आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा वाढणार पेट्रोल डीझेलचे दर! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंत वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - भारतीय अर्थव्यवस्थेत संकट असतानाच इंधन दरवाढीचा भार सोसावा लागू शकतो. जगातील सर्वात मोठा तेल निर्यातक देश सौदी अरेबियावर हौती बंडखोरांच्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढले आहेत. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन 50 टक्के बंद केले. त्यामुळे, निर्णय लागू होताच जगभरात तेलाचा 5 टक्के तुटवडा निर्माण झाला. यानंतर ब्रेंट क्रूड ऑइलने कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल जवळपास 20 टक्क्यांनी वाढवले. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटने सुद्धा तेलाच्या किमतीमध्ये प्रति बॅरल 15.5 टक्क्यांची वाढ केली. अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळीच अमेरिकेचे ऑइल रिझर्व्ह खुले केले. त्यामुळे, तत्काळ तेलाचे भाव पूर्ववत झाले. परंतु, अमेरिका आणि सौदी अरेबिया रिझर्व्हवरून तेलाच्या किमती किती नियंत्रित करू शकतील हे निश्चितपणे सांगता येणार नाही.

एकट्या सौदी अरेबियातून आरामको कंपनीच्या माध्यमातून जगभरात रोज 57 लाख ते 70 लाख बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. सौदी अरेबियाची कंपनी आरामकोवर हल्ला झाल्यानंतर हा पुरवठा 50 टक्क्यांनी घटला आहे. त्यातही सौदी अरेबियन कंपनी किती दिवस 50 टक्के तेल उत्पादन बंद ठेवणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अमेरिकेने तूर्तास ऑइल रिझर्व्ह जारी करून दिलासा दिला. परंतु, सौदी अरेबियाला पूर्णपणे पुरवठा सुरू करण्यासाठी काही आठवडे लागणार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मुबलक तेल साठा असल्याचा दावा केला. परंतु, एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारात याचा कसा परिणाम होईल हे लवकरच समोर येणार आहे.

आम्ही हल्ल्यासाठी तयार, सौदीची वाट पाहतोय -ट्रम्प
तर दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सौदीवर हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अक्षरशः शस्त्र तयार ठेवून बसले आहेत. आम्हाला यामागे कुणाचा हात आहे हे माहिती आहे. आम्ही हल्ल्यासाठी सज्ज आहोत. तरीही सौदी अरेबियाला कोण हल्लेखोर वाटतात यावर सौदीचे काय म्हणणे आहे याची वाट पाहत आहोत असे ट्रम्प म्हणाले आहेत. सौदी अरेबियन तेल कंपनीवर येमेनच्या हौती बंडखोरांनी ड्रोन वापरून हल्ले केले. पण, अमेरिकेच्या मते या हल्ल्यासाठी इराण जबाबदार आहे.

बातम्या आणखी आहेत...