आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबरीमाला मंदिर प्रवेश : 24 तास सुरक्षेसाठी याचिका; सुप्रीम कोर्टात आज सुनावणी 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात नुकताच प्रवेश केलेल्या दोन महिलांनी २४ तास सुरक्षा पुरवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी सुनावणी करणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. एल.एन. राव व एस.के. कौल यांच्या न्यायपीठासमोर हे प्रकरण सुनावणीस आले आहे. मंदिर प्रवेश केल्यावरून दोघीपैकी एकीला सासूने मारहाण केली होती. ती सध्या रुग्णालयात आहे. 

 

सर्व वयोगटांतील महिलांना विना अडथळा प्रवेश देऊन त्यांना सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणी केली आहे. संबंधित महिलेने तिच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगत हिंडण्या-फिरण्यावर मर्यादा आल्याचे नमूद केले आहे. मंदिर प्रवेश केलेल्या दोन महिलांना अखंडित सुरक्षा पुरवली जावी, शाब्दिक शेरेबाजी, हिंसक कृत्य तसेच सोशल मीडियावर त्यांच्याविरुद्ध अपशब्द वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याशिवाय १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेश केल्यानंतर मंदिरात शुद्धीकरणाचे विधी केले जाऊ नयेत यासाठी निर्देश देण्यात यावेत. शुद्धीकरण विधी हा माणुसकीच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणारा आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 

निकालानंतर तीन महिन्यांनी दोघींचा मंदिर प्रवेश 
२८ सप्टेंबरला ऐतिहासिक निकाल :

गेल्या २८ सप्टेंबरला तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने सर्व वयोगटांतील महिलांच्या सबरीमाला मंदिर प्रवेशाला परवानगी देणारा निकाल बजावला होता. विशिष्ट वयोगटातील महिलांना प्रवेश रोखणे लिंगभेद करणारे ठरते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

 

मासिक पाळी येण्याच्या वयोगटातील दोन महिलांनी सबरीमाला मंदिरातील भगवान अय्यप्पाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढली होती. ४४ वर्षीय कनकदुर्गा व ४२ वर्षीय बिंदू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर तीन महिन्यांनी प्रवेश केला होता. यानंतर मुख्य पुजाऱ्यांनी शुद्धीकरणासाठी मंदिर बंद केले होते. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला निकालाबाबत फेरआढावा घेण्याच्या याचिकेवर २२ जानेवारीपासून सुणावणी घेणार नसल्याचे सांगितले. न्यायपीठातील एक न्यायमूर्ती आजारी रजेवर असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. 

 

४८ फेरविचार याचिका दाखल : 
त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने निकालाबाबतच्या आढावा याचिकेवरील सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्याचे निश्चित केले. न्यायपीठात न्या. इंदू मल्होत्रा, सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्या. आर.एफ. नरिमन, न्या. ए.एम. अहलुवालया व न्या.डी.वाय. चंद्रचूड यांचा पाचसदस्यीय न्यायपीठात समावेश होता. न्या. मल्होत्रा यांनी निकालात असहमती दर्शवली. हिंसाचार व आंदोलनामुळे निकालाचा फेरविचार व्हावा यासाठी ४८ याचिका दाखल केल्या होत्या. 

 

बातम्या आणखी आहेत...