात एक तास ठिय्या आंदोलनामुळे तणाव होता. 


दृष्टिक्षेप आंदोलन 
- आंदोलनामुळे भुसावळ, फैजपूर व चोपडा या तिन्ही मार्गावर ५ किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या 
- आंदोलनकर्त्यांनी बुरूज चौकातून दुचाकीदेखील जाऊ दिली नाही. मात्र, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्ता दिला. 


 

बातम्या आणखी आहेत...