RSS / सत्तेचा माज करणाऱ्यांना जनता धडा शिकवते, प.बंगालमधील स्थितीवर भागवत यांचे वक्तव्य

मात्र, जनतेने देशाची अखंडता, विकास व पारदर्शक कारभाराला मत दिले

दिव्य मराठी

Jun 17,2019 09:38:00 AM IST

नागपूर - लोकसभा निवडणुकीचा शिमगा संपला तरी त्याचे कवित्व सुरूच आहे. सत्तेच्या मोहापायी नेमकी काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे चित्र सध्या पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळत आहे. सरकारचे नेतृत्व करणाऱ्या लोकांकडून अत्यंत अभद्र भाषेचा वापर होत असून सत्तेचा माज करणाऱ्यांना जनता धडा शिकवत असते, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात बोलताना केली.
संघाच्या अ. भा. वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भागवत बोलत होते. मागील निवडणुकीत निवडून आलेल्या पक्षालाच यंदा जनतेने मोठ्या शक्तीनिशी विजयी केले. सरकारने लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असाच याचा अर्थ मानावा लागेल. मात्र, आता अपेक्षा आणखी वाढल्या असून त्या सरकारने लवकर पूर्ण कराव्यात, असा उल्लेख भागवत यांनी राम मंदिराच्या प्रश्नाचा थेट उल्लेख न करता दिला.

भेदभाव सोडून मतदान
निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्याचे प्रयत्न झाले. आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, जनतेने देशाची अखंडता, विकास व पारदर्शक कारभाराला मत दिले. संघाने शत-प्रतिशत मतदानासाठी प्रयत्न केल्याचे भागवत म्हणाले.

X