आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: पालकमंत्र्यांसमाेर विषाची बाटली घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; तारांबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमाेरच एका प्राैढाने विष प्राशन करून अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला. साेबत अाणलेली विषाची बाटली उघडत प्रमाेद धाडणेकर यांनी सगळ्यांसमाेर विष प्राशनाचा प्रयत्न केला. मात्र पाेलिसांनी तातडीने त्यांना पकडले. त्यांच्या हातातील विषाची बाटली जप्त केली. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यामुळे पाेलिसांची तारांबळ उडाली. तसेच माेठा गाेंधळही झाला. त्याचवेळी अात्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या दाेघांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. यात एका महिलेचाही समावेश हाेता. नंतर त्यांना साेडण्यात अाले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात काल बुधवारी सकाळी ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरू हाेता. पालकमंत्री दादा भुसे या वेळी उपस्थित हाेते. त्यांच्यासमाेरच हा धक्कादायक प्रकार घडला. अाश्रमशाळेला अनुदान मिळत नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या प्रमाेद धाडणेकर यांनी हे घातक पाऊल उचलले. त्यापूर्वी त्यांनी िजल्हा प्रशासनाला निवेदनही दिले हाेते. त्यात अात्महत्येचा इशारा दिला हाेता. ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरू असताना धाडणेकर कार्यक्रमात पोहाेचले. या वेळी पालकमंत्री नागरिकांना संबोधत हाेते. धाडणेकर छायाचित्रकारांच्या गराड्यात शिरले. पालकमंत्र्यांचे भाषण संपल्याबरोबर त्यांनी सोबत आणलेली विषाची बाटली उघडली. त्यातून विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी पोलिस कर्मचारी नरेंद्रसिंग कच्छवा व सी.एस.पाटील यांनी धाव घेतली. त्यांनी धाडणेकर यांच्या हातातील विषाची बाटली हिसकावली. त्यानंतर पोलिसांनी धाडणेकर यांना ताब्यात घेतले. कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्र्यांनी पोलिसांना सूचना केली. संबंधित व्यक्तीला आणा, त्यांचे म्हणणे काय आहे हे एेकून घ्यावयाचे अाहे, असे सांगितले. या वेळी पोलिसांनी धाडणेकर यांना पालकमंत्र्यांसमोर उभे केले. तेव्हा धाडणेकर यांनी आपली कैफियत मांडली. त्यावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.


... अन्य दोघांचाही होता प्रयत्न
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आत्महत्या करण्याच्या उद्देशाने अन्य दोघे जण दाखल झाले होते. त्यात साक्री तालुक्यातील एका महिलेचाही समावेश होता. मात्र पोलिसांना आधीच संशय आल्यामुळे संशयित महिलेसह अन्य एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुख्य कार्यक्रम आटोपल्या नंतर संबंधितांना सोडण्यात आले.

 

क्रांती मोर्चा आंदोलकांची शिस्त...
२५ दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावेळी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन होऊ शकते अशी शक्यता पोलिसांना होती. त्या दृष्टीने पोलिसांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावला होता. मात्र राष्ट्रीय सणात विघ्न आणणार नाहीत, असा शब्द मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी दिला होता.त्यानुसार कोणतीही निदर्शने किंवा घोषणाबाजी न करता शिस्तीचे दर्शन घडविले.

 

... हे हाेते प्रकरण
साक्री तालुक्यातील विजयपूर येथे हिंदुस्थानी स्पोर्ट‌्स अॅण्ड ज्यूदो कराटे असोसिएशन संचलित केंद्रीय अनुसूचित जमातीची प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळा कार्यरत आहे. या शाळेच्या तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट दिली नाही. परिणामी शाळा तपासणी अहवाल केंद्र शासनाला सादर झाला नाही. त्यामुळे या शाळेला २००७-०८ पासून आतापर्यंत अनुदान मिळत नाही. अनुदान सुरू व्हावे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रमोद धाडणेकर यांनी वेळोवेळी शासनाशी पत्रव्यवहार केलेले आहेत.केंद्र शासनाच्या पत्रानुसार गेल्यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. मात्र अहवाल सादर केला नाही. त्यामुळे अनुदान मिळालेले नाही. धाडणेकर स्वखर्चाने शाळा चालवित होते. मात्र कर्मचाऱ्यांची देयके, पोषण आहार,भोजनासह इतर देयके थकित झाले. शासनाच्या नियमांचे पालन करून निव्वळ प्रशासकीय अनास्थेमुळे शाळेला अनुदान मिळू शकलेले नाही.परिणामी २०१५-१६ पासून शाळा बंद केलेली आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधत गेल्याच आठवड्यात धाडणेकर यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत आत्महत्येचा इशारा दिला होता.

 

बातम्या आणखी आहेत...