आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, धावडा मंडळांत अतिवृष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : जालना जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. विशेषकरून भोकरदन तालुक्यात जास्त पाऊस झाला आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून सलग पाऊस असून सकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. पिंपळगाव रेणुकाई व धावडा या दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या तालुक्यात सरासरी ३१ मिमी पाऊस झाला आहे. नुकसानीनुसार पिकांंचे पंचनामे करणेही सुरू झाले आहेत. पावसामुळे कपाशी, मका, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


भोकरदन तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. धावडा परिसरात मक्याला कोंब आले आहेत. सोयाबीनसह ज्वारीही काळी पडली आहे. सिपोरा बाजार येथे पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अादेशानुसार पंचनामेही सुरू झाले आहेत. भोकरदन तालुक्यातील परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेती पिकांची धूळधाण झाली आहे. अनेक शाळांवरील पत्रे उडून गेले आहेत. अनेक भागांमध्ये नदीवर पूर आल्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटला होता. शुक्रवार, शनिवारी, रविवारी पावसाने तालुक्यात कहरच केला. पाऊस रात्रभर कमी अधिक प्रमाणात सुरूच होता. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे केळणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तर रस्ते देखील पाण्याखाली आल्याने अनेक गावांतील वाहतूक थंाबवण्यात आली होती.

बेपत्ता तरुणाचा शोध सुरूच
धामणा धरणातील पाणीपातळी पाहण्यासाठी गेलेला तरुण सांडव्यात पडून वाहिल्याचा प्रकार भोकरदन तालुक्यातील शेलूद येथे शनिवारी दुपारच्या वेळी घडला. गजानन आत्माराम खराटे (३२) शेलूद असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी उशिरापर्यंतही हा तरुण सापडला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी भोकरदन अग्निशामक दलाचे जवान शेलूद येथे दाखल झाले. त्यांनी धरणाचा सांडवा तसेच परिसरातील रायघोळ नदीत रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली, मात्र, अजूनही तो तरुण सापडलेला नाही.

असा झाला पाऊस
हसनाबाद - १०
भोकरदन - १४
केदारखेडा - ०७
सिपोरा बाजार - ३५
आन्वा - ३०
राजूर - ०४
पिंपळगाव रेणुकाई -  ७८
धावडा - ७२
या तालुक्यात ६ जूनपासून आजपर्यंत १०९९.५ मि.मी. सरासरी पाऊस पडला आहे.