आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यक्ती जिवंत झाल्याचा भास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मी गेली 42 वर्षे वैद्यकीय सेवा करीत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून मी नेत्रदानाची चळवळ अंगीकारली आहे.सुमारे 300 मृत व्यक्तींचं नेत्रदान मी घडवून आणलं आहे. वयाच्या 68 व्या वर्षीदेखील रात्री-बेरात्री अवेळी आलेल्या गरजू रुग्णांना मी वैद्यकीय सेवा देतो. वृद्ध, अपंग रुग्णांना होम व्हिजिट करून दिलासा देण्याचा प्रयत्न करतो. 1995 ची गोष्ट. मध्यरात्री अडीच-तीनच्या दरम्यान माझ्या चुलतभाच्याचा दूरध्वनी आला. त्याच्या वडिलांची छाती खूप दुखत होती.स्टेशन रोडवरून मी मुकुंदनगरला गेलो, पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.

थोडेसे सावरल्यानंतर मी नेत्रदानाबद्दल सुचवलं. त्यांनी तत्काळ होकार दिला. मी त्वरित नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधून त्यांना पाचारण करून नेत्रदान घडवून आणलं. नंतर मी घरी आलो. स्नानादी आटोपून मंदिरात दर्शनाला गेलो. तेथे माझी पत्नी रिक्षा करून आली. तिने मला सांगितले की, मृत मेव्हणे हालचाल करीत आहेत म्हणून दूरध्वनी आला. ते ऐकून माझी काय अवस्था झाली याचं वर्णन करणं केवळ अशक्यप्राय आहे. मी अतिवेगाने त्यांच्या घरी पोहोचलो. 10-12 मिनिटांच्या कालावधीत मनाची घालमेल होत होती. नेत्रदान घडवून आणल्यानंतर असं घडणं शक्य नाही याची खात्री होती, पण विचारांना आवर घालणं अशक्य होतं. पोहोचल्याबरोबर तपासणी केली. मृत व्यक्ती खरंच मृत होती. त्याचं असं झालं की, मृताच्या अंगावर जे कापड घातलं होतं ते कोणीतरी पंखा चालू केल्यामुळे हलत होतं. त्यामुळे मृत व्यक्ती हालचाल करीत असल्याचा आभास निर्माण होत होता. तपासणीनंतर माझ्या जिवात जीव आला. एवढ्या वर्षांनंतरही हा अनुभव मी विसरू शकलो नाही.