आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या अर्थव्यवस्थेवरील सामान्यांचा विश्वास उडाला; रिझर्व्ह बँकेचा सरकारला घरचा आहेर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश जोशी 

औरंगाबाद - देशाची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे सरकार सांगत असले तरी गेल्या काही महिन्यांत सामान्य नागरिकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. भविष्यात सुधारणा होण्याबाबत नागरिकांना खात्री नाही. नोकऱ्यांतील स्थैर्य, उत्पन्नवाढीची शक्यता नागरिकांना वाटत नाही. अवघ्या तीन महिन्यांतच नागरिकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास उडाल्याचे रिझर्व्ह  बँकेने केलेल्या ग्राहक विश्वास सर्वेक्षणातून उघड झाले आहे.
सरकार मंदी नसल्याचे कितीही सांगत असली तरी सामान्यांना याची झळ बसत आहे. यामुळेच सरकारचे  दावे नागरिकांना मान्य नाहीत. आरबीआयच्या वतीने दर तीन महिन्यांनी ग्राहक विश्वास सर्वेक्षण केले जाते. मुंबईसह देशातील १३ महानगरांमध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन अर्थव्यवस्थेची विद्यमान स्थिती, रोजगार, दरवाढ, उत्पन्न आणि खर्च या ५ मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातात. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ग्राहकांचा विश्वास ढासळल्याचे सर्वेक्षण सांगते. 
 

असे आहे सर्वेक्षण
> अर्थव्यवस्था : ३३.५ % - अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारली, १८.६ % -जैसे थे, ४७.९ % -अत्यंत वाईट 
>  रोजगार : २८ % - स्थिती सुधारली, १९.५ % - जैसे थे, ५२.५ % - अत्यंत वाईट 
> महागाई : ८६.१ %- महागाई वाढली, १०.६ % - जैसे थे, ३.३ % - महागाई घटली, सप्टेंबर २०१८ पासून महागाईत वाढ  होत असल्याचे नागरीकांचे मत आहे. { उत्पन्न : २५ % - उत्पन्न वाढले, ४८.३ % उत्पन्न जैसे थे, २६.७ %  उत्पन्न घटले
> खर्च : ७४.१ % - खर्च वाढला, २२ %  जैसे थे, ३.८ %  खर्च घटला

ग्राहक विश्वास - वरील पाच मुद्यांच्या आधारावर कन्झुमर कॉन्फिडेन्स इंडेक्स म्हणजेच ग्राहक विश्वास निर्देषांक काढला जातो. मार्च २०१७ मध्ये निर्देषांक १०० होता. नंतर यात सातत्याने घसरण सुरू होती. मे २०१८ मध्ये तो परत १०० वर आला. मार्च २०१९ मध्ये १०५ वर पोहचला. मात्र, जुलै मध्ये ९५.७ तर सप्टेंबरमध्ये ८९.४ वर घसरला आहे. गेल्या ५ वर्षात पहिल्यांदाच निर्देषांक एवढ्या खाली आला आहे. ही घसरण सर्वसामान्यांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास सातत्याने ढासळत चालल्याचे द्योतक आहे. भविष्यातही यात सुधार होण्याची त्यांना आशा नाही.