डाटा / फेसबुकच्या ४२ कोटी युजर्सचा फोन नंबर डाटा झाला लीक

अमेरिकेसह तीन देशांना बसला सर्वाधिक फटका

वृत्तसंस्था

Sep 17,2019 02:41:48 PM IST

वॉशिंग्टन - फेसबुक या सोशल मीडिया कंपनीशी संबंधित ४१.९ कोटी युजर्सचा फोन नंबरचा डाटा लीक झाला आहे. लीक झालेल्या नंबरमध्ये सर्वाधिक अमेरिकेच्या १३.३ कोटी, व्हिएतनामच्या ५ कोटी आणि ब्रिटनच्या १.८ कोटी युजर्सचा समावेश आहे. या लीकमध्ये युजर्सची नावे, लिंग आणि पत्ते यांसारख्या माहितीचाही समावेश होता. त्याद्वारे युजर्सला फेक कॉल आणि सिम स्वॅपिंगसारख्या घटनांचा सामना करावा लागू शकतो. लीक झालेल्या नंबरमध्ये काही सेलेब्रिटीजच्या नंबरचाही समावेश होता.


टेक क्रंच या अमेरिकी टेक्नॉलॉजी न्यूज साइटच्या वृत्तानुसार, सर्व्हरचा पासवर्ड सुरक्षित नसणे हे लीक होण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे तो अॅक्सेस करणे खूप सोपे आहे. या प्रकरणी फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, वृत्तामधील काही भाग खरा आहे, पण हा डाटा खूप जुना आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. कारण २०१८ मध्ये केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण समोर आल्यानंतर फेसबुकने मोबाइल नंबरद्वारे कोणत्याही फेसबुक युजर्सला शोधण्याची सुविधा बंद केलेली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या डाटामार्फत अकाउंट हॅक झाल्याचे एकही प्रकरण सध्या समोर आलेले नाही. वाद निर्माण झाल्यानंतर फेसबुकने हा डाटा हटवला आहे.

X
COMMENT