आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरण्यासाठी नाही; तर आराम करण्यासाठी, चित्रपट बघण्यासाठी, चार्जिंग करण्यासाठी जपानमध्ये लोक चक्क भाड्याने कार घेतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानमध्ये कार शेअरिंग सेवा वेगाने लोकप्रिय होत चालली आहे. म्हणजे कार किरायाने घ्या आणि वाटेल तशी वापरा. किरायाही इतका कमी की आश्चर्य वाटेल... तासाला केवळ ८ डॉलर... ५६० रुपये. याचे वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश जपानी लोक किरायाने घेतलेल्या कारचा वापर प्रवासासाठी करत नाहीत. तर कार एका बाजूला उभी करून लोक त्यातील एसी तसेच ऑडिओ-व्हिडिओ यंत्रणेचा लाभ घेतात. आपली उपकरणे चार्ज करण्यासाठी त्याचा वापर करतात. कारमध्येच मित्रांसोबत बैठका, गप्पाही चालतात. आवडीचे चित्रपट पाहण्यासाठी ही कार म्हणजे जपानी लोकांसाठी पर्वणीच. काही लोक तर कार किरायाने घेऊन तीन-चार तास आराम करतात. याचे कारण म्हणजे, या सर्व सुविधा त्यांना अत्यंत स्वस्तात मिळत आहेत. शिवाय एकांत मिळतो तो वेगळाच. किरायाने गेलेल्या कारचे ट्रॅकिंग करताना कार शेअरिंग सेवा देणाऱ्या ऑरिक्स ऑटो कॉर्पला ग्राहकांच्या या अफलातून सवयीची माहिती मिळाली. कार किरायाने गेल्यावर जर ती चालवली जात नसेल तर नेमकी जाते कुठे, आणि तरीही लोक तासाचा किराया का देतात, या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा या कंपनीने प्रयत्न केला तेव्हा लोकांचा हा अजब छंद समोर आला. एका ग्राहकाने सांगितले, आता कार स्वस्तात किरायाने मिळू लागल्याने तो एखाद्या सायबर कॅफेमध्ये त्याच्या मित्राची भेट घेण्यापेक्षा कारमध्येच भेटतो. यात दुहेरी फायदा असा की फार पैसा खर्च होत नाही आणि एकांतही मिळतो. 

 

गायन, इंग्रजी शिकण्यासाठी लोक सहज घेतात किरायाने कार
किरायाने कार देणाऱ्या डोकोमो कंपनीनेही याबाबत खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा कळले की, लोक कारचा वापर आता टीव्ही पाहण्यासाठी, हॅलोवीन (भुताचा अवतार करून दचकावणे), गायन शिकणे, इंग्रजी संभाषण शिकण्यासाठी करत आहेत. कारमध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध होऊ शकत असल्याने अनेक लोकांना आता याचा छंदच लागला आहे. एकांतामुळे हा छंद लोकांना अधिक आवडू लागला आहे.